समाधी अभंग १

 
 
 

संत नामदेवरायांची समाधी

‎महाद्वारी सुख असे या सुखाचे । लागती संताचे चरण रज ॥१॥
म्हणोनिया स्थळ पाहिले निवांत । झाले तेथे चित्त समाधान ॥२॥
सकळ वैष्णवासहित बोळवण करा । तुम्ही वो दातारा मजलागी ॥३॥
देव म्हणे नामया राहे क्षणभरी । पुरतील अंतरी कोड माझे ॥४॥

वैकुंठासी आम्हा नको धाडु हरि । वास दे पंढरी सर्वकाळ ॥१॥
वैकुंठ कोपट जुनाट झोपडी । नको आडआडी घालु आम्हा ॥२॥
वैकुंठा जाउनी काय बा करावे । उगीच बैसावे मोन रुप ॥३॥
नामा म्हणॆ मज येथे ची हो ठेवी । सदा वास देई चरणा जवळी ॥४॥

वतन आमची मिरास पंढरी । विठोबाचे घरी नांदणूक ॥१॥
सेवा करु तेथे नित्य महाद्वारी । नामाच्या गजरी जागवोनी ॥२॥
साधुसंता शरण जाउ मनोभावे । प्रसाद स्वभावे देती मज ॥३॥
नामा म्हणे आम्ही पायरीचे चीरे । संत पाय हिरे वर देती ॥४॥


संत एकनाथ महाराजांचे प्रयाण (समाधीचे अभंग)

धन्य प्रतीष्टान क्षेत्र महिवरी । गोदेचे हे तीर पुण्य भुमी ॥१॥
धन्य श्रीगुरु जर्नादन सखा । त्रैलोक्यासी देखा पावण केले ॥२॥
धन्य तो अवधुत प्रसादे तारिले । क्रुतक्रुत्य केले सुफळ जन्म ॥३॥
निळा म्हणॆ त्यांचा न कळेचि पार । कोण बडीवार माझा येथे ॥४॥

उद्या उद्या होता तये कृपादृष्टी । स्वये जगजेठी क्रुपा करी ॥१॥
ससासंमार्जन करी स्वये हरि । उदक ते भरी गंध वाही ॥२॥
स्वार्थ परमार्थ दोन्हीन्ही साधान । साधियेले जाण क्षणमात्रे ॥३॥
करुण कवित्व एकादश टीका । भागवत देखा हरीलीला ॥४॥
निळा म्हणे अपार करुनि अभंग । तोडीला उद्वेग संसारीचा ॥५॥

आणिकही ग्रंथ प्रमाण अष्तादश । वदविले सुरस गुरुकृपे ॥१॥
रामायण अदभुत सप्तकांड साचार । तवं प्रयाण विचार आरंभीला ॥२॥
समाधी सुखाचा सोहळा अपार । होतो जयजयकार प्रतिष्टानी ॥३॥
निळा म्हणे ऐसा ब्रम्हानंद झाला । आनंद लोटला आनंदाचा ॥४॥

पताकांचे भार वैष्णव नाचती । रामकृष्ण गाती नामावळी ॥१॥
शके पंधराशे असती अकरा । विजय संवत्सरा फाल्गुन मास ॥२॥
उत्तम हे षष्टी दिवस रविवार । प्रयाण साचार दोनप्रहरी ॥३॥
निळा म्हणे ऐशा नामाच्या गजरी । समाधी गोजिरी प्रतिष्टानी ॥४॥


श्री संत जगदगुरु तुकराम महराजांचे समाधीचे अभंग

आपुल्या माहेरा जाईन मी आता । निरोप या संता हाती आला ॥१॥
सुख दु:ख माझे आइकिले कानी । कळवळा मनी करुणेचा ॥२॥
करुनी सिध्द मूक साउले भातुके । येती दिसे ऐके न्यायवासी ॥३॥
त्याची पंथे माझे लागलेसे चित्त । वात पाहे नित्य माहेराची ॥४॥
तुका म्हणे आता येतील न्यायवया । अंगे आपुलीया मायबाप ॥५॥

पैले आले हरि । शंख चक्र शोभे करी ॥१॥
गरुड येतो फडत्कारे । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥२॥
मुगुट कुंड्लाच्या दीप्ती । तेजे लोपला गभस्ति ॥३॥
मेघशामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजरी ॥४॥
चर्तुभुज वैजयंती । गळा माल हे रुळती ॥५॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दासी दिशा ॥६॥
तुका झालासे संतुष्ट । घरा आले वैकुंठपीठ ॥७॥

आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥
वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलवीतो ॥२॥
अंतकाळी विठो आम्हासी पावला । कुडी सहित झाला गुप्त तुका ॥३॥

बोलिलो ते आतां पाळावे वचन । ऐसे पुण्य कोण माझे गांठी ॥१॥
जातो आतां आदन्या घेउनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करू कोठे ॥२॥
न घडे यावरी न धरवे धीर । पीड्ता हे राष्ट्र देखोनि ॥३॥
हाती धरोनीया देवे नेला तुका । जेथे नाही लोकां परीश्रम ॥४॥

सकळही माझी बोळवण करा । परतोंनी घरा जावे तुम्ही ॥१॥
कर्मधर्म तुम्हा असावे कल्यान । घ्या माझे वचन आशीर्वाद ॥२॥
वाढवुनी दिले एकाचीये हाती । सकळ निश्चिती झाली तेथे ॥३॥
आता मज जाणे प्राणेश्वरासवे । मी माझीया भावे अनुसरलो ॥४॥