ऐसी कळवळ्याची जाती

ह.भ.प डॉ. बाळकृष्ण महाराज डावखरे(संगमनेर)

कलीयुगामध्‍ये जीवास सन्‍मार्ग दाखि‍वणारे व उध्‍दार करणारे फक्‍त संत महात्‍मेच आहेत.''संतावीण प्राप्‍ती नाही । ऐसे वेद देती ग्‍वाही ॥'' परंतु या जगात संत असणारे वेगळे व दिसणारे वेगळे. यामुळे अनेक भाविक जीवांची दिशाभूल होऊन ते चाचपडताना दिसतात. मात्र भाग्‍य उदयाला आल्‍यावर संतांची भेट होते. त्‍याप्रमाणे संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा व रामदास बाबा या महात्‍म्‍यांची भेट होऊन ख-या संतांची ओळख झाली. कलियुगात अवडंबर करणारे खुपच आहेत. परंतु ख-या संताची भेट झाल्‍यानंतर सुरवातीलाच काही शंका उपस्थीत झाल्‍या, त्‍या नमुद करणे आवश्यक वाटते. ज्‍यावेळेस संताना पाहिले त्‍यावेळेस जगत नियमानुसार संत इतके साधे असू शकतात का? हिच पहिली शंका सर्वांसमोर आहे. दुसरी यांच्‍याकडे गुहय असे ज्ञान आहे म्‍हणतात मग ते शिष्‍यास कसोटी लावल्‍या शिवाय गुहयज्ञान कां देतात? व तिसरी शंका म्‍हणजे त्‍यांची गुरुदक्षिणा कांय असेल? वगैरे पण संत हे काहीही जाणून न देता या सर्वांचे निरसन करतात. हे दोन्‍ही महात्मे साधेपणाने जगात राहून उच्च तत्‍वज्ञानाचा बोध करीत हे त्‍यांचे जवळ गेल्‍यानंतरच कळले, शिवाय ज्‍यावेळेस त्‍यांच्‍या वाणीतून अमृतानुभवाचे विवेचन ऐकले तेंव्‍हा त्‍यांचा अधिकार समजला. शिवाय संताच्‍या प्रमाणां प्रमाणे कोणाकडून कसलीच अपेक्षा न ठेवता कोणतीही परिक्षा न घेता मुक्‍त हस्‍ताने हे ते ज्ञान देतात. ''सकळांशी येथे आहे अधिकार । कलीयुगी उध्‍दार हरीच्‍या नामे॥' हे त्‍यांच्‍या सहवासात आल्‍यानंतरच कळले व निर्धार पक्‍का झाला की, ''ऐशी कळवळयाची जाती । करी लाभाविण प्रिती ॥'' याचा यथार्थ अनुभव अनेकांना आला.
नाशिक परिसरातच नव्‍हे तर इतरही ठिकाणी महात्म्यांच्या संगतीमध्‍ये 'निस्‍वार्थता' 'अनासक्‍ती' व 'निष्‍पृहता' अनुभवाला आली. कार्यक्रम झाल्यानंतर काही लोक बाबांना नारळ सुद्धा देत नव्हते तरी आनंदाने सर्वांचा निरोप घेऊन बाबा पुढील धर्मकार्यासाठी निघुन जात. शिवाय दुसरी गोष्ट अशी की धर्मप्रचार करताना अगदी परखड भाषेत कोणाचीही भिडभाड न ठेवता स्पष्टपणे करत.''नाही भीड भाड । तुका म्‍हणे साना थोर॥'' पुराव्यानिशी निव्वळ किर्तन प्रवचनच नव्‍हे तर संगती मधूनही परमार्थ समजावुन सांगुत. मात्र संताचे रितीमध्‍ये कुठलाही बदल न करता उपदेश करत, त्याची अंमलबजावणी कशी करावी हे स्पष्ट करता करता उपदेशाची कृती करुन घेऊन त्याची गरज कां? या एकाच शब्दात त्‍यांनी फैसला सांगीतला की, ''एक नाम तारी । बाकी सब दुकानदारी'' करारे बापानो साधन हरीचे । झणी करणीचे करु नका''आणि कुठपर्यंत करायचे तर पायाचे अंगठे बांधत नाहीत तो पर्यंत करायचे. सर्व सामान्यांनाही सहजतेने करता येणा-या नामाचा विषय समजावुन दिला. योगमार्गाचा किंवा अवघड मार्गाचा अवलंब न करता सहज सुलभ रितीने करवुन घेतले. महत्वाचे म्हणजे त्याची अंमलबजावणी कशी होते ह्याबाबत जागरुक राहून ते सदैव कसे होईल ह्याकडे नेहमी त्‍यांचा कटाक्ष असे. लौकिक व प्रसिद्धी याकडे दुर्लक्ष करुन समबुद्धीने धर्म कार्य करण्‍याची रित अर्जुनासारख्‍या साधकांमध्‍ये ठसवीली. ''अर्जुना समत्‍व चित्‍ताचे । तेची सार जाण योगाचे । तेथ मन आणि बुध्‍दीचे ऐक्‍य आधी ॥''
एकदा बाबांसोबत आम्ही सर्वजण बसलो असताना बाबा इतर कांही न बोलता फक्त परमार्थच सांगत होते. तेव्‍हा त्यांनी आमच्या दोघांचे हात हातात घेतले व म्हणाले “तू सांग डॉक्टर आहेस ना, मग तू या ताईच्या कातड्यावर प्रेम करतोस की ताईवर? हे कातडे जर काढुन घेतले तर तु तीच्यावर प्रेम करशील का?” मनुष्य फक्त नाशिवंतावर प्रेम करतो, शाश्वतावर प्रेम करित नाही. ''तुका म्‍हणे कारे नाशीवंता साठी । देवासवे तुटी पाडीतोशी'' बाबांनी बोलताना म्हणावं मी देहुला गेलो होतो. किर्तनासाठी उभा राहीलो तर एक बोर्ड बघितला '‘स्त्रीयांना किर्तनाचा अधिकार नाही’'.मग मी म्हटलो तुमच्यामध्ये आत्मा आहे आणि स्त्रीमध्ये आत्मी आहे का? अरे ''एक हरी आत्मा जीव शिव स'' असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पायलीचे पन्नास आहेत. 'परमार्थ कोणी सांगावा? जाणत्याने का नेणत्याने' असे नेणते जे कोणी आहेत ते या व्यासपीठावर उभे राहतात व मार्गदर्शन करतात. असे हे बेअब्रुच्यांकडुन काय परमार्थ ऐकावा. “आप डूबे तो डूबे और यजमान कु भी ले डूबे”
एकदा आळंदीला आम्ही गेलो बाबांचे दर्शन घ्यावे आणि तृप्त व्हावे, मस्त वाटावे परंतू एक बुवा म्हणा किंवा महात्मा म्हणा त्यांच्या दर्शनासाठी रांग लागली आम्ही लाबूंन पहात होतो त्याचे गाडीमधुन त्याच्या कॅसेट काढायचे काम चालु होते. अशांना काय म्हणावे वास्तविक पाहिले तर 'मागील परिहार पुढे नाही शिण । झालिया दर्शन एकवेळ ॥' साधुसंता वा बाबांच्या चरणाजवळ मनाची भुक तृप्त होत.
एकदा लोणीस गेलो होतो. त्‍या ठिकाणी गेल्यानंतर तेथे तीन महाभाग काय यापेक्षाही काय शब्द सांगावे ते कळत नाही. लोक दर्शनासाठी उभे राहिले व त्यांचे तारखां लिहण्याचे काम चालु होते व त्यांचे पेदे तारखां गोळा करित होते. मला फक्त एकच म्हणावेसे वाटते मला अशी एक माय भेटली । जीने जन्मभराची गाठ सोडली ॥
अधुनमधून सावरगांवाला बाबांची नेहमी फेरी असायाची, त्यावेळी आम्ही संगमनेरच्या स्टँडवर जर आणावयास आलो आणि म्हटले की बाबा आपण काहीतरी नाष्टा करू पण बाबांनी म्हणावे माझी मुलगी चित्रा सावरगांवला वाट पहात असेल. तीने स्वयंपाक केला असेल इतकी गोडी व आवड त्यांना प्रत्‍येकाची होती. कणाकणांत असणा-य्रा आत्मारामावर त्यांनी अपरिमीत प्रेम केले. एक विषेशत्वाने सांगायचे झाले तर त्यांना पाहिले किंवा त्यांचा आवाज नुसता ऐकला तरी अगदी अष्टसात्वीक भाव उफाळून येत. प्रत्येकजण त्यांची आतुरतेने वाट पहात होते. कासवाची पिल्ले आपल्या आईकडे पाहिल्यानंतर जसी तृप्त होतात, तसेच त्या माऊलींकडे पाहिल्यानंतर येथेच्छ तृप्ती होत होती. एकदा आम्ही एका व्यक्तीच्या गांवाला गेलो जवळ कुठे बाबा येणार असेल तर जनसागर त्याठिकाणी भरभरून येत होता. त्या ठिकाणी विचार केला तर त्या महाभागाने दुस-या कुणाचा तरी कार्यक्रम घेऊन बाबांची परिक्षा घ्यायची ठरवले. परंतु त्यावेळी बाबांना डायरेक़्ट कीर्तनाला तेथे उभे केले, त्‍यामुळे लोकांमध्ये भयंकर वाद झाला. बाबांनी लगेच जय विठ्ठल म्हटले व सर्वांनी येथुन आपापल्या परिने जा. या ठिकाणी कोणीही थांबु नका. नंतर जो वाद घालणारा होता तो अनुग्रहीत साधक झाला. पण गाढवा त्या माऊलीने लगेच जय विठ्ठल केले त्याचे काय?
एकवेळी असा प्रसंग आला, संगमनेरजवळ एक झाड अचानक जमीनीत निम्मे खचले म्हणून त्या ठिकाणी एक तज्ञ, नुसताच अभ्यासु आणला तो म्हटला, कि आता आठ दिवसात भुकंप होणार आहे. त्‍यावर विश्‍वास ठेवून सर्वांनी भीतीपोटी प्लॅस्टीक कागदाच्‍या झोपडया (कोप्‍या) तयार केल्या. त्यावेळी सावरगावांतही अशाच कोप्या होत्या. बाबांनी सांगीतले की या कोप्या कशासाठी? अरे भुकंप होणारच नाही, तरीही कोणाचा त्‍यावर विश्वास बसेना ते तेंव्‍हापासून घराबाहेरच झोपत. संत हे त्रिकाल ज्ञानी असतात, खरोखर भुकंप झाला नाही. बाबांच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर ''तुझीया सत्तेने वेदासी बोलणे ॥ सुर्यासी चालणे तुझीच्या सत्ते॥'' त्यांचे बोलणे म्हणजे प्रमाण होते. ते महात्मे सर्व साधारण नव्हे तर प्रत्यक्ष भगवंतच होते, मात्र त्‍यांना ओळखणारे विरळेच.
बाबांनी शेवटच्या क्षणापर्यंत परमार्थच समजून सांगीतला इतर गप्पागोष्टी व प्रपंचाच्यासाठी स्‍वार्थ साधण्‍याचा कधीच प्रयत्‍न केला नाही. पण आज महाराज म्‍हणून मिरवणा-यांबाबत अवर्जुन सांगावेसे वाटते की, एका गावाकडे तो वीर गेला त्याने सांगितले की आमच्याकडे मोठा दुष्काळ पडला असून लोक अन्न अन्न करू लागले आहेत.परमार्थाच्‍या नावांखाली त्‍यांनी व्यापार सुरू केला खोटे बोलून एक ट्रॅक्टरभर गहू, बाजरी गोळा केली व भरलेला ट्रॅक्टर घेऊन निघणार तेवढयात दुसरा एकजण त्याठिकाणी गेला त्याने सर्व पाहिले व विचारले अरे हे कांय आहे. त्‍यांच्‍या गांवाकडे धान्य तर नाहीच व पाणीही नाही म्‍हणून याच्यासोबत पाण्‍याच्‍या टॅंकरचीही व्यवस्था करा मग लोकांना त्‍याचा स्‍वार्थीपणा समजला व जमा केलेले धान्‍य परत ज्याचे त्याला वाटुन दिले.
बाबांच्‍या घरी जर कोणी त्यांच्या विरहीत काही आणून दिले तर ते विचारायचे व त्‍याचे सर्व पैसे चुकते करायचे. आज स्वार्थ साधला जातो, परंतु ते महात्मे ''स्वार्थ हा विटाळ माणून'' त्‍यापासून सदैव दुर राहीले. 'निस्प्रुहता',निर्भीड-,'निष्काम' व 'निश्‍चळ प्रेम' त्‍यांनी देवाप्रमाणेच साधकांवरही केले. ज्ञानेश्‍वरीच्‍या १३ व्‍या अध्‍यायात माऊलींनी 'मानित्‍व, अदंभीत्‍व, अंहिंसा, शांती, आर्जव, गुरुभक्‍ती, शुचीत्‍व, स्‍थैर्य, अंत:करणनिग्रह, वैराग्‍य, अनअहंकार, जन्‍मृत्‍यु, अनासक्‍तीव, अनि‍भसंग, समचित्‍त, अव्‍यभिचारी भक्‍ती, अरति, अध्‍यात्‍मज्ञान, नित्‍यत्‍व, तत्‍वज्ञानार्थ दर्शन, अशी ही ज्ञानाची अठरा लक्षणे ज्ञानी किंवा संताची सांगीतली आहेत. ह्रदयात ज्ञान उत्‍पन्‍न झाले म्‍हणजे इंद्रियांच्‍या क्रिया पालटतात, त्‍यावरुन ज्ञान निर्माण होते व ज्ञानाची लक्षणे शरीरावर व वागण्‍यातून दिसून येतात ही सर्व लक्षणे या दोन्‍ही संताच्‍या ठिकाणी आम्‍ही परिपूर्ण अनुभवली.
विरळा ऐसा कोणी । तुका त्‍याशी लोटांगणी ॥
महत्वाचे सांगायचे म्हणजे या जगात बरेच साधु, संत, महात्मे पाहिले, अनुभवले पण श्रीपाद बाबा,रामदास बाबा सारखे महात्मे मात्र दुर्मिळच कारण ''यारे यारे लहानथोर । याती भलते नारी नर ॥'' कोणाच्या परिस्थीचा व जातीचा विचार न करता घरच्या घरीच परमार्थ कसा करावा हे प्रत्यक्ष कृतीतुन त्‍यांनी दाखवुन दिले व माऊली ज्ञानोबांप्रमाणे जीवनभर दीन जनांची अविरत सेवा करुन परमार्थ जगवला. ''जगाच्या कल्याणा संताच्या विभुती । देह कष्टविती परोपकारे ॥'' त्‍यांचे अनेक दिव्य अनुभव आले. पण जसे भगवंताचे वर्णन करताना शेषाच्या सहस्त्र जिभा थकल्या त्याप्रमाणे संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा ह्यांचे वर्णन करताना माझ्यासारख्या पामराची एक जीभ काय वर्णन करणार.
त्यांचा फक्त एक निरोप आपणासं कळवावासा वाटतो की, ते सदैव सांगत “आम्हाला विसरले तरी चालेल पण भगवंताच्या नामाला विसरु नका” तर हया पामराची एकच विनंती आहे की, भगवंताच्या नामाला आठवाच मात्र संत श्रीपाद बाबा व रामदास बाबा यांना क्षणभरही विसरु नका.हिच सर्वांच्या चरणी विनंती.

आपलाच चरणदास,
ह.भ.प डॉ.बाळकृष्ण महाराज डावखरे,संगमनेर

आरती सदगुरुंची

ओवाळू आरती माझ्या श्रीगुरुनाथा। माझ्या सदगुरुनाथा।
नाथ दिन अबला।अनाथ दिन अबला।यांनी लाविले पंथा॥धृ॥
स्थूळ सूक्ष्म कारण यांचा काकडा केला । यांचा काकडा केलाप्रेमरूपी स्नेह।
प्रेमरूपी स्नेह । नामाने सगळा भिजविला॥१॥
सदगुरुचे वचन यांनी वात लाविली । यांनी वात लाविली ।
अंतर ज्योती झळके । अंतर ज्योती झळके । तीच ओवाळू आरती ॥२॥
ज्योती चिन्मय प्रकाश देवा फाकला तुझा । देवा फाकला तुझा ।
पाठीपोटी मायबाप । पाठीपोटी मायबाप । श्रीपाद बाबा माझा हो रामदास बाबा माझा॥३॥
चरण दर्शन होता देवा मरण वारले। देवा मरण वारले ।
सगुण निर्गुण दोन्ही। सगुण निर्गुण दोन्ही। डोळा भरुनी पाहिले॥४॥
निर्गुण व्यापक सगुण नामे केरोबा मुर्ती। नामे केरोबा मुर्ती ।
सदगुरु श्रीपाद बाबा। सदगुरु रामदास बाबा। यांना ठेविले चित्ती॥५॥


हरिभजनी हे ढवळीले जग चुकवीला लाग कळीकाळाचा

ह.भ.प. महेंद्र महाराज रहाणे (संगमनेर)

सच्चिदानंद श्रीपाद बाबा व रामदास बाबांचे पदस्पर्श सावरगांवला सन 1988 साली झाला.वास्तविक पहाता बाबा म्हणजे कोणीतरी एखादा कीर्तनकार असेल त्याप्रमाणे आम्ही समजायचे. परंतु आमच्याआधी ज्यानी बाबांकडून अनुग्रह घेऊन साधक झाले होते. त्यातल्या एका व्यक्तीने सहज म्हटले, कि आमच्या बाबांना सावरगांवची जी आमलेवाडी होती. त्या वाडीस घेउन या मी तुम्हास एक लिटर पेट्रोलचे पैसे देतो. परंतु भाग्याचा उदयच तोपर्यंत झाला नव्ह्ता. त्यामुळे पैसे दिले तरच मी घेउन येतो. त्यावेळेस पेट्रोल नऊ रुपये लिटर होते. मग हो...ना...करता तयार झालो व फाट्यावर गाडी घेऊन आलो तर त्याठिकाणी आजच्‍या सारखी गजबज नव्‍हती फक्‍त एक छोटेशे हॉटेल होते.हॉटेल मालकाने मला विचारले कि तुम्ही कुणाची वाट पहाता. मी बोललो कि एक किर्तनकारबाबा येणार असून ते म्हातारे आहेत व त्यांची मी वाट बघतोय. तर ते म्‍हणाले की ते बाबा तर यापुवीच पायी चालत गेले. मी हे ऐकून अचंबीत झालो. काय सांगावं एकतर कसाबसा त्‍यांना नेण्‍यासाठी मी तयार झालो आणि बाबा तर पायी गेले. मी हे ऐकले व पुन्हा ताबडतोब गांवात आलो. पहातो तर बाबा एका किराणा दुकानात ज्यांनी मला बाबांना घेउन येण्‍यास सांगितले त्यांचेसोबत बसले होते. मग त्या दुकानदाराने श्रीफळ देऊन बाबांचा सन्‍मान केला व त्‍यांचे दर्शन घेतले. मी इतका अभागी कि, मी हे फक्त पहातच होतो. मग ते दोघेजण बाहेर आले आणि गाडीवर बसले त्यावेळेस बाबा बोलले कि भाऊ खड्डे पाहुन गाडी चालवा. परंतु मला फक्त बाबांना त्याठिकाणी सोडवायचे होते. मग आम्ही आमलेवाडीत आलो. बाबा म्हणाले या बसा परंतु माझ्यासारखे अभागी लांब बसलो, नंतर बाबा म्हटले कि भाऊ चहा घ्या. त्यानंतर ते म्हणाले की संध्याकाळी कीर्तन आहे किर्तनाला या, मी म्हणालो जमल तर येईल. नंतर मी गावात निघुन आलो. संध्याकाळी त्या वाडीत किर्तन करुन बाबांनी सकाळच्या गाडीने संगमनेरला निघुन गेली.ते बाबा गेल्‍यानंतर माझा माळ घालण्‍याचा विचार पक्‍का झाला. मग जी म्हातारी माणसे भेटलील त्‍यांना एखादे लहान मुल ज्याप्रमाणे सारखे हट्ट करते त्याप्रमाणे म्हणावे मला माळ घाला. संताच्या सहवासाने या अभाग्याच्या बुध्दीचा पालट कधी झाला हे कळलेच नाही. बाबा गेल्यानंतर प्रत्येकजण म्हणायचा की, आपल्या गांवात आठ दिवसांनी सप्ताह होणार असुन त्‍यावेळी बाबांचा कार्यक्रम आहे. त्यावेळेस तुम्‍ही बाबांकडुनच माळ घाला. बाबा केंव्‍हा भेटतील व मी माळ घालेल अशी उत्‍कंठा मला सारखी लागून राहीली. मात्र एक एक दिवस मला बारा वर्षासारखा वाटू लागला, दिवस भरभर जाईनात. एकदाचे ते आठ दिवस गेले व बाबांचा पदस्पर्श पुन्हा सावरगांवाला झाला. त्यावेळेस कुणालाही न जुमानता बाबा एस.टी बस ने सावरगांवला येणार हे कळल्यावर मी त्या बस थांब्यावर येऊन थांबलो. बाबा एसटीतुन खाली उतरले आणि बाबांची बॅग घेण्याकरता मी पुढे सरसावलो, तर बाबा बॅग देईनात. बाबा मला परखड शब्दात म्हणाले “आठ दिवसांपुर्वी माझ्या आईला घोडे लावले त्याचेजवळ मी बॅग देणार नाही. हे ऐकुन मी अगदी ढसाढसा धाय मोकलुन रडलो. मग बाबांनी मला शांत केले व आम्ही सर्वजण खोलीकडे जायला निघालो तिथे पोहचल्यावर आम्हा तिघांना बाबांनी अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर काय सांगावे त्या स्तितीचे वर्णन या पामराकडून होणे अश्यक्यच ''मी तो अल्पमतीहिन । काय वर्णु तुमचे गुण । उदकी तारिले पाषाण । थोर महीमान नामाचे ॥''
श्रीपाद बाबांचे त्या दिवशी सावरगांवातं किर्तन झाले, किर्तनात बाबांनी ''जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोची दैवाचा पुतळा ॥'' या अभंगावर मागदर्शन केल. त्यावेळी भलेभले जूने वारकरी टाळकरी बाबांच्‍या कीर्तनाला साथ करण्‍यासाठी होते. बाबा म्हणाले कीर्तनातून म्‍हणाले कि, मी जे सांगत आहे ते सत्यच आहे, परंतु याला जर खोटे करुन दाखवले तर अंगावर रॉकेल टाकुन मला भर चौकात पेटवून द्या. पण हे सत्यच आहे आणि या सत्याला कोणी जर खोटे म्हणत असेल तर त्याचे तोंड आणि माझ्या पायातल्या चपला आहे. त्यावेळी कोणी मान वर करुनही पाहिले नाही. साध्या व सोप्‍या गोष्टीतुन बाबांनी या धर्मांधांना धर्म शिकवला. भ्रमिष्टांचा भ्रम दुर केला. वास्तवीक जर पाहिले तर महात्म्याचा इतक्या साध्या पध्दतीने आचार विचार असतो हे मला त्‍यावेळी समजले. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे कि, ''लेकुराचे हित । वाहे माऊलीचे चित्त ॥'' किंवा ''अभ्रकाचे साठी । पंते हाती धरिली पाटी ॥'' या पध्दतीने त्यांनी सामान्य जनांना सन्मार्गाला लावले. वास्तविक पहाता त्यांनी एकच सांगावे कि “चांगला विचार केला तर” जसे कायाद्याचे फौजदारी व दिवाणी असे दोन मुख्य पिनल कोड आहेत त्याचप्रमाणे परमार्थातही संताचे 'भागवत' व 'ज्ञानेश्वरी' असे दोन पिनल कोड आहेत. बोलता बोलता त्यांनी समाजाला थोड हसवावं, समाजाला बोध होईल असेही सांगावे. सर्व सामान्‍यांचे हित व्‍हावे म्‍हणून प्रबोधनातून समाजाच्‍या व्‍यावहारातील अनुभवाच्‍या गोष्‍टी दृष्‍ठांत रुपाने देत.
एक कापसाचा व्‍यापारी पांचशे उंठावरुन कापूस विकण्‍यासाठी घेऊन चालला होता. हे सर्व पाहून एकजणाचे मनात पांचशे उंट,हजार बोंद्र्या हा कापुस पिंजायचा कधी याचे कापडा व्हायचे कधी हा विचार तो करु लागला. त्‍याच विचाराचे चक्र त्‍याच्‍या मनात सुरु झाले व प्रत्‍येकाला तेच विचारु लागला. परंतु एका सज्जन माणसाने सांगीतले अरे पुढील मुक्‍कामात ते उंटही भेले आणि कापसाच्‍या बोंद्र्याही जळाल्या. हे ऐकून त्‍याच्‍या डोक्‍यातील घोळणारा विचार तात्‍काळ निघून गेला. त्‍याप्रमाणे भ्रांतीरुपी नगरामध्‍ये तुमचे आमचे चालले असून मायारुपी भ्रांतीमुळे नको नको ते सतावणारे विचार कायमचे जाण्‍यासाठी परमपुज्‍य श्रीपादबाबा व रामदास बाबा यांचे जगात येण होत. ते आले नसते तर रावणादी जसे भेंडया कातरीत गेले तसे आपलेही झाले असते. त्‍यांनी फार फार मार्मिक सांगावे.
काही महाथोर म्‍हणून घेणारे बाबांवर टिका करत हे घोटीचे भोंदू बाबा म्‍हणे देव दाखवतात मग जशी ज्ञानदेवांनी मातीची निर्जीव भिंत चालवली तशी तुमच्‍या बाबांना सांगा भिंत चालवून दाखवा. त्‍यावर बाबा आव्‍हानात्‍मक सांगत की, असे ''जे कोणी म्‍हणणारे आहेत त्‍यांनी चांगदेवांची औलाद होऊन या'' मग आजही भिंत चालते की नाही पहा. त्‍यावेळी भल्‍या भल्‍यांचा माना लज्‍जेने खाली होत व त्‍यांची तोंडे बंद होत. समाजाचे हीत व्‍हावे म्‍हणून ते जशी आई बाळाच्‍या भल्‍यासाठी कितीही कष्‍ठ झाले तरी ते सहन करते त्‍याप्रमाणे साधकांसाठी बाबा सदैव करत. अशा महात्‍म्‍यांची लिला वर्णन करणेच शक्‍य नाही कारण सहस्‍त्र मुखाचा वर्णीता भागला । झाल्‍या सहस्‍त्र जिव्‍हा जिव्‍हा ॥ एक प्रसंग मे महीना तळपत ऊन अशा परीस्थितीत बाबांना मी आणण्‍यासाठी संगमणेरला गेलो, परंतु बाबा सावरगांव घुले या ठिकाणी आले. त्‍यानंतर आम्‍ही बाबांना घेऊन टाळूचेवाडी येथील कार्यक्रमासाठी जाण्‍यासाठी आमलेवाडी फाटयावर गेलो. त्‍यावळी तेथील लोक साधक बाबांना घेउन जाण्‍यासाठी भर उन्‍हामध्‍ये बैलगाडी (खटारगाडी) बैलांना सजवून मोठया आनंदामध्‍ये तयार होते. परंतु संत दयाळु असतात त्‍या मुक्‍या बैलांना भर उन्‍हामध्‍ये आपल्‍याला घेऊन खटारगाडी ओढावी लागणार ही परीस्थिती पाहून त्‍यांचे अंत:करणात भूतदया निर्माण झाली. बाबांनी त्‍यावेळी आम्‍हाला लगेच सांगीतले की,आपण मोटार साकलवरुनच जाऊ त्‍यांना सांगा तुम्‍ही टाळूचेवाडीला या. त्‍याप्रमाणे आम्‍ही त्‍या साधकांना सांगून बाबांना घेऊन कार्यक्रमाचे स्‍थळी पोहचलो. यामुळे त्‍यांना आमचा फार राग आला कारण आम्‍ही त्‍यांना गाडीत बसू दिले नाही. त्‍या दिवसी रात्रीकीर्तन झालेज्‍या मोटार सायकलवरुन बाबांना आणले त्‍या गाडीचे मागच्‍या टायरमध्‍ये त्‍यांनी त्‍यारात्री कु-हाडी खिळे ठोकून दिले.दुस-या दिवशी बुधवारे बाबांचे काल्‍याचे कीर्तन झाले.सर्व आटपून आम्‍ही सावरगांवला आलो.तेथून संगमनेर जवळील कोल्‍हेवाडी गांवातील साधकांना भेटण्‍यासाठी बाबा व आम्‍ही गेलो. तेथे चहापान आटपून पुढे दाढ बुद्रुक येथे पोहाचलो. जवळ जवळ सत्‍तर ऐंशी कि.मी.प्रवास झाला. आम्‍ही गाडीवरुन खाली उतरलो तो पहातो तर मागील चाकात हवाच नाही. बाबा बोलले टायर पंक्‍चर झाला असेल पंक्‍चर काढून आना.पंक्‍चर काढण्‍यास गेले,तेंव्‍हा पंक्‍चर ऐवजी नवी टयुब टाकावी लागली,चार खीळे व पंक्‍चर झालेली टयुब बाबांना दाखवण्‍यासाठी त्‍यांनी आणली. ज्‍यांनी हे केल ते आजही हयात आहेत.समर्थांची कृपा झाल्‍यावर आलेली कोणतीही संकटे निवारण होतात हे आम्‍ही प्रत्‍यक्ष अनुभवले.सद्गुरुसारखा असता पाठीराखा । इतरंचा लेखा कोण करी ॥
अरे काळ सुध्‍दा सलाम करतो घाबरण्‍याचे काहीही कारण नाही. अ सेच एकदा आमलेवाडीत एकदा बाबांचा कार्यक्रम झाला.आ सर्व आपापल्‍या पध्‍दतीने जेवणासाठी गेले,काही परीक्षा पहाण्‍यासाठी बाबांच्‍या जेवणाची वेगळी व्‍यवस्‍था केली होती,बाबा व आम्‍ही जेवावयला बसलो पहातो तर बेसन अत्‍यंत तिखट,अक्षरश:सर्वांच्‍या डोळयातून पाणी काढल.पण त्‍यावेळी दोन्‍ही बाबांचा एक शब्‍दही नाही ते शांतपणे जेवत होते.आम्‍हाला सहन न होता नाविलाजास्‍तव बाबांना जेवणाचे थांबवले व हात धुण्‍यास सांगीतले बेलसोंडयाच्‍या आत्‍यांना पुढे जाण्‍याचा इशारा केला बाबा व आम्‍ही बेलसोंडयाकडे निघालो.आम्‍ही फार भुकेलो होतो,मात्र बाबा यत्‍कींचीतही बोलत नव्‍हते शेवटी आमच्‍या भुकेमुळे आम्‍ही बाबांनाही पुन्‍हा जेवण्‍यास आग्रह केल्‍यानंतर आम्‍ही सर्वजण जेवण केले.तो दिवस फार आनंदमय वाटत होता.
आम्‍ही सर्वजण बाबांच्‍या सत्‍संगतीमध्‍ये मस्‍त ब्रम्‍हानंद सेवन करत होतो.मी बाबांचे कुशीत होऊन ढसढसा अमृतपान करत होते.नंतर रात्रीचे अकरा वाजले होते.बाबांनी सर्वांना सांगीतले भाऊ आता विश्रांती करा मलाही सकाळीचे गाडीने जायचे आहे.मग सर्व जण निघून गेले.परंतु आम्‍ही दोघे तसेच बाबांच्‍या पायथ्‍याशी बसून राहीलो.बाबा जोरात म्‍हणाले उठ जा,झोप.परंतु आम्‍ही तसेच गुपचुप बसून राहीलो,मग बाबांचे पाय (चरण)चेपत बसलो.थोडया वेळाने बाबा पुन्‍हा जोराने म्‍हणाले तुला सांगीतले ना उठ म्‍हणून.पण आम्‍ही तसाच दबा धरुन बसायचे व पुन्‍हा बाबांचे पाय दाबायचे,मग बाबा उठायचे ढग आल्‍यावर जसा मोराला आनंद होतो,तसे बाबा आपल्‍या अमृतमय वाणीतून परमार्थरुपी मंथन समजून सांगायचे त्‍या आनंदाचे वर्णनच होऊ शकत नाही. जसे वासरु गाईचे कासेत शिरुन दुग्‍धपानाने मनमुरात सुख पावते, त्‍याचप्रमाणे.सतरावीचे स्‍थन्‍य देशी । अनुहताचा हल्‍लरु गासी । समाधी बोधे निजवीसी । बुझावोनी । (ज्ञानेश्‍वरी) नंतर पहाटे बाबा म्‍हणायचे जरा बर्हीगमनाला जाऊन यायचे, मग आम्‍ही बाबां बरोबर बाहेर जायचो त्‍यावेळेस जी माणसे विधीसाठी पुढे जाणारी होती ती नाक दाबायची त्‍यावेळी बाबा म्‍हणायचे हा हरामखोर पहा,जवळ होते तोपर्यंत वास आला नाही,या नालायकाच्‍या संगतीने त्‍या अन्‍नाचा परिणाम असा झाला व हाच हरामी पुन्‍हा नाक दाबतो.नित्‍य कर्मातही बाबा परमार्थ जगत व सांगत.सहज बोलणे हीत उपदेश । करोनी सायास शिकवीती ॥ बाबा सहज म्‍हणायचे ''रुप पहाता लोचनी । सुख झाले हो साजणी ॥'' साधुसंताना चराचराकडे पाहील्‍यानंतर सुखच वाटत असते. आत्‍मा जगतात घनदाट स्‍वरुपात भरलेला आहे असा अनुभव झाला.पण काय सांगाव या थोबाडवाशाला अजून समजेना.असाच एक होता कोण म्‍हणे तर भिष्‍म त्‍याने पांडवांबरोबर युध्‍द करुन शेवटी शरपंजरी पडला,त्‍यावेळेस दक्षिणायन चालू होते.त्‍यावेळेस त्‍याने कृष्‍ण भगवंत व पांडवांना भेटीला येण्‍यासाठी निरोप पाठि‍वला.पांडव आले,त्‍याना भिष्‍माचार्य नितीच्‍या गोष्‍टी सांगू लागले.त्‍यावेळेस द्रोपदी कशी उभी राहीली, ते बाबांच्‍या साधकांना सांगण्‍याची गरज वाटत नाही.तेंव्‍हा द्रोपदी बोलली आता तुम्‍ही नितीच्‍या गोष्‍टी सांगता,थोबाडवाशा त्‍यावेळी तुझी निती कुठे गेली होती.माझे वस्‍त्रहरण झाले, पांडवांना सुईच्‍या टोकावर मावेल एवढी जमीन सुध्‍दा देणार नाही,लाक्षागृहात जाळण्‍याचा प्रयत्‍न झाला त्‍यावेळेस हे थोबाडवाशा आता नितीच्‍या गोष्‍टी सांगतोस त्‍यावेळी तुझी निती कुठे गेली होती.आजही समाजात टूकडबाबू खूपच आहेत,तुमचे आमचे भाग्‍य इतके चांगले की,न भुतो न भविष्‍यती ॥सच्चिदानंद प.पू_श्रीपाद व रामदास बाबा सदगुरु लाभले. भाग्‍याचा उदय । ते हे जोडी संत पाय ॥

आपला स्‍नेहांकीत,
ह.भ.प. महेंद्र महाराज रहाणे (गुरुजी )

आरती सदगुरुंची

ओवाळा ओवाळा माझ्या सदगुरुराणा। माझ्या सावळेराणा।
पाचही तत्वांच्या ज्योती प्रकाशिल्या ध्याना॥धृ॥
निराकार वस्तू कैसी आकारा आली। कैसी आकारा आली।
सर्वाघटी व्यापक सर्वाघटी व्यापक माझी सदगुरु माऊली॥१॥
सोळा सांधे बहात्तर कोथड्या काया निर्मिली। प्रभुने काया निर्मिली।
नऊ दरवाजे खिडकी। नऊ दरवाजे खिडकी। आत मुर्ती बसविली॥२॥
पाजळल्या ज्योती आता ओवाळू कोणा। आता ओवाळू कोणा।
जिकडे पहावे तिकडे। जिकडे पहावे तिकडे। माझा सदगुरुराणा॥३॥
सप्तही सागरांचा वेढा कैसा घातला। देवा कैसा घातला।
तुका म्हणे मायबाप। तुका म्हणे मायबाप। माझा कनवाळू आला॥४।