केशवाचे ध्यान धरुनी अंतरी । मृतिके माझारी नाचतसे ॥१॥
विठठ्लाचे नाम स्मरे वेळोवेळा । नेत्री वाहे जळ सदृगदीत ॥२॥
कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त ॥३॥
कवण स्तुति करु कविणया वाचे । ओघ संकल्पाचे गिळीले चित्ते ॥१॥
मन हे झाले मुके मन हे झाले मुके । अनुभवाचे हे सुखे हेलावले ॥२॥
दृष्टीचे पहाणे परतले मागुती । राहिली निवांत नेत्रपाती ॥३॥
म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावे । जीवे ओवाळावे नामयासी ॥४॥
पावा घोंगडी घेऊनी पाही । संगे गोपाळ घेऊनी गाई ॥
वृंदावनी आले लवलाही । वेणू वाजिवला सुस्वरे बाई हो ॥१॥
उताविळ झाल्याण गौळणी । वेणूनाद पडियेला कानी ॥
भोवत्या पाहती अवलोकुनी । नयना न दिसे सारंगपाणी हो ॥२॥
विसरल्या कामधंदा । सासु सास-याची नाही मर्यादा ॥
कोण जाणे त्या जावा नणंदा । वृत्ति वेधली परमानंदा हो ॥३॥
अवघा हरपला देहभाव । पुसिला जन्मिराणाचा ठाव ॥
वृत्ति स्वानंदे मुराली पहावो । सेना म्हणे भाग्य उदया हो ॥४॥
कृष्ण आला ऐकुनि गोपिका सुदरी । विव्ह्ळ झाल्या पहावया हरी॥
एकी त्या धावल्या नगरा बाहेरी । कायावाचा मने वेधल्या नारी ॥धृ॥
आनंदल्या गौळणी हरी आला मथुरेशी । मोहियले मन देखोणी रुपासी ॥
झाली उतावीळ पहावया ऋषीकेशी । नेत्रिचे काजळ लावीले मुखासी ॥१॥
एक ती बैसली होती पतीशेजारी । नग्नचि धावत आली बाहेरी ॥
विसरुनी चीर ठेवि माथियावरी । देहभाव हरपला देखोनि मुरारी ॥२॥
एकी ती ताटक घातले पायी । विरुद्या जोडवी कंठाचे ठाई ॥
घेऊनी पाल्होर खोविले डोई । वाळया वाक्याई बांधिल्या कानाचे ठायी ॥३॥
एकीने कडिये घेतले दहृयाचे माथण । बाळक ठेविले शंकीया जाण ॥
नाही पुत्रलोभ देखोनि कृष्ण । निजसुख मीनली नाही आठवण ॥४॥
करिता मंथन हरि आला ऐकुनि कानी । तैशीच धावली रवी दोर घेऊनी ॥
नाकीचे मुक्ताफळ खोविले वेणी । मोतियाची जाळी घाली गुडघ्या लागुनी ॥५॥
कृष्णसुखा मीनल्या अवघ्या सुंदरी । लाज भय मोह शंका दवडिल्या दुरी ॥
सेना म्हणे झाली तदाकारी । परतुनि संसारा नुरेचि उरि ॥६॥
पुर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या। ॥१॥
बांधू नामाच्या सांगडी । पोहून जाऊ पैल थडी ॥२॥
अवघे भाविक जन भक्त् । घाला उडया चंद्रभागेत ॥३॥
बोधला म्हणे थोर पुण्या । वोघा आली पंथे येणे ॥४॥।
आमुचा आम्ही केला भावबळी । भावे वनमाळी आकळला ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । भावे देव शरण भाविकाशी ॥२॥
निज भावबळे घातिलासे वेढा । देव चहुकडा कोंडियेला ॥३॥
चोखा म्हणे देव भावाचा बांधला । भक्ताचा अंकित म्हणूनी झाला ॥४॥
नेत्री अश्रुधारा उभा भीमातिरी । लक्ष चरणावरी ठेवानिया ॥१॥
कागा मोकलीले न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोसे ॥२॥
नेने करु भक्ती नेणे करु सेवा । न येसी तू देवा कळले मज ॥३॥
चोखा म्हणे माझा जीवीचा विसावा । पोकारितो धावा म्हणोनिया ॥४॥
रुदन स्फुंदन अहर्निशी करी । परह वाचे हरी हरी जप सदा ॥१॥
न लागे गोड खाता पाणी पिता । आवडी सर्वदा पंढरीची ॥२॥
निद्रा न लागे करी उठीबसी । म्हणे देवा ऐसी तुटी का केली ॥३॥
दिन रात हेचि होय मनी चिंता । चोखा म्हणे आता काय करु ॥४॥
गर्जती नाचती आनंदे डोलीती । सप्रेम फुंदती विठठल नामे ॥१॥
तया सुखाचा पार न कळे ब्रम्हादिका । पुंडिलके देखा भूलिवले ॥२॥
नावडे वैकुंठ नावडे भूषण । नावडे आसन वसन काही ॥३॥
कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी । म्हणतसे महारी चोखीयाची ॥४॥
वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे । वेणूनादे गोवर्धनू गाजे ॥
पुच्छ पसरुनी मयुर विराजे । मज पाहता भासती यादवराजे ॥१॥
तृण चारा चरु विसरली । गाई व्याघ्र एके ठायी जाली ॥
पक्षी कुळे निवांत राहीली । वैरभाव समूळ विसरली ॥२॥
यमुना जळ स्थिर स्थिर वाहे । रविमंडळ चालता स्तब्ध होये ॥
शेष कुर्म वराह चकित राहे । बाळा स्तन देऊ विसरली माये ॥३॥
ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती । वाकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानी बैसोनि स्तुती गाती । भानुदासा फावली प्रेम भक्ती ॥४॥
दु:खे दुभंगले ह्र्दय संपुष्ट । गहिवरे कंठ दाटता हे ॥१॥
ऐसे काय केलें सुमित्रा सखया । दिले टाकोनिया वनामाजी ॥२॥
आक्रंदती बाळे करुणा वचनी । त्या् शोके मेदिनी फुटो पाहे॥३॥
काय ते सामर्थ्य नव्हते तुजपाशी । संगे न्यावयासी अंगभूता ॥४॥
तुज ठावे आम्हा कोणी नाही सखा । उभयलोकी तुका तुजिवण ॥५॥
कोन्हाबा म्हणे वियोगे पोरटी जालो । देरे भेटी बंधूराया ॥६॥
खेळ खेळता वो विकळ सुंदरा । जालि आठिवता नंदाच्या कुमरा ॥
स्वेद कंप खेद दाटला शरिरा । जाला विरह तो नेणती इतरा वो ॥१॥
धरा आवरुन म्हणती साजणी । धिर न धरत पडिली धरणी ॥
येकी सांगती वो जाली झडपणी । वेगी आणा आता पंचाक्षरी गुणी वो ॥२॥
जातो प्राण वो येताती लहरे । येकी म्हणती वो डंखीली विखारे ।
अंग तापले वो येतु असे शियारे । येकि म्हणती वो मोड सियेचा भरे वो ॥३॥
येकि म्हणती गे लागले दैवत । कुळीचे दारुण वो नेदि करु मात ॥४॥
ऐसा मिळाला वो भोवताला पाळा । होती चुकुर येकी रडताती बाळा ।
पाजा वोखदे वो वाचवा वेल्हावळा । नका उशिर गे थांबा उतावेळा वो ॥५॥
मग ते येकांतिची सांगे सखियांसी । नका बाहेरी वो फुटो कोणापाशी ।
आणा नंदाचा नंदनु येकांतासी । निळया स्वांमीची हे भावना निश्चयेसी वो ॥६॥
देता अलिंगना नंदाच्यां कुमरा । पडेल उतार हे वाचेल सुंदरा ।
नका आड घालू संदेह दुसरा । लावा उठवूनी जाऊ द्या इतरा वो ॥१॥
ऐसे बोलती त्या जिवीच्या जिवलगा । झाला विरह गे वाचवा सुभगा ।
आणा पाचारुनी गे एकांता श्रीरंगा । दुजा उपावोचि रचले या प्रसंगा ॥२॥
आहे ठाऊक हे अंतरी आम्हासी । याचा वेध झाल्या दशाची हे ऐसी ।
होते आटणी गे जीवा आणि शिवासी । तेथे देहबुध्दी नाठवे देहासी वो ॥३॥
हृदयी होताची या कामाचा संचार । न्यावा एकांतासी निष्काम यदुवीर ।
येईल सुख तोचि नाही ज्यासी पार । सांडा चावटी आणिक विचार ॥४॥
नाही अनुभव हा ठाऊका जयासी । त्या ची भोगिती या अनुदिनी दु:खासी ।
येती जाती पुन्हा होती कासाविसी । आम्ही न विसंबो या सावळया कृष्णासी वो ॥५॥
नाही जीवी या जीवीताचि चाड । याच्या संगसुखे घालु वो घुमाड ।
स्वामी निळयाचा पुरवील कोड । आणा तोची आता सांडा बडबड वो ॥६॥
सदृगदित कंठ बाष्प पै दाटत । जया भेटीलागी –हदयी फुटत ॥ १॥
तो देखिला वो तो देखिला । सबाहय अभयंतरी व्यापुनिया राहिला ॥२॥
सराभरित भरुनी पंढरीचे उभा । सभोवती दाटी संताची शोभा ॥३॥
ऐसा लावण्या पुतळा देखिला दृष्टी । एका जनार्दनी सुख न समाये सृष्टी ॥४॥
भावेविण देव नयेचि पै हाता । वाउगे फिरता रानोरान ॥१ ॥
मुख्य ते स्वरुप पाहिजे तो भाव । तेणे आकळे देव नि:संदेह ॥२॥
संतसमागम नाम ते पावन । वाचे नारायण हाचि भाव ॥३॥
एका जनार्दनी सोपा मंत्र राम । गाता जोडे धाम वैकुंठीचे ॥४॥
शुध्द भाव चित्ती । तरी काही नलगे युक्ती ॥१॥
नलगे आणिक विचार । शुध्दर भाव हाचि सार ॥२॥
भावाविण वांझे । साधने ती अवघी ओझे ॥३॥
एका जनार्दनी भाव । पाववी अक्षय तो ठाव ॥४॥
गौळण
गौळण म्हणती यशोदेला । कोठे गे सावळा । का रथ श्रृंगारिला ।
सांगे वो मजला । अक्रुर उभा असे बाई गे साजणी ॥१॥
या नंदाच्या अंगणी । मिळाल्या गौळणी ॥ धृ ॥
बोले नंदाची पटटृराणी । सदृगदीत होऊनी । मथुरेसी चक्रपाणी ।
जातो गे साजणी । विव्हळ जाले मन वचन एकोनी ॥२॥
अक्रुरा चांडाळा । तुज कोणी रे धाडीला । का घात करु आलासी
वधीशी सकळा । अक्रुर तुझे नाम तैसी न करणी ॥३॥
रथी चढले वनमाळी । आकांत गोकुळी । भूमी पडल्या व्रजबाळी ।
कोण त्या सांभाळी । नयनीच्या उदकाने भिजली धरणी ॥४॥
देव बोले अक्रुरासी । वेगे हाकी रथासी । या गोपीच्या शोकासी ।
न पहावे मजसी । एका जनार्दनी रथ गेला निघोनी ॥५॥
अभंग
वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर । कृष्णमय शरीर वृत्ती जाहली ।
नाठवे भावना देह गेह काही । आपपर त्याही विसरल्या ॥२॥
एका जनार्दनी व्यापला ह्र्दयी । बाहेर मिरवी दृष्टीभरीत ॥३॥
नामा हे वदता डोळया आले पाणी । पडिला धरणी देवापुढे ॥१॥
नामदेव स्थिती पाहून श्रीपती । विस्मित ते चित्ती स्तब्ध जाले ॥२॥
कैशा रीती नाम्या संबोखू मी आता । कठिण अवस्था देव म्हणे ॥३॥
प्रेम उचंबळे ऐकता ही आळ । बुझावी गोपाळ नाम्यालागी ॥४॥
गरुडापाराजवळी नामदेव आला । सन्मुख देखिला पांडुरंग ॥१॥
मेघ:शाममुर्ती डोळस सांवळी । ते ध्यान ह्र्दयकमळी धरोनि ठेला ॥२॥
धन्य नामदेव भक्त शिरोमणि । ज्याचा चक्रपाणि वेळाइतू ॥३॥
पूर्ण सहजस्थिती जाला सुखाचा अनुभव । सकळ देहभाव पारुषले ॥४॥
मन पांगुळले स्वरुपी गुंतले । बोलणे खुंटले प्रीतीमौन ॥५॥
सबाह्य अभ्यंतरी स्वरुप कोंदले । द्वैत निरसले दृश्याकार ॥६॥
निजरुप निर्धारिता नयन सोज्वळ जाले । रोमांच दाटले खरबरीत ॥७॥
आनंदला घन ओळला अंबरी । वृष्टी चराचरी होत असे ॥८॥
तमे क्षीर सेविता जाले समाधान । चुकले जन्ममरण कल्पकोटी ॥९॥
सहज सुखे निवाला भवदु:ख विसरला । विसावा भेटला पांडुरंग ॥१०॥
नामा म्हणे दृष्टी लागेल पा झणी । धन्य पुंडिलकाचेनि जोडले सुख ॥११॥
(गोणाई व नामदेव यांचा संवाद)
माता वाट पाहे नामा अजुनी का नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथे ॥१॥
ऐसें मज पाहता हेचि घडे साचे । विठ्ठली मन त्याचे गुंतले असे ॥२॥
काय सांगे माय जाय देवहासी । जपतो अहर्निशी विठ्ठल नामा ॥३॥
तहान भूक काही आथीचना मनी । विठठल विठठल म्हणोनि हाचि छंद ॥४॥
नेणो कवण्या गुणे भुलविले याते । विंदान आमुते न कळे काही ॥५॥
दिशा अवलोकिता प्राण नव्हे निश्चित । बहुत क्षुधाक्रांत जाली असे ॥६॥
तेथून लवलाहे धांवत निघाली । महाद्वारा आली पहावया ॥७॥
तो तव पांडुरंगा सन्मुख देखिला । चित्रीचा लिहीला पुतळा तैसा ॥८॥
नाही चळणवळण तटस्थ नयन । केलेनिबलोण योगिजनी ॥९॥
ते देखोनि मातेसी थोर द्वेष आला । क्रोधे आसुंडिला करी धरुनि ॥१०॥
तव प्रेमा चियेपरी पडिला भूमीवरी । देखोनि सुंदरी रुदना करी ॥११॥
मग उचलोनि ओसंगा धरिला पोटासी । म्हणे कारे रुसलासि सांग नाम्या ॥१२॥
निढळासी निढळ मिळवुनि ते रडे । माझिया कानाडे काय जाले ॥१३॥
दृष्ति उघडूनी नामा भोवते जव पाहे । तव सन्मुख माया देखियेली ॥१४॥
येरी उचलोनिदिधले आलिंगन । जाले समाधान तयेवेळी ॥१५॥
सुह्यदे सोयरी सकळिके मिळोनि । करिती झाडणी नानापरी ॥१६॥
माऊली नव्हेसि तू वैरिणी जाण । माझया केशवाची खूण अंतरली ॥१७॥
शस्त्रेविण वध केला अवचिता । जीव तळमळता जाऊ पाहे ॥१८॥
आता परतोनी माझी वाट पाहसी । साचरिपु होसी तरी जाण ॥१९॥
नामा म्हणे माते जाई हो येथूनी । मज जाई निरवूनिविठोबासी ॥२०॥
पुलक धर्म रोमांच नाही जव उठिले । सजळ नाही जाले नयन जव ॥११॥
तव हरिभक्तीचे सुख कळले जे म्हणती । लटिके बोलियेती उभयलोकी ॥२॥
ऐसा भक्तिप्रेमा देई जी देवा । सर्व भावे सेवा घडे तुझी ॥३॥
श्रवणी ऐकता नाम वाचे बोले । नाही सुखावले मन त्यांचे ॥४॥
श्रीहरीचे नाम म्हणविता न म्हणे । मा सहज उच्चारणे कैचे त्यासी ॥५॥
दर्दुराचे परीजिव्हा वटवटी । सांडोनि हरिगोष्टी आणिक सांगे ॥६॥
देवाच्या मुर्ती संत महंत देखोनी । न वचे लोटांगणी भावे त्यासी ॥७॥
न लावी त्यांचे रज टकामका पाहत । बुजवण जैसे शेत राखे तैये ॥८॥
ऐसे कैक प्राणी आहेति मूढमति । हित सांगता चित्ती दु:ख वाटे ॥९॥
नामा म्हणे केशवा मी तु्झे दीन । नेणे तुजवाचोन आन दुजें ॥१०॥
(संत नामदेव व श्री विठठल यांच्यातील लडिवाळपणा)
स्फुंदत स्फुंदत नामा उभा महाद्वारी । दृष्टी पायावरीं विठोबाच्या ॥१॥
देखोनि केशवे उभारिल्या बाहे । पालवितु आहे पीतांबरे ॥२॥
संवसारी रुसलासे नाम । दाटलासे प्रेमा ओसंडत ॥३॥
येई नाम्या तुज धरीन पोटाशी । कोणे गांजिलासी दुराचारे ॥४॥
ऐके वो रुक्मिणी अंजारुनि तुम्ही । वोसंगा घेऊनि आळवावा ॥५॥
जगत्र जननी संभ्रमे करुनि । प्रीति पान्हा स्तनी ओसंडला ॥६॥
वोरसला नामा घेतासे करी । मुख पितांबरे पुसीतसे ॥७॥
कवणे तुझे चित्ती लावियेला चाळा । न देखता डोळा स्फुंदतसे ॥८॥
बुझविला नामा दाटलासे प्रेमा । हासे सत्यभामा काय जाले ॥९॥
कोणी कुळी नामा काय लोभ याचा । तू स्वामी दीनाचा पांडुरंगा ॥१०॥
मी लोळे नाम कंठ सद्गदित । डोळिया स्त्रवत अश्रुजळ ॥१॥
इतकें देखोनिया द्रवला पुरुषोत्तम । नाम्यासी सप्रेमे उचलिले ॥२॥
नाम्या तुज काय वाटतसे दु:ख । संसाराचा शोक तुज झाला ॥३॥
नामा म्हणे देवा तुज ऐसा दाता । मज भव व्यथा कवणे परी ॥४॥
भूस्फूंद स्फूंदोन नामा उभा महाद्वारा । चित्त पायावरी विठोबाच्या ॥१॥
उभा दिनानाथ उभारुनी बाहे । पालवीत आहे पितांबर ॥२॥
आरता ये रे नामया धरीला पोटासी । कोणे गांजीलासी दुर्जनाने ॥३॥
अंतरीचे सांग पडे माझ्या मागे । का करीसी उद्वेग संसारीचे ॥४॥
नामा म्हणे विठोबा असे मी नेणता । आठवी पंढरीनाथा वेळोवेळा ।५॥
आर्त माझे पोटी दिवस लेखी बोटे । प्राण धरोनी कंठी वाट पाहे ॥१॥
भेटसी केधवा माझीया जीवलगा । येईगा पांडुरंगा मायबापा ॥२॥
चित्त निरंतर माझे महाद्वारी । अखंड पंढरी ह्र्दयी वसे ॥३॥
कटी करविटे समचरण साजीरे । देखावया झुरे मन माझे ॥४॥
श्रीमुख साजीरे कुंडले गोमटी । तेथे माझी दृष्टी बैसलीसे ॥५॥
आसुवे दाटली उभारोनी बाहे । नामा वाट पाहे रात्रंदिवस ॥६॥
सांडूनी वैकुंठ न धरत पातले । तुज भेटावया आले पुंडलिका ॥१॥
पितीचा वोरसु ह्र्दयी दाटला । नुठिसी का वहिला अलिंगना ॥२॥
भक्त शिरोमणी आमुचा जीवलग । म्हणे पांडुरंग पुंडलिका ॥३॥
स्फुरती भूजादंड आणि वक्षस्थळ । हरुषे नयन कमळ विकासलें ॥४॥
आनंदे रोमांच उद्भवले अंगी । क्षेमा देई वेगे भक्तराया ॥५॥
मज नामरुप तुमचेनी संभ्रमे । केली जन्मकर्मे असंख्यात ॥६॥
तुमच्या आवडी असे म्या विकिला । सांग कोण्या बोला रुसलासी ॥७॥
ह्र्दयीचे निजगुज सांग रे संकळीक । तेणे मज सुख होईल जीवा ॥८॥
परतोनी दृष्टी पाहे आळुमाळ । तेणे हरेल सकळ श्रम माझा ॥९॥
ऐसा भक्क्तजनवस्तलु भक्तांचा विसावा।भक्तांचिया भावा भाळलासे॥१०॥
कटावरी दोन्ही हात उभा पुंडलिका द्वारी । नामया स्वामी हरि विनवितसे ॥११॥
तीर्थयात्रेप्रति बोळविला नामा । आले निजधामा देवराव ॥१॥
चरण प्रक्षाळाया रुक्मादेवी आली । श्रीमुख न्याहाळी भरोनी दृष्टी ॥२॥
तै निडारले नयन स्वेदेभिजले वदन । ह्र्दय जाले पूर्ण करुणारसे ॥३॥
बाप कृपेचा सागरु सुखाचा सुखतरु । आर्त लोभापरु दीनालागी ॥४॥
चरणी ठेवूनी माथा पुसे जगन्माता । आजी का अवस्था विपरीत देखो ॥५॥
म्हणे वाटते जडभारी नाम्याच्या वियोगे । दाटले उद्वेग चित्त् माझे ॥६॥
कवण्या सुखे स्थिर न राहे माझे मन । कै डोळा देखेन प्राण माझा ॥७॥
इष्ट मित्र बंधु मायबाप सखा । ही नामे मज देखा ठेविली तेणे ॥८॥
तो कैसा मजवीण रा खिला आपुला प्राण । हे चिंता दारुन वाटे मज ॥९॥
तव ती महामाया म्हणे जी यादव राया । झणी तुमच्या नामया दिठी लागे ।१०॥
शोक मोह दु:ख क्षणामाजी जाळी । ते जीवन त्याजवळी नाम तुमचे ॥११॥
ऐसे ऐकानिया प्रेमा आला पोटी । म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवावी ॥१॥
येर ते कर्मधर्म सर्वही पाल्हाळ । श्रमुचि केवल जाणिवेचा ॥ २॥
ऐसा संत भेटेविरळा भाग्ययोगे । जो आथिला वैराग्ये सप्रेमळू ॥३॥
सर्वभूती दया सर्वभावे करुणा । जेथे मीतूपणा मावळला ॥४॥
भजन तया नांव वाटे मज गोड । येर ते काबाड वायाविण ॥५॥
नमन ते नम्रता न देखे गुणदोष । अंतरी प्रकाश आनंदाचा ॥६॥
येर ते दांभिक जाणावे मायावी । विश्वास मी जीवी न धरी त्यांचा ॥७॥
ध्यान तया नांव निर्विकार निके । जे विश्वी माझ्या देखे विठोबासी ॥८॥
अखंड ह्र्दयी तेचि आठवण । साजिरे समचरण विटेवरी ॥९॥
नादी लुब्ध जैसा आसक्त हरिण । जाय विसरोन देहभाव ॥१०॥
यापरी तल्लीन दृढ राखे मन । या नावे श्रवण आवडीचे ॥११॥
व्यवसायी चित्त ठेवुनी कृपण । लाभाचे चिंतन सर्वकाळ ॥१२॥
यापरि अखंड स्वहित विचारण । करिजे ते मनन सत्वशीळ ॥१३॥
परपुरुषी जैसी आसक्त व्यभिचारिणी । न लागे तिच्या मनी कामधान ॥१४॥
कीटकी भृंगुटिये जैसे अनुसंधान । निके निजध्यासन एकविध ॥१५॥
सर्वभावें एक विठठ्लचि ध्याये । सर्वांभूतीं पाहे रुप त्याचें ॥१६॥
सर्वाहुनि निराळा रजतमावेगळा । भोगी प्रेमकळा तेचि भक्ति ॥१७॥
सत्वाचा सुभटु असंग एकटू । वैराग्य उद्भटू एकनिष्ठ ॥१८॥
प्रारब्धाचा भोगी नेणे देहस्मृती । अखंड ते धृति निर्विकार ॥१९॥
निर्वासना मन निजलाभे संपूर्ण नेणे स्वरुपज्ञान विकल्पाचे ॥२०॥
अनुरागे गोविंद ध्यायिजे एकांती । यापरती विश्रांति आणिक नाही ॥२१॥
कायावाचामने हा माझा अनुभव । सांगितला सर्व आवडीचा ॥२२॥
नामा म्हणे हेहि बोलविले तेणे । उदार सर्वज्ञे पांडुरंगे ॥२३॥
वोसंडोनि निवृत्ति आलिंगो लागला । आणिकांच्या डोळां अश्रु येत ॥१॥
अमर्यादा कधी केली नाही येणे । शिष्य गुरुपण सिध्दी नेले ॥२॥
गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा । गुहयगौप्यमाळा लेविवल्या ॥३॥
फेडिली डोळयांची अत्यंत पारणी । आता ऐसे कोणी सखे नाही ॥४॥
कोढोनियां गुह्य वेद केले फोल । आठवती बोल मनामाजी ॥५॥
नामा म्हणे संत कासावीस सारे । लाविती पदर डोळियांसी ॥६॥
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥
नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवले ॥२॥
दाहीदिशा धुंद उदयास्तविण । तैसेचि गगन कालवले ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढा ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा । पादपद्मी ठेवानिरंतर ॥५॥
तीन वेळा जेव्हा जोडिले करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेव ॥६॥
भीममुद्रा डोळा निरंजनी लीन । जालें ब्रम्हपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥
कळवळी मन नाही देहभान । वटेश्वर सोपान सोवळे जाले ॥१॥
संत साधुजन होत कासाविसी । आले समाधीपाशी तातडीने॥२॥
समाधीभोवते कुंकुमाचे सडे । पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥
वरी मृगछाला दिसलाती लाल । दर्भं आणि फुले समर्पिली ॥४॥
दुर्वा आणि बेल टाकिले मोकळे । साहित्य सकळ समर्पिले ॥५॥
निवृत्ति पांडुरंग बैसले येऊन । नमन सोपान करितसे ॥६॥
मग प्रश्न आदरिला । नामा फुंदो जो लागला ।कागा ज्ञानेदवा गेला । मज सांडुनिया ॥१॥
कैसा होय तुझा दास । कैसा पाहो तुझी वास ।ज्ञानाकारणे कासावीस । जीव माझा होतसे ॥२॥
देव म्हणे नामयासी । तू झणी कासावीस होती ।तू रे तयाते नेणसी । ते कैसे आईक पा ॥३॥
ज्ञानदेव ज्ञानसागरु । ज्ञानदेव ज्ञानागरू ।ज्ञानदेव भवसिंधुतारू । प्रत्यक्ष रूपे पै असे ॥४॥
ज्ञानदेवी ज्ञानगम्य । ज्ञानदेवी ज्ञानधर्म्य ।ज्ञानदेवी ज्ञाननेम । सर्वथैव पै असे ॥५॥
ज्ञानदेवी हाचि देव । ज्ञानदेवी धरीयला भाव ।ज्ञान होईल जीवा सर्व । यासी संदेह नाही ॥६॥
ज्ञानदेवी धरीता ध्यान । ध्याता होय समाधान ।जीवी शीवी परिपुर्ण । एके रात्री किर्तन केलीया ॥७॥
झणे तू व्याकूळ होसी चित्ते । मनी आठवी गा माते ।नामस्मरणे एकाचित्ते । रामकृष्ण गोविंद ॥८॥
नामा म्हणे तू समर्थ होसी । अर्जुनी प्रीती करिसी ।हे सांगीतले व्यासी । एकादशाध्यायी ॥९॥
तैस पावे तू विश्वेशा । विश्वरुपा जगन्निवासा ।मी होतसे कासाविसा । ज्ञानदेवाकारणे ॥१०॥
तरी तू गा युगानयुगी असशी भक्ताचिंया संगी ।आम्ही विनटलो पांडुरंगी । रंगारंगी विठ्ठली ॥११॥
एक वेळ माझा शोक । दुरी जाय हरे विख ।ते करी निर्विशेष । नामा येतसे काकुळती ॥१२॥
न ये नेत्री जळ । नाही अंतरी कळवळ ॥१॥
तो हे चावटीचे बोल । जन रंजवणे फोल ॥२॥
न फळे उत्तर । नाही स्वामी जो सादर ॥३॥
तुका म्हणे भेटी । जव नाही दृष्टा दृष्टी ॥४॥
अन्नाच्या परिरमळे जरि जाय भूक ।तरि का रे पाक घरोघरी॥१॥
आपुलाले तुम्ही करारे स्वहीत । वाचे स्मरानित्य राम राम ॥२॥
देखोनिया जीवन जरी जाय तहान । तरी का साठवण घरोघरी ॥३॥
देखोनिया छाया सुख न पवीजे । जव न बैसिजे तया तळी ॥४॥
हित तरी होय गाता आईकता । जरी राहे चित्ता दृढ भाव ॥५॥
तुका म्हणे होसी भावेचि मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची ॥६॥
गाय नाचे रंगी । शक्ती अद्भूत हे अंगी ॥१॥
हेतो देणे तुमचे देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥२॥
अंगी प्रेमाचे भरते । नेघे उतार चढते ॥३॥
तुका म्हणे वाणी । प्रेम अमृताची खाणी ॥४॥
पुर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाचा ॥१॥
बांधू विठ्ठल सांगडी । पोहूनी जाऊ पैल थडी ॥२॥
अवघे जन गडी । घाला उडी भाईनो ॥३॥
हे तो सर्वकाळ । अमूप आनंदाचे बळ ॥४॥
तुका म्हणे थोरा पुण्ये । ओघ आला पंथे येणे ॥५॥
एक भाव चित्ती । तरी न लागे काही युक्ती ॥१॥
कळो आले जीवे । मज माझियाचि भावे ॥२॥
आठवचि पुरे । सुख अवघे माहेर ॥३॥
तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥४॥
नाचे टाळी पिटी । प्रेमे अंग धरणी लोटी ॥१॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥२॥
न धरिती लाज । नाही लनासे काज ॥३॥
तुका म्हणे दाटे । कंठी नेत्री जळ लोटे ॥४॥
नाम आठविता सद्गदित कंठी । प्रेम वाढे पोटी ऐसे करी ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री । अष्टांगही प्रेम तुझे ॥२॥
सर्वही शरिर वेचो या किर्तनी । गाउ निशीदिनी नाम तुझे ॥३॥
तुका म्हणे दुजे न करी कल्पांती । सर्वदा विश्रांती संतापायी ॥४॥
सद्गदित कंठो दाटो । येणे फुटो –हदय ॥१॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥२॥
नेत्री जळ वाहो सदा । आनंदाचे रोमांच ॥३॥
तुका म्हणे कृपादान । इच्छ मन हे जोडी ॥४॥
शिळा जया देव । तैसा पुळे त्याचा भाव ॥१॥
होय जतन ते गोड । अंतराय येती नाड ॥२॥
देव जोडे भावे । इच्छेचे ते प्रेम घ्यावे ॥३॥
तुका म्हणे मोड दावी । तैशी फळे आली व्हावी ॥४॥
जाला प्रेतरुप शरिराचा भाव । लक्षियेला ठाय स्मशानीचा ॥१॥
रडती रात्रंदिवस कामक्रोध माया । म्हणती हाय हाय यमधर्म ॥२॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरिरा।ज्ञानाग्नी लागला ब्रम्हत्वेसी ॥३॥
फिरवीला घट फोडीला चरणी । महावाक्य ध्वनि बोंब जाली ॥४॥
दिली तिळांजुळी कुळनामरुपासी । शरीर ज्याचे त्यासी समर्पीले ॥५॥
तुका म्हणे रक्षा जाली आपोआप । उजळीला दीप गुरुकृपे ॥६॥
उठाउठी अभिमान । जाय ऐसे स्थळ कोण ॥१॥
ते या पंढरीसी घडे । खळा पाझर रोकडे ॥२॥
नेत्री अश्रुचिया धारा । कोठे रोमांच शरीरा ॥३॥
तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला ॥४॥
आनंदाच्या कोटी । साठविल्या आम्हा पोटी ॥१॥
प्रेम चालीसा प्रवाह । नाम वोघ लवलाहो ॥२॥
अखंड खंडेना जीवन । रामकृष्ण नारायण ।३॥
थटी ऐहीक्य परत्र । तुका म्हणे समतीर ॥४॥
दाटे कंठ लागे डोळीया पाझर । गुणाची अपार वृष्टी वरी ॥१॥
तेणे सुखे छंदे घेईन सोहळा । होऊनि निराळा पापपुण्या ॥२॥
तुझीया मोहे मागील विसर । अलाप सुस्वर करिन कंठ ॥३॥
तुका म्हणे येथे पाहिजे सौरस । तुम्हाविण रस गोड नव्हे ॥४॥
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काय । भेद नाही देवा तया ॥२॥
आनंदले मन । प्रेम पाझारती लोचन ॥३॥
तुका म्हणे आळी । जीवे नुरेचि वेगळी ॥४॥
गाई गोपाळ यमुनेची तटी । येती पाणीया मिळोनी जगजेठी ।
चेंडू चौगुणा खळती वाळवटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी हो ॥१॥
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळते देखावया हरी ।
मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनी परस्परी वो ॥२॥
चिरे चोळिया त्या धुता विसरली । ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती ।
कोणा नाठवे हा कोण कुळ याती । झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती वो ॥३॥
दंत धावनाचा मुखामाजी हात । वाद्ये वाजती नाइके जनमात ।
करी श्रवण श्रीकृष्ण वेणूगीत । स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो ॥४॥