गुरुवर्य ह.भ.प.ज्ञानेश्‍वर महाराज झणझणे
(ओतुर,ता.जुन्‍नर, जि.पुणे.)
यदा यदा ही धर्मस्‍य ग्‍लानीर्भवती भारत ।
धर्मसंस्‍थापनार्थाय संभवामी युगायुगे ॥

धर्मावर ग्‍लानी येते व पृथ्‍वीवर अधर्म माजतो तेंव्‍हा देव स्‍वत: अवतार घेतात व संतही अवताराला येतात. भगवंताने कृत, त्रेता, द्वापार व कली या चौयुगामध्ये विविध अवतार घेऊन दुष्‍टांचे निर्दळन, भक्‍तांचे पालन व धर्माचे रक्षण केले.मात्र हे करताना देवाला एकटयाला हे शक्‍य नसल्‍याने त्‍याने आपल्‍या सोबत भक्‍तांनाही अवतार घेण्‍याचे सांगीतले आहे. देवाच्‍या कार्याला देव सांगतील त्‍याप्रमाणे संत महात्‍म्‍यांनीही मृत्‍युलोकात अवतार घेतला आहे.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन । हेची करणे आम्‍हा काम बीज वाढवावे नाम ॥

जड जीवांचा उध्‍दार देवाच्‍या नामानेच होतो. त्याना नामाचे महत्‍व कळावे व त्‍यायोगे देवाची अनुभती यावी म्‍हणून संतानी अट्टाहास केला.

करा रे बापांनो साधन हरीचे । झणी करणीचे करु नका ।
जेणे नव्‍हे जन्‍म यमाची यातना । ऐशीया साधना करा काही ॥

नर देहाला आलेल्‍या मनुष्‍य जीवाने देवाची ओळख अर्थात आत्‍मसाक्षात्‍कार करुन घेतला नाही तर मनुष्‍य जन्‍म वाया जाउन पुन्हा जन्‍म-मरणांच्या फे-यात त्‍याला पडावे लागेल.

शेवटची पाळी एक मनुष्‍य जन्‍म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥

म्‍हणून संतानी सर्वसामान्‍यांपर्यंत देवाचे नाम पोहचवले व स्‍वस्‍वरुपाची ओळख करुन दिली. धर्माचे पालन करण्‍यासाठी त्‍यांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला.संताचे कार्य अलौकीक असून ते मायाजाळात पडत नसतात. मात्र संत जगातून गेल्‍यानंतर त्‍यांचे महत्‍व जगाला कळते.ज्‍याप्रमाणे संत ज्ञानेश्‍वर,संत तुकाराम,संत एकनाथ महाराज इत्‍यादी संत ज्‍यावेळी होते तेंव्‍हा त्‍यांना ओळखणारे विरळच. तसेंच संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांनीही संताच्‍या मार्गाने भक्‍तीमार्गाचे अलौकिकच कार्य केले आहे.त्‍यांची ओळखसुध्‍दा त्‍यावेळी अनेकांना झाली नाही.भक्तीकार्यात विरोधच त्‍यांना सहन करावा लागला तरीही त्‍यांनी भक्‍तीमार्गातुन सर्वसामान्‍यांना परमार्थाचा अनुभव यथार्थपणे आणून दिला.

दिसती जनी वनी प्रत्‍यक्ष लोचनी । एकाजनार्दनी ओळखीले ॥

संताचे उपकारातून उतराई होणे शक्‍य नाही, त्‍यांनी अहोरात्र टाहो फोडून सांगीतले ज्‍या युक्‍तीने भक्‍तीमार्ग अवलंबला त्‍याची सुलभ रीत कांय आहे? हे आजही जगाला कळावे व त्याचे मार्गदर्शन व्‍हावे हा एकमेव अट्टाहास आहे.यामुळे कदाचीत अनेकांना वाटेल की आम्‍ही लौकीकाचे पाठी लागलो आहोत. पण तसा कोणताही अट्टाहास नाही व राहणार नाही.याचा एकमेव उददेश एवढाच की, साधुसंतानी जगाला ज्‍या सन्‍मार्गाची दिशा दिली,अशा अनेक संताची कार्य वेब साईट नेटद्वारे आज पाहतो आहे. मग मनात संकल्पना स्पुरली की,श्रीपाद बाबा व रामदास बाबा यांचेही कार्य साधुसंताप्रमाणे असामान्‍य व अलौकीक असून त्‍यांची ही वाहीनी कां नसावी? हा एकमेव उददे्श आहे.यामध्‍ये कोणताही स्‍वार्थ,वैयक्तीक कोनाचा लौकीक वाढावा असा हेतू नाही, 21 वे शतक संगणकीय युग असुन अनेक सुशिक्षीत पीढी आज संगणक क्षेत्राद्वारे विविध ज्ञान ग्रहन करत असतात.महाराष्ट्र संपूर्ण संगणाकाने जोडणे व सर्व शासकीय कामकाज संगणकाद्वारे करण्‍याचा उददेश महाराष्‍ट् शासनाचा आहे.नव्‍हे नव्‍हे आज जवळ जवळ कित्‍येक बाबी संगणकाद्वारे चालू झालेल्‍या आहेत.अशा सुशिक्षीत वर्गाला व जगाला संताचे विचार व संस्‍कृती कळावी म्‍हणून हा अल्‍पसा प्रयत्‍न यामार्फत अवलंबला आहे."तुका म्‍हणे सत्‍य कर्मा व्‍हावे साह्य । घातलीया भय नरका जाणे ॥" आपणास यामार्फत मिळणारे विचार आत्मीयतेने स्‍वीकारुन संताचे कार्याला अनुमोदन दिल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. संत श्रीपाद व संत रामदास बाबांच्‍या बाबतचे विचार याद्वारे जगाला कळावे व ज्या देवाचे नामाने मनुष्याचा उद्धार होतो ते नाम किंवा बोध देणारा संप्रदाय अनादिकालचा आहे.त्याद्वारे आपलीही उद्धाराची जिज्ञासा वाढीस लागून श्रोत्रिय ,ब्रम्हनिष्ट व दयाळू संतमालीकेतील सदगुरु भेटो. आपणास आव्‍हान करतो की या वेबसाईटसाठी संदर्भीय इमेल द्वारे आपल्या प्रतीक्रिया कळवाव्यात किंवा संपर्क साधावा.