वै.शांतामाई या एक स्त्री भक्त साधारण चाळीस वर्षापूर्वी निंभोरे या गांवी होऊन गेल्या. जन्माजन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना लहानपणापासून भगवदभक्तीची आवड व भजनाविषयी प्रेम होते असे दिसते. आपल्या सदगुरुविषयी पूर्ण निष्ठा आणि सतत भगवंताच्या ध्यानात लीन वृत्ती यामुळे त्यांच्या बुध्दीत काही परमार्थ ज्ञानाची किरणे प्रकाशु लागली. त्याचा पारिणाम म्हणून उत्स्फुर्त अशी अभंगरचना या अशिक्षीत स्त्रीच्या मुखांतून बाहेर पडू लागली. ती लिहून ठेवण्याचे काम त्यांच्या काही भक्त मंडळींनी केले व आज आपल्यासमोर ते अभंग मुद्रित स्वरुपात येत आहेत.
या अभंगाची भाषा व अनेक ठिकाणी त्यातील विचार पहाता एका मागासलेल्या जातीतील व लौकिक शिक्षणाचा संस्कार नसलेल्या स्त्रीची ही वाणी आहे. याचे नवले वाटते, पण संतवाःगमयाचे संस्कार व अंतःकरणात मुरलेला बोध यामुळे ते शक्य आहे हे पूर्वीच्या जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई, इत्यादि संत स्रियांची उदाहरणे पहाता पटते. प.पू.शांतामाईच्या या अभंगामध्ये नामपर, पंढरीपर, संतपर, उपदेशपर, करुणापर अनुभवपर इत्यादि सर्व प्रकार आढळतात व त्यांच्यावरील संताच्या वाःडमयाचा प्रभाव स्पष्ट आहे. अभंगाची भाषा साधी पण स्पष्ट आणि आकर्षक असून थोडक्या शब्दात योग्य तो भाव प्रकट करणारी आहे. हा अभंगगाथा प्रसिध्द करुन पू.शांतामाईनी स्मृती चिरंतन करुन ठेवण्याचे कार्य तर साधले आहेच, पण त्याबरोबरच भाविकांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वा:डमय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याचा लाभ जिज्ञासूनी अवश्य करुन घ्यावा.
परमार्थ करणे, भक्तीज्ञान वैराग्याचा अनुभव घेणे ही कोणा विशिष्ट जातीची मक्तेदारी नाही. स्त्री-पुरुषापैकी कोणालाही परमार्थ करुन त्याचा अनुभव घेता येतो. प्रस्तुत चरित्र नायिका आणि अभंग गाथेची कर्ती प.पू.शांतामाई तथा संतामाई यांनी परमार्थ केला व अनुभव घेतला. नवल या पेक्षा वेगळे आहे की संतामाई कोळी जातीत जन्माला आली होती व त्या काळात विशेषतः खेडेगांवात स्त्रीशिक्षणाचा प्रसार झाला नव्हता. तरी पण हल्लीच्या स्त्रीशिक्षाणापेक्षाही उत्कृष्ट अभंगरचना होऊ शकते याचे उदाहरण माईंची गाथा आहे. गाथेत बोलते श्री संत चोखोबांची अशिशिक्ष पत्नी ''चहू देहाची तुटली दोनी । म्हणे चोख्याची महारी ॥'' चार देहाची दोरी तुटणे म्हणजे काय?
एखाद्या वेतांनी विद्वान मनुष्यालाही समजणार नाही अशी ही अशिक्षीत महारी आपला अनुभव सांगून जाते. हीच स्थिती शांतामाईच्या अभंगाची आहे. माईच्या अभंगावर जगदगुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाची छाप पडलेली दिसते. पण ११ व १३ व्या अभंगात सुरवातीला- नवविधा काय बोलिले जे भक्ती ॥ बोलावा विठठल पहावा विठठल ॥ असे हे श्री तुकोबारायांचेच शब्द आहेत. यावरुन शांतामाईनी संत ग्रंथ कृपेने वाचले असावेत हे निश्चित त्यांच्या जीवनात भागवत धर्माचा अविष्कार पुरेपूर दिसतो अखंड उन्मनी अवस्थेतून त्यांची हरिभक्ती होती.
एवं व्रतःस्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागी दुतचित उच्चैः ।
हसत्थो रोदिति रौति गायत्युन्मास्वत्न्नृपति लोक बाह्मः ॥
या भागवत धर्माची अवस्था त्यांच्या अंगी बाणली होती. अभंग गाथा आणि त्याच्या चरित्रातील अवस्था या दोन गोष्टींचा विचार केल्यास श्री.शांतामाई पूर्व जन्मातील योगभ्रष्ट होत्या आणि वर्तमान जन्मात शिक्षण न घेताहि पूर्वीचा बुध्दि संयोग झाला होता असेच म्हणावे लागते. वे.शा.स.पंढरीनाथ रामचंद्र जोशी तथा बाजुजी गुरुजी यांनी मोठ्या परिश्रमाने माईचा गाथा प्रकाशित करुन शांतरसात आणि संत वाडःमयात भर घातली आहे याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन माझ्याप्रमाणे वाचकांनीही करावे.
महाराष्ट्र ही संताची खाण असल्याने तेथे संत संप्रदायाची वाण केंव्हाच पडली नाही, याची जाण देशातील सर्व अध्यात्म जिज्ञासूस आहे. भक्तिविश्वातील सुप्रसिध्द अशा स्वरुप, आनंद, नाथ व चैतन्य या चार संप्रदयाच्या प्रवाहातून भक्ति मार्गाची नदी हजारो वर्षे वाहत आहे. त्यात भक्तिमार्गी साधक सुस्नात होऊन स्वतःसह समाजाचे जीवन पावन करीत आले आहेत. त्यातून आनंद संप्रदायात आपला ठसा उमटविणारी संत सौ. शान्ता उर्फ संतामाई व संत संख्यास्वामी ही अधिकारी अशी गुरुशिष्याची जोडी. ए-हवी इतर संप्रदायाप्रमाणे आनंद संप्रदायातही दांभिक गुरुंचा धुमाकूळ समाजत दिसून येतो. मात्र त्यातहि हि-याप्रमाणे सौ. संतामाई व सखयास्वामींचे जीवन उजळून दिसते. त्यांत संतामाईची सखयास्वामींच्या कृपेने समोर आलेली अभंगरचना तर अन्य संत वाडःगमयाप्रमाणेच सुलभ, सरळ, सरस आणि सुरस अशी असून प्रासादिकही आहे. सर्व सांप्रदायिकांस नाही तरी आनंद संप्रदायाच्या साधक भ्रमरांना या अभंगकमलाचा पराग निश्चतच वेधून घेत असेल. मात्र त्यांसाठी नुसता साधक नव्हे तर अन्तरंग असा अधिकारीच असणे आवश्यक आहे.
श्रीएकनाथहि अदिनारायण - ब्रह्मदेव - अत्रि - दत्तात्रय - जनार्दन स्वामी - एकनाथ अशी आपली आनंद संप्रदाय परंपरा सांगतात. "मुख्य महाविष्णु चैतन्याचेमूळ । संप्रदाय सकळ तेथोनियां ॥" या अभंगात आपली दहा गुरुंची परंपरा सांगितली आहे.
श्री निवृत्तीनाथ महाराज आपली नाथपरंपरा आदिनाथापासून म्हणजेच भगवान शंकरापासून असल्याचे सांगतात. "आदिनाथ उमा बीज प्रगटले । मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ॥ तेची प्रेममुद्रा गोरखा दिधली । पूर्ण कृपा केली गहिणीनाथ ॥" या अभंगातून तर श्री ज्ञानराज माऊली -"आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा ।" या अभंगातून सांगतात.
श्री संत तुकाराम महाराज हे "राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥"या अमृत अक्षरांनी गुरुपरंपरेची कांस धरतात.
त्याचप्रमाणे अलिकडील काळात संतामाई व सखयास्वामी यांनी श्रीगुरुसेवानिरत जीवन जगत स्वतःसह समाजास धन्य केले आहे. संतामाईंना लाभलेला गुरुबोध त्यांच्या अभंग वाडःमयातून ओसंडत आहे. अद्वेतबोध, भक्तिभाव, वैराग्य, अर्थात ज्ञान, भक्ति,शान्ति, विरक्ति व गुरुनिष्ठा अशी पंचतत्वे स्पष्टपणे दृस्टिगोचर होतात. योगभ्रष्ट साधकाच्या जीवनात पूर्वजन्मीचा बुध्दिसंयोग होता तर भक्तिमार्ग भक्तजीवनात श्रीगरु अनुग्रहातून शक्तिपात होऊन -
आणि वेदाचियेहि मति ठेले । ते लागला बोलो ॥ (ज्ञानेश्वरी ११-१८३)
म्हणून योगभ्रष्ट ही साधकावस्था व शक्त्यनुग्रहीत भक्त जीवन या दोन गोष्टी भिन्न आहेत. योगभ्रष्टता हे शास्त्र आहे व शक्तिपात - अनुग्रह हा अनुभव आहे.शास्त्र आणि संत या परमार्थ क्षेत्रातील भिन्न अवस्था आहेत. म्हणून संत मालिकेत जाऊन बसविलेल्यांचे जीवन योगभ्रष्ट स्थितीने मोजता येत नाही. तो संत अनुभूतीचा एक आगळा चमत्कार आहे. हेच दर्शन श्रीसंतामाईच्या गाथ्यातून आपल्या माथ्यांत येते व म्हणावे वाटते की - श्रीसंताचिये माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥
ह.भ.प श्री हंसानंद स्वामी हे तंत त्या परंपरेत वाढलेले साधू आहेत. त्यांची अन्तरंग ज्ञान जिज्ञासा विशुध्द व तीव्र आहे. आळंदी, पंढरी, पैठण क्षेत्र आमच्या कीर्तन-प्रवचन प्रसंगीच्या असंख्य श्रोत्यांपैकी ते अग्रणी असे श्रोते आहेत. अनेक वर्षे आमचे समोर बसून श्रवण करुनहि आपला परिचय त्यांनी करुन दिला नाही. मात्र आम्हा वैष्णवांच्या पांढ-या शुभ्र पोषाखात हि भगव्या वस्त्रांनी विभूषित वैराग्यमूर्ती अनेकांचे मन वेधत असते. त्यांच्याद्वारा श्रीसंतामाईच्या गाथ्याचे पुनर्प्रकाशन हा त्यांच्या जीवनाचा एक आनंद क्षण आहे. त्यात सहभागी होण्याचा सुयोग आम्हालाही सुवर्णसंधी आहे.
आनंद संप्रदायचे बीज भागवत अध्याय तेरा मध्ये आहे. तेथे सनकादिकांनी केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वतः भगवान विष्णूच हंसस्वरुपात अवतीर्ण झाले.
तस्याहं हंसरुपेण सकाशमगतं तदा । (ए.भा.१३/१९)
नातळे वर्णव्यक्ति विलास । तो मी श्वेतवर्ण स्वप्रकाश ।
स्वयें झालो राजहंस । ब्रह्मपुत्रांस उपदेशावया ॥ (ए.भा.१३-२८८)
तोच हंस-ब्रह्मा गुरुशिष्य प्रश्नोत्तररुप संवाद हा आनंद संप्रदायचे बीज आहे. त्यासाठी अनेकांनी आयुष्यात झीज घेऊन स्वात्मसुखाची वीज प्रकाशित केली आहे. असंख्य साधक त्याच प्रकाशात आपले जीवन उजळीत आहेत. असो. प्रस्तुत अभंग गाथ्याच्या उपदेशाद्वारा साधकांच्या आत्मद्वाराला उजाळा येवो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
ओंम नमो श्री बलभीमा । काय वर्णु तुमचा महिमा ॥१॥
वेदा न कळेचि गुढ । तेथे माझा काय पाड ॥२॥
बहु साधने ती केली । परी वेगळी राहिली ॥३॥
किल्ली आली हाता । कृपा भांडवल सोडिता ॥४ ॥
बलभीमदास सखया नाचे । ऐसे देणे हे कृपेचे ॥५॥
बलभीम आनंदाचे स्थळ । बलभीम स्वरुप निर्मळ । बलभीम परब्रहृम केवळ भक्ता घरी नांदतसे ॥१॥
बलभीम सगुण साकार । त्रैलोक्य त्यांचे घर । आहे एकवीस स्वर्गावर । सप्त पाताळी राहतेस ॥२॥
बलभीम अवतार दीप । सुंदर सावळे स्वरुप । कृपा कळवळयाचे माप । साडे गांवी वसतसे ॥३॥
या या संताची पायधुळी । सखया लोळे चरण कमळी । संता त्याची लाडकी बाळी । मागे मागे हिंडतसे ॥४॥
मोरा परळ दोन नांव । एक मातीचा स्वभाव ॥१॥
तैसा देह त्याच्या परी । त्याहूनी असंग आत्माराम हरी ॥२॥
तरी नाव भिन्न भिन्न । एक परमेश्वर जाण ॥३॥
सखयाची संती म्हणे । एका संगे सुख घेणे ॥४॥
अंगे झाला देव थोर । ब्रम्हा विष्णुचा अवतार ॥१॥
शास्त्र पुराण हे जाणा सत्य जाणून घ्याव्या खुणा ॥२॥
त्याचा निवाडा हे करा । सच्चिदानंद मनी धरा ॥३॥
संती सखयाकृपे सांगे । अनिर्वाच्य सुख अंगे ॥४॥
सांगता वाणीही ख़ुंट्ली । साक्षात हरी भेट झाली ॥१॥
देवा तुझे तुच पहाणे । इतरासी काय जाणे ॥२॥
गुरु शिष्याची ओळख । संत जाणीला भगवंत ॥३॥
संती सखयाकृपे सांगे । शिष्याच्या विश्वास भगवंत अंगे ॥४॥
सदगुरू जाणा ब्रम्हचारी । त्यासी विठ्ठल म्हणा हरी ॥१॥
निष्ठावंत धरा पक्का । त्याला कदा सोडु नका ॥२॥
इकडे तिकडे निसटेल जरी । बांधा भक्तिच्या पदरी ॥३॥
संती सखया कृपेसांगे । तुझ्या लागेन मी मागे ॥४॥
मागे लागून स्वहित होई । उगे बैसोनी मिळेना काही ॥१॥
तुमचा सोडिना मी संग । ब्रम्हज्ञान द्या मज चांग ॥२॥
बोध आरसा द्यावा हाती । नित्य घडावी सुख प्राप्ती ॥३॥
संती सखयाकृपे सांगे स्वतंत्र करी मज अंगे ॥४॥
स्वतंत्र केल्यावरी । परमेश्वर नाही दुरी ॥१॥
कुठे जाशील आता हरी । किती दिवस धुंडाळल्यावरही ॥२॥
बहुत दिवस झाले दिन । आता उतरा माझा शिण ॥३॥
संती सखया कृपे सांगे । प्रेम छंदे डोलू लागे ॥४॥
आंत बाहेर रंगली । देवा सत्य कृपा झाली ॥१॥
अढळ पदी बैसविले । त्याचे नामे तरुन गेले ॥२॥
ऐसे आम्हा कोण तारी । तुम्हां शरणांगत हरी ॥३॥
संती सखया कृपे सांगे । वैष्णवांच्या सुख आंगे ॥४॥
ऐसे आले अनन्य शरण । सुख पाहिजे हे देणे ॥१॥
निजपदी राखा आम्हा । म्हणऊनी विनवणी ही तुम्हा ॥२॥
तुझे धरीले म्या मुळे । सुख आम्हा दयाळ ॥३॥
संती सखयाकृपे । देव साधनाच्या संगे ॥४॥
जीवपण गेले हरपुन । तुझे लागलेसे ध्यान ॥१॥
आनंद वृत्ती सूक्ष्म दृष्टि । परतूनि पहा उफराटी ॥२॥
सांठविला हदय पोटी । आता झाली देवा भेटी ॥३॥
संती सखयाकृपे सांगे । वैष्णवांच्या सुख अंगे ॥४॥
कारे झाकीलासी डोळा । पहा मुक्तिचा सोहळा ॥१॥
पहाता पहाणे हरपले । अंगे तद्रुप हे झाले ॥२॥
नाही आठव जीवाचा । ज्ञान डोळा पहा ते शिवाचा ॥३॥
संती सखयाकृपे सांगे । दु:ख केले दोन भागे ॥४॥
येते माझे मनी फार ।काय धरीना निर्धार ॥१॥
आळविते नानापरी । चित्त आत्मारामा शेजारी ॥२॥
आता मना कुठे जाशी । तुला बांधीन संत पायाशी ॥३॥
संती सखयाकृपे सांगे । काढी न खोड देवा अंगे ॥४॥
जडले देवाचे हे अंग । मना फेडीला तुझा पांग ॥१॥
धाव खुंटोविया गेली । आनंद पदी स्थिरावली ॥२॥
ऐसा धरिला हो धीर । चैतन्य नाम ऐका सुंदर ॥३॥
सखयाची संती म्हणे । लक्ष ठेवा त्याचे चरणी ॥४॥
सखयानंद नारायणा । धीर द्यावा माझ्या मना ॥१॥
वृत्ती राखा पायापासी । धन्य भाग्यवंता काशी ॥२॥
कल्पतरु दुणावला । बोध पुत्र हाती दिला ॥३॥
सखयाची संती म्हणे । आता आम्हा काय उणे ॥४॥
चंदन सापडला आज । आपणास सारखे केले सहज ॥१॥
लोह परिसाचे वरी । सखयानंद तोच हरी ॥२॥
माता घेई बाळकासी । पुत्र जन्मला कुशी ॥३॥
सखयाची संती म्हणे । क्षमा करा संत जनी ॥४॥
क्षमा केली तुम्हा नाथा । जनार्दन आमुचा पिता ॥१॥
ऐसे दत्तात्रयाचे कुळी । रचना केली नामावळी ॥२॥
बलभीम बाबांची ही किर्ती । सखयानंद हे विश्रांती ॥३॥
संती सखयाकृपे हे सांगे । लक्ष्मणा धन्य भाग्य ॥४॥
मुक्त केले मुक्ताबाई । देवा दत्तात्रयाच्या पायी ॥१॥
तिही लोकी लावीला झेंडा । सापडला बोध हंडा ॥२॥
संत कुळी लावीला दिवा । सखयानंद माझे देवा ॥३॥
संती सखया कृपा झाली । बलभीम बाबाची चेली ॥४॥
जनार्दनाचा सुख वारा । तुमच्या पदी ब्रह्म थारा ॥१॥
सुख शांती दिली एक । तुम्हा शरणांगत देव ॥२॥
तुमचे भजन अखंड घडो । सुख वाडे कोडे वाढो ॥३॥
सखयाची संती म्हणे । तुमच्या चरणी जडली नामे ॥४॥
मिराबाईची कोण गती । मायबाप अती गांजिती ॥१॥
देवा चरणी झाली रती । तिची जडून गेली प्रीती ॥२॥
सत्व सांभाळिले किती । प्याला विषाचा घोटिती ॥३॥
सखयाची संती म्हणे । देवावरी भाव ठेवणे ॥४॥
ऐसा बळकट धरा भावो । देह जावो अथवा राहो ॥१॥
भाग्याचे सत्व थोर । तिचा देवाचरणी निर्धार ॥२॥
तिचा पती अती सुंदर । भागीरथी दान दिले उध्दार ॥३॥
संती सखयाकृपे सांगे । ऐसी भक्ताची करणी ॥४॥
तैसा करावा निर्धार । सर्व सोडावा संसार ॥१॥
तिळभर धरु नका लेश । मुला लेकराची आस ॥२॥
कोण कुणाचे नाही बापा । देवाचरणी घाला झेपा ॥३॥
सखयाची संती म्हणे । आपण करुन पहाणे ॥४॥
खरे खरे सत्य करा । सोडा मायेच्या बाजारा ॥१॥
फसू नका यात बरे । विठठल जोडा सहकारी ॥२॥
भलत्या विषयी बोलू नका । जागे व्हा निजसुखा ॥३॥
सखयाची संती म्हणे । भक्ती जन्मावी मनी ॥४॥
ज्याशी जन्मली हे भक्ती । त्यासी आली शीवशक्ती ॥१॥
ऐसा शक्तीचा हा गुण । केली साधना लागून ॥२॥
हरीरुप तोची झाला । त्याशी अनुभव आला ॥३॥
सखयाची संती म्हणे । त्याचा विकास संता चरणी ॥४॥
ज्याचा विश्वास देहावरी । मग कैचा भेटेल हरी ॥१॥
देह भाव धरु नको । रिकाम्या रानी बोलू नका ॥२॥
आपल्या सखापाठी लागा । भाव भक्ति करी चांग ॥३॥
सखयाची संती म्हणे । धन बांधिले खचून ॥४॥
माझा संसार म्हणाल जरी । जिवा येईल काळ फेरी ॥१॥
म्हणून स्वहित हे करा । संतचरण धावूनी धरा ॥२॥
ऐसे सुख देता दाता । तुम्ही घेते व्हारे आता ॥३॥
सखयाची संती म्हणे । त्याचे पुर्ण भाग्य जाणे ॥४॥
करविता तोची हरी । परमेश्वर नाही दुरी ॥१॥
तुझ्यावरी आमची सत्ता । परमार्थ द्यावा हाता ॥२॥
तोची हरी मागो पुढे । उगवे संकटाचे कोढे ॥३॥
सखयाची संती म्हणे । प्रेमानंद उचित देणे ॥४॥
ज्याने उचित केले दान । कन्या कुळ उध्दरण ॥१॥
तैसे करी आम्हा देवा । बरवे बरवे केशवा ॥२॥
नका उशीर लावू हरी । आत्मसुख द्या झडकरी ॥३॥
म्हणे सखयाची संती । लोटांगणा तुम्हाप्रती ॥४॥
तुमच्या नामे तरलो आम्ही । कृपा केली सदगुरु स्वामी ॥१॥
कुठवर वर्णू तुमची किर्ती । आनंदली चित्तवृत्ती ॥२॥
माझया जीवाची विश्रांती । तुमचे पाऊलांची स्मृती ॥३॥
सखयाची संती म्हणे । मना झाले समाधान ॥४॥
समाधान तुर्या भेटी । सुखलाभ उठाउठी ॥१॥
चरण गोमटे पाहिले । नाम कंठी साठविले ॥२॥
बोलू वाटे तुझ्या गोष्टी । मना आवड हे मोठी ॥३॥
सखयाची म्हणे संती । देवा पुरवावी आरती ॥४॥
ज्याने संत संग केला । अंगे पांडुरंग झाला ॥१॥
केली रोकडी ही भक्ति । चारी मुक्ती धाऊनी येती ॥२॥
ऐसे परेचे हे सुख । दाविताती संत देख ॥३॥
ऐसी आलिसे प्रचिती । म्हणे सखयाची संती ॥४॥
संत संगतीचा लाभ । त्यासी नाही देव लांब ॥१॥
संत संगाचिया मेळी । सापडेल हा जवळी ॥२॥
नका होऊ रानभरी । भाव राखा रे जवळी ॥३॥
उघड डोळे ज्ञानदृष्टी । सखयाकृपे म्हणे संती ॥४॥
ऐसे संताचे नवल । जीवा अनुभव येईल ॥१॥
वासना विरुनी जाईल । देह विठठल होईल ॥२॥
अंगी आनंदाची पुष्टी । आत्माराम समदृष्टी ॥३॥
संती सखयाकृपे म्हणे । मनी भाव धरला जेणे ॥४॥
संत संगती हे करा । देह पंढरी ओळखी धरा ॥१॥
ज्याने जाणिली पंढरी । त्यासी सापडीला हरी ॥२॥
धरिले अधिष्ठान मुळ । दीप लाविला सोज्वळ ॥३॥
संती सखयाकृपे म्हणे । आता सुखा काय उणे ॥४॥
सुख एक दावी संत । सत्चिदानंद विठठलनाथ ॥१॥
अंत नाही या सुखाला । काय सांगू मी लोकाला ॥२॥
ज्याचा अनुभव त्याला । अंगे पांडुरंग झाला ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । आनंद झाला मने ॥४॥
संत संगत गाठली । तईच विठाई भेटली ॥१॥
नाही तरी काय ठावे । मन भलतीकडे धावे ॥२॥
म्हणूनी जागे व्हारे वेगे । स्वतः विठठल व्हाल अंगे ॥३॥
संती सखयाकृपे म्हणे । परमेश्वर मुख्य जाणे ॥४॥
दिला संती जाणून देव । सोपा सुलभ उपाव ॥१॥
ऐसा संत हाची थोर । केला जगाचा उध्दार ॥२॥
काय सांगू त्याची किर्ती । सुख दाखविले श्रांती ॥३॥
संती सखयाकृपे म्हणे । त्याची दया तोची जाणे ॥४॥
घ्यारे घ्यारे संत तीर्थ । सुख होईल हे प्रापत ॥१॥
बाहुनी आणिक करु नका । सखयानंद घरा सखा ॥२॥
पावली पावली या चला । सुख होईल जीवाला ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । धरा बळकट चरणे ॥४॥
ज्याने धरले संतचरण । त्याचे चुकले जन्म मरण ॥१॥
केलें दु:खचि खंडण । अंगे झाला नारायण ॥२॥
तुर्या पाहिली नयनी । अंगिकारिले देवांनी ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । तेचि भाग्यवंत धन्ये ॥४॥
चुकू नकारे पंढरी । बघ सतचिदानंद हरी ॥१॥
अंगे बहम जागे करा । पहा रुक्माईच्या वरा ॥२॥
अखंड चालू त्याचा ध्वनी । तेथे सुखा काय उणे ॥३॥
सखयाकृपे संतर म्हणे । लक्ष द्यावे त्याचे चरणी ॥४॥
संत आनंदाची ज्योत । तेथे सुखा नाही अंत ॥१॥
साधनाचे बळ धरा । धरा रुक्माईच्या वरा ॥२॥
भक्ति करिता विरक्त झाला । त्यासी अनुभव आला ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । देव घेतला जाणुनी ॥४॥
स्थूल देह मृगजळ । भास लटिका सकळ ॥१॥
ज्ञान दृष्टी हरपू नको । सत़चिदानंद हे देख ॥२॥
भास असास हे सोड । संत चरणी कर वाढ ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । देवा चरणी दृढ होणे ॥४॥
संत चरणी ज्या विश्वास । ज्याचा विरुन गेला भास ॥१॥
त्याने विवेक धरिला मनी । देव जाणिला तो धन्य ॥२॥
दिन निशी सेवा करी । त्यासी भेटेल श्री हरी ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । माझी भाक घ्या जाणूनी ॥४॥
तुम्ही ऐका माझी भाक । मनी भाव धरा एक ॥१॥
भक्ती अंतर पाडू नका । अनंतासी करा सखा ॥२॥
संती सांगती जाणून । सख्या विठ्ठलाची आण ॥३॥
संती सखयाकृपे म्हणे । भाव ठेवा संतचरणी ॥४॥
विश्वास धरा मनी एक । सुखावला देह देख ॥१॥
दृढभाव ज्याचा झाला । त्यासी अनुभव आला ॥२॥
आस्था पूर्ण केली हरी । परमेश्वर नाही दुरी ॥३॥
संती सखयाची म्हणे । सद़गुरुचा पुत्र जाणे ॥४॥
जो जडला संत पाया । त्याचे सांठविला राया ॥१॥
देह भाव विसरला । देवा चरणी रत झाला ॥२॥
प्रकृती सा रिली हे मागे । तुर्या झाला अंगे ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । आज सुखारुप होणे ॥४॥
आसनी ध्यान धारणा धरा । मन एक चित्त्त्त करा ॥१॥
स्वरुपात लीन व्हावे । त्यात गुंतोनिया जावे ॥२॥
साक्षात्कारी नाही वेळ । हरी सावळा जवळ ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । प्रेम देवाचेचि देणे ॥४॥
(४६)
आसनी बैसला सायासाने । बळकट धारणा धरुनी ॥१॥
नेत्र झाकूनी जप करी । चित्त हिंडते बाहेरी ॥२॥
व्यर्थ खटपट करुनी काही । मन विषयी धाव घेई ॥३॥
संती सखया कृपे । सोगाढोंगाचे हे करणे ॥४॥
(४७)
देवापदी जडवी चित्त । मना करावी ताकीद ॥१॥
धावू नको चहुकडे । तुझी मोडीन मी खोड ॥२॥
धाव खुंटली मनाची । भेटी झाली सज्जनाची ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । मना बांधुनी टाकावे ॥४॥
(४८)
आयुष्य गेले ऐसे सारे । केव्हा आठवीसी हरी ॥१॥
आळस धरु नको मनी । थोर सुखा होईल हानी ॥२॥
म्हणोनी जलदी करा आता । धुंडाळावा सुख दाता ॥३॥
संती सखयाकृपे म्हणे । संतचरण धरणे ॥४॥
(४९)
अल्प आयुष्य मनुष्य देही । कोणी जुमानीना पाही ॥१॥
भुलून गेले संसाराला । आपला आपण घात केला ॥२॥
तुका मारीतसे बोंब । देव नाही दुरी लांब ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । आपले आपण हित करणे ॥४॥
(५०)
चला चला पंढरी जाऊ । जाऊनिया सुख घेऊ ॥१॥
संत मिळाले अपार । करु नामाचा गजर ॥२॥
टाळ मृदंगाचा घोष । सदा सेवू ब्रह्मरस ॥३॥
सखया कृपे संती सांगे । प्रेम दुणावेल अंगे ॥४॥
(५१)
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोची मदनाचा पुतळा ॥१॥
ऐसी खरी ज्याची सेवा । कधी विसरेना देवा ॥२॥
चैन पडेना जिवाला । सेवेसाठी घाबरला ॥३॥
सखयाकृपे संती सांगे । नाचू लागे ताल संगे ॥४॥
(५२)
वाचे हरी हरी बोला । वाट पढरीची चाला ॥१॥
देह पंढरी जाणून घ्यावी । तेथे प्रभूसी भेटावे ॥२॥
साधनाचे बळ धरा ।सुख शांती लागेल वारा ॥३॥
सखयाची संती म्हणे । तोच भाग्यवंत जाणे ॥४॥
(५३)
त्यासी अनुभव आला थोर । त्यासी तुकली येरझार ॥१॥
बोध दिधला धरुनी हाती । विठठल विठठल नाम गाती ॥२॥
वैराग्याचे बळ फार । भावे धरीला मनोहर ॥३॥
सखया कृपे संती म्हणे । प्रेम भक्ती सेवा करणे ॥४॥
(५४)
आणिक दुसरे मज नको आता । धरिले मी संता सोडिचिना ॥१॥
हाची माझा देव हाची माझा हरी । ऐसे वेद चारी बोलतसे ॥२॥
गीता भागवत जाणुनी घ्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥३॥
सखया कृपे संती सांगतसे मना । विठठल चरणा धरी प्राती ॥४॥
(५५)
पिसे लागलीसे जीवा । कदा विसरेना देवा ॥१॥
नाही लोकिकाची चाड । भक्ति प्रेम लागे गोड ॥२॥
अंगी दुणावले प्रेम । मुखी उच्चारी हरीनाम ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । हेची आम्हा अखंड देणे ॥४॥
(५६)
ऐसे झाले माझ्या जीवा । उठूनी पळावे वाटे देवा ॥१॥
तो तव माझ्या मागे आहे । जावे तेथे उभा राहे ॥२॥
कैसी गती झाली मला । हरी सोडिनासा झाला ॥३॥
सखयाकृपे संती म्हणे । संगत जडली आवडीने ॥४॥
(५७)
थोर आवडीची किर्ती । भुलविले मला श्रीपती ॥१॥
काही सुचेना हे मला । तू एकला आवडला ॥२॥
एकांताचा संग घडो । देव प्रीती मला जडो ॥३॥
सखया कृपे संती ऐसी । तुमच्या चरणाची मी दासी ॥४॥
(५८)
माझे कलाहीन राहणं । वेडी म्हणताते जन ॥१॥
शुध्दा हरपली माझी । मुरली वाजली ते तुझी ॥२॥
उत्तर पडले माझ्या कानी । हरी देखिला नयनी ॥३॥
संती सखया कृपे म्हणे । गुंग झाले त्याचे ध्वनी ॥४॥
(५९)
गुंग झाले गुंग झाले । हरी चरणी रतले ॥१॥
काय प्रभु तुझी करणी । मना पाडिली मोहिनी ॥२॥
रस अमोद सेवणे । मन माहिले जगज्जीवने ॥३॥
संती सखया कृपे म्हणे । देव गुंतीला भक्तीने ॥४॥
(६०)
कृपेचा सागर ज्ञानाचा अंगार । अज्ञानाचा पार उतरुन नेई ॥१॥
तुजवीन कोणी नाही सोडवीता । आता यावे ताता लवकरी ॥२॥
शिणला माझा जीव जन्ममृत्युमधी । भेटताल कधी करुणा भाकितो ॥३॥
नका मज सासरी माहेरासी न्यावे । आराधना करावी आनंदाने ॥४॥
हेची वारंवार जोडीतसे कर । सखयानंद सदगुरु संती म्हणे ॥५॥