भागवताचार्य आनंदभुषण गुरुवर्य ह.भ.प.पोपट महाराज चकवे.
श्री क्षेत्र पारगावं (मढ), ता-जुन्नर, जि-पुणे.

संतांची कृपा जीवावर होते त्या प्रक्रीयेला अनुग्रह म्हणतात. संकल्प, शब्द, दृष्टी, स्पर्श या क्रियेद्वारे ते आपल्यावर कृपा करतात.

ते पहाटेविण पहावीत । अम्रुतेविण जीववीत योगेवीण दावीत । कैवल्य डोळा ॥

अहेतुकपने ते क्रुपा करतात. कोणतेही साधन करायची सुध्दा नाही. नाम हेच भगवंताचे मुर्तीमंत रुप आहे व दुसरे मुर्तिमंत रुप म्हणजे संत परंतु अलौकीक नोहावे लोकांप्रती म्हणुन ते आपल्यालाला नामाचा उपदेश करतात. मंत्राने कुंडलीनी शक्ती जाग्रुत करुन स्वता:च्या भक्तीला लावणार्‍यांची जात ती नव्हे. नामाच्या माध्यमातुन हीच प्रक्रिया घडते. तीचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजेच अष्‍टसात्‍वीक भाव प्रेमाची (भक्‍तीची) प्रथम अवस्‍था. म्‍हणुनच माऊली ज्ञानोबाराय हरिपाठात म्‍हणतात

भावेवीण देव न कळे न निसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥

स्‍वामी विवेकानंदांचे ''धर्माचा गाभा-अनुभव'' हे पुस्‍तक वाचा. त्‍यात त्‍यांनी अनुभव (आत्‍मसाक्षात्‍कार) या तत्‍वाला किती महत्‍व दिले आहे हे पहा. आता संप्रदायात याच गोष्‍टीची किती कमतरता आहे. सर्व संतांनी अनुभवलाला दिलेली प्रधानता वर्णन करायची तर स्‍वतंत्र एक ग्रंथच अनुभव या शब्‍दावर होईल, नव्‍हे नव्‍हे त्‍यांचा एकही शब्‍द बिगर अनुभवचा नाही आपले काय । म्‍हणूनच त्‍याला 'अभंग वाणी' म्‍हणतात. आम्‍ही मात्र त्‍या अभंग वाणीचा शोध घेण्‍याऐवजी ते तालासूरात म्‍हणण्‍यातच धन्‍यता मानू लागलो. आपली सुटका करुन घेण्‍याऐवजी कीर्तनातून अभंग सोडवून दाखवू लागलो. मला तर त्‍यांच्‍या बुध्‍दीची कीव करावीसी वाटते आणि संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांच्‍यासारखे महात्‍मे तोच अनुभव जगाला प्रत्‍यक्ष नामाद्वारे देत असताना होणा-या अष्‍टसात्विक भावाच्‍या अनुभवाला हेच कीर्तनकार/प्रवचनकार जेंव्‍हा दर्शन देतात तेंव्‍हा मला त्‍यांची कीव न येता त्‍यांचा जीव घ्‍यावासा वाटतो. अज्ञानांची कीव येणे ठीक आहे. कीर्तन संतानी करावे पण तो आता व्‍यवसाय झाला आहे. तमाशाची जागा सोडून तमासगीर इकडे आले आहेत. भगवंताच्‍या मायेचे हेही एक रुप. राक्षस राक्षसरुपाने समोर आला तर कळेल, पण रामायणाचार्य बणून आला तर कळेल? हनुमंत रायाला कालनेमीने फसवले तर आमची काय बिशाद.

पोटा साठी संत । झाले कलीत बहुत ॥

असे म्‍हणनारे तुकोबाराय म्‍हणूनच आम्‍हाला सावध करतात-

सोंगे छंदे काही । देव जोडे ऐसे नाही ॥१॥

सारा अवघे गबाळ । डोळया आडील पडळ ॥२॥ तोच कळवळा धारण करणारे संत श्रीपाद बाबा अशा पाखांडयांचे खंडन करायचे पण आम्‍हाला ते ठीक वाटाचे. पार वाटोळे झाले तरी आमची स्‍तुती गाणारे भाटच आम्‍हाला प्रिय वाटतात. कीती संत गमावले आम्‍ही ।
संत श्रीपाद बाबा म्‍हणजे मुर्तीमंत ज्ञानेश्‍वरी व संत रामदास बाबा म्‍हणजे मुर्तीमंत भागवत. ज्ञानेश्‍वरी भागवताला ते इंडीयन पिनल कोड व तुकोबाची गाथा म्‍हणजे अनुभव प्रमाण मानायचे.

जो मोले मदिरा खाय । तोही मदीरानंदे नाचे गाये । जेणे ब्रह्मानंद रस सेविला आहे । तो केवी राहे आवरला ॥

या लागी तो लोकबाहयता । नाचे ब्रह्मउन्‍मादता । लोग मानीती तया पिशाश्‍चता । बोधु पंडीता सहसा न कळे ॥ (एकनाथी भागवत)

संत श्रीपाद बाबा व संत रामदासबाबा काही मुठभर धर्ममार्तंडाना मान्‍य नसतील, पण संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम,संत नामदेव तरी मान्‍य असावेत ना । कीर्तन प्रवचन,वारी,वैष्‍णव मेळावा, अखंड हरिनाम सप्‍ताहांद्वारे जनसामान्‍यांपर्यत भगवत भक्ति प्रसारीत करणारे संत श्रीपाद बाबा ज्ञानेश्‍वरीला जीव की प्राण माणीत. कालाच्‍या ओघात प्रसार माध्‍यमे बदलत चाललीत. ज्ञानेश्‍वरी इंटरनेटवर पोहचली. प्रत्‍येक परमार्थ प्रेमीला कृतकृत्‍य झाल्‍यासारखे वाटले. निवृत्‍ती नाथांकडे माऊली ज्ञानोबा रायांनी मागीतलेल्‍या पसायदानाची पुर्तता झाली. संत श्रीपाद बाबांच्‍या भक्‍तांनी पण ज्‍यांनी त्‍यांना पाहीले नाही त्‍यांच्‍यासाठी इंटरनेटच्‍या माध्‍यमाची निवड केली. गुरुवर्य ह.भ.प. गोविंदबाबा गाडगे (साकोरी) आणि गुरुवर्य ह.भ.प.ज्ञानेश्‍वर महाराज झणझणे (ओतुर) यांच्‍या कार्याची ती पोचपावती ठरली. या साईटवरील उत्‍कृष्‍ट माहिती पाहिल्यावर संत श्रीपादबाबा व संत रामदास बाबा यांचे दर्शनच घडते. माऊली ज्ञानोबाराय,तुकोबाराय आदी संतांचे यथार्थ कार्य करणा-या महात्म्यांचे महत्‍व कळते. परमार्थाची रित व अनुभव कळतो.
"श्रीपाद आनंदयात्री" या वार्षिकांक स्मरणीकेद्वारे वेगवेगळे विषय घेउन गेली बारा वर्षे (एक तप) मी संत श्रीपादबाबा व रामदास बाबांच्या कृपेने जी वांग:मयसेवा केली,त्यात 'अष्टसात्वीक भाव' या विशेषांकात जवळजवळ पंधरा ते वीस ग्रंथातील पुरावे (अनुभव) दिले आहेत. तसेच बाबांनी सांगीतलेले दृष्टांत-"दृष्टांत संग्रह" विशेषांकातुन आपण या वेबसाईटवरुन प्रकाशीत करुन साधकांना उपलब्ध करुन दिलेत त्याबद्दल आपणाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. मागील अंकाची साधक मागणी करतात त्यांच्यासाठी एक नम्र सूचना या अभिप्रायाद्वारे मी करतो की, त्यांनी या वेबसाईटचा लाभ घ्यावा.
या वेबसाईटवर 'अष्टसात्वीक भाव' या विषयावर संत गोरोबा महाराज, सेना महाराज, बोधला महाराज, चोखोबा महाराज, सोयराबाई, भानुदास महाराज, कान्होबाराय, निळोबाराय, संत एकनाथ, गोनाई, नामदेव संवाद, नामदेवाची अवस्था, विठठलाची अवस्था (संत नामदेव गाथा), संत तुकाराम महाराजांचे प्रेमाबद्दलचे आणि संताचे उदगार अत्यंत उत्क्रुष्टपने मांडले आहेत. संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा पालखी सोहळ्याचे व्हिडीओ चित्रण तर वारीची आठवण करुन देते. साधकांचे अनुभव,कीर्तनाचे व्‍हीडीओ भजनावली मधून हरिपाठ,काकडा भजन,एकनाथ महाराज हरिपाठ विवरण चिरंजीव पद, नारद भक्‍तीसूत्रे, प्रबोंधन, संत वा:गमय, ज्ञानेश्‍वरीतील अष्‍टसात्‍वीक भाव सारेच अप्रतीमपणे मांडले आहे. संत श्रीपादबाबांचा पुण्‍यातिथी सोहळा ह.भ.प.गुरुवर्य गोविदबाबा गाडगे यांच्‍या कीर्तनाचा व्‍हीडीओ, व ह.भ.प. मच्छिंद्र महाराज भोसले यांचे श्रीपाद बाबांच्‍या पुण्‍यातीथीबाबत प्रस्‍ताविक, इत्‍यादी साधकांना प्रेरणादायी व परमार्थाविषयी अप्रतीम भाव जागृत होण्‍यास उत्‍तम आहे. या वेबसाईटद्वारे आपण संताची सेवाच करीत आहात. अशीच सेवा अखंडपणे सर्व साधक वारकरी बंधूंना उपलब्‍ध करुन द्याल अशी आशा बाळगतो व या वेबसाईटला प्रथम वर्धापन दिनानि‍मीत्‍त हार्दिक शुभेच्‍छा देतो.