गुरुवर्य. ह. भ. प. गोविंदबाबा गाडगे
(साकोरी ता.जुन्नर, जि.पुणे.)

 

तुका म्हणे तुमच्या उपकारासाठी । नाही माझ्या गाठी काही एक ॥
श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं । मुमुक्षुनाम ज्ञानदानैक्यदक्षंम ॥
घोटी क्षेत्रे निवासनं । तं नमामि वेदविद्यावरीष्ठं ॥
भरत खंडी नरदेह प्राप्ती । हे तव परम भाग्याची संपत्ती ।
पवित्र ते कुळ पावन तो देश । तेथे हरीचे दास जन्म घेती ॥

 

संत तुकाराम महाराजांनी अभंग वाणीतून पुण्यवान भारत देशाचे महत्व विशद केले आहे. या पवित्र भूमीत भगवतांनी व ऋषीमुनी,संतमहात्म्यांनी धर्माचे रक्षण व भक्तांचे पालन करण्यासाठी अवतार घेतले. प्रभु रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे भगवंताने याच भारत भुमीत अनेक अवतार धारण केले. भगवत गीतेत याबाबत विवेचन स्वतः श्रीकृष्ण भगवंताने केले आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लार्निभवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

त्याचप्रमाणे ऋषीमुनीं, संतमहात्मे, सत्तपुरुष यांनीही धर्म व संस्कृतीचे पालन करण्यासाठी आपले संपूर्ण जीवनच व्यतीत केले आहे. याचे यथार्थ वर्णन वेद, शास्त्र, पुराण, उपनिषदे, विविध ग्रंथ याद्वारे करण्यांत आलेले आहे. भगीरथ ऋषीच्या तपश्चार्येने या देशात गंगा ही पवित्र नदी हिमालयात स्वर्गातून उगम पावली व या देशाला पावन केले. म्हणून या देशाला भारत असे नांव संबोधले जाते. भारत देशाचा फार मोठा इतिहास व संस्कृती असुन याच देशात छत्रपती शिवाजी महाराज अवताराला आले. त्यांनी समर्थ रामदास स्वामी व संत तुकाराम यांच्या धर्मउपदेशाने हिंदू धर्माचा अभ्यास करुन हिंदवी स्वराज्यापची स्थापना केली व धर्माचे रक्षण केले. झाशीची राणी, महाराणा प्रताप, तात्याटोपे, बाबू गेणू, स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रपीता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे, भगतसींग, राजगुरु, लाल बाहादुर शास्त्री, लोकमान्य टिळक अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी भारत देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले व प्राणांच्या आहुत्या दिल्या.अशी ही भारत भुमी संत महात्म्यांच्या पद स्पर्शाने पुणीत आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमीत्ताने गीतेचे तत्वज्ञान जगासाठी याच भारतभूमीत उदयाला आणले.

इये मराठीचीये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ।
घेणे देणे सुखची वरी । होऊ दे या जगा ॥

हाच गीता ग्रंथ अमेरीकेतील शिकागो धर्मपरीषदेत जगातील सर्व धर्मग्रंथांबरोबर ठेवण्यात आला. शिकागो धर्मपरीषदेत प्रत्येक देशातील धर्मगुरुंचे व्याख्यान आयोजीत करण्यांत आले होते. मात्र गीता या ग्रंथाचे महत्वं जगातील धर्मगुरुंना नसल्याने हा ग्रंथ त्या धर्मपरीषदेत सर्व ग्रंथांचे खाली ठेवण्यांत आला होता. पण सत्य केंव्हा् लपुन राहत नाही, ते स्वामी रामकृष्णे परमहंस या महात्म्यांच्या बोधातून आत्मसाक्षात्काराला पावलेले त्यांचे शिष्य स्वांमी विवेकानंद यांनी जगासमोर मांडले. ज्यावेळी शिकागो धर्मपरीषदेत त्यांना हिंदुस्थानातील धर्म ग्रंथावर विवेचन करण्याची संधी मिळाली तेंव्हा त्यांनी जगातील सर्व तत्ववेत्ते व धर्मगुरु यांचे लक्ष वेधून घेऊन गीतेचे तत्वज्ञान जगाला स्पष्ट केले.अशा देशातील महाराष्ट्र ही संताची पावन भूमी आहे.याच पावनभुमीत संत ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान काका, नामदेव, जगदगुरु संत तुकाराम, संत जनाबाई, सावतामाळी, विसोबा खेचर, चोखामेळा, गोरोबा काका, संत सखुबाई, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ, निळोबा, संत कबीर, संत मुक्ताबाई, इत्यादी संतानी अवतार घेतले. त्यांनी धर्माचे पालन केले व भक्तीसुखाचा आनंद स्वतः उपभोगुन सर्व जगाला मुक्तपणे दिला. वेद व गीता यामध्ये गुहय असलेले ज्ञान जगासाठी खुले केले.

संत एकांती बैसले । सर्वही सिद्धांत शोधिले ।ज्ञानदृष्टी अवलोकिले । सार निवडोनि काढिले ॥
ते हे श्रीहरीचे नाम । सर्व पातकां करी भस्म ।अधिकारी उत्तम अथवा अधम । चारी वर्ण नरनारी ॥

भगवंताच्या नामाने चौ-यांशी लक्ष योनीच्या जन्म-मरण फे-यातून मनुष्याची सुटका होते.१९व्या शतकात भागवत धर्माचे अद्वेत तत्वज्ञान मुक्त हस्ताने वाटण्यासाठीच संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा याच पवित्र महाराष्ट्र भूमीत अवतरले. माऊली ज्ञानोबांनी सातशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात संतरुपी उद्यानाची स्थापना केली. त्यातुन अनेक संतरुपी वृक्ष आपल्या‍ कार्याने व स्मृतीने अमर झाले होत आहेत. आज हे संत उद्यान नव नवीन वृक्षांनी घनदाट होत आहे.१९व्या शतकाच्या सुरुवातीला संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या रुपाने वटवृक्षाची रोपटी उदयाला आली व त्यांचे बघता बघता महावृक्षात रुपांतर झाले. त्यांनी आपल्या ७८ वर्षाच्या काळात गगनाला गवसणी घालण्याचे काम केले. त्या काळात संसार तापाने तापलेल्या जीवाला चंद्रापेक्षाही शितल छायेमध्ये घेऊन त्यानी विश्रांती दिली. स्वतः अनेक हालअपेष्टा सोसत "तुका म्हणे आता । उरले उपकारा पुरता॥" हेच ध्येय उराशी बाळगून समाजच्या सुखासाठी कष्ट घेतले. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृ्तातील बंदीस्त तत्वज्ञान सर्व सामान्यांना मराठी भाषेमध्यें आणले "माझा मराठाचि बोल कौतुके । परी अमृतातेही पैजा जिंके ॥" याप्रमाणे मराठी भाषेत धर्माची मुहूर्तमेढ रोवुन व भागवत धर्माचा पाया रचला. समाजातील संस्कृती परंपरा जपत नवीन विचारांची भर घालून अध्यात्मीक लोकशाहीची स्थापना केली. त्यांचा आत्मा विश्वात्मक झाला व त्यांना सगळीकडे "भरला घनदाट हरी दिसे" याची प्रत्यक्षानुभूती आली. त्यांनी समाजाचे सुक्ष्म निरीक्षण करुन धर्मपंडिता विरुध्द बंड पुकारले. सर्वसान्यांना मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्व‍री हा अप्रतीम व ‍अद्वितीय ग्रंथ निर्माण केला व ज्ञान भांडार खुले केले. त्यांच्या अवतार समाप्तीनंतर धर्मावर फार मोठे संकट कोसळले व परकीय साम्राज्याचे अंमल सुरु झाले.मात्र या संकटकाळात धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी शांतीब्रहृ एकनाथ महाराज यांचा अवतार झाला. धर्म रक्षणासाठी त्यांनी भाषा व स्वराज्य यांचा मेळ घालून धर्म जिवंत ठेवला. तसेच त्यांनी अभंग, गौळणी, भारुड इ.रुपके भावार्थ रामायण,एकनाथी भागवत अशा प्रकारचे विपुल वाःग्मय निर्माण केले.
"धर्माचे पालन । करणे पाखंड खंडन ॥ हेची करणे आम्हा काम । बीज वाढवावे नाम ॥" याचप्रमाणे त्यांचे हे काम चालू राहण्यासाठी संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवतार झाला. या त्रिवेणी संगमातून धर्माची स्फूर्तीदायक चळवळ उभी राहीली. धर्मावर आलेली ग्लानी दूर होऊन नवचैतन्य निर्माण झाले. तुकाराम महाराजांनी पाखंडाचे खंडन करुन भगवंताच्या नामाने सकळांचा उध्दार होतो हे टाहो फोडून सांगीतले. या विभूतीनंतरच्या काळात धर्म, भक्ती व स्वातंत्र्यावर पुन्हा परकीयांचे वर्चस्व स्थांपन झाले. त्यामुळे धर्म बाजुला सारला जावून त्याची पायमल्ली होऊ लागली. संताच्या विभूती धर्मालागी अवतरती याप्रमाणे संत श्रीपादबाबा यांचा अवतार झाला. एका बाजूला स्वातंत्र्याच्या यज्ञ कुंडात आपल्या प्राणाचे बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर होते तर दुस-या बाजूला भागवत धर्म संताचा वारसा चालवणारे व पाखंडाचे खंडन करणारे या दोन्हींचाही उद्देश एकच होता तो म्हणजे समाज स्वातंत्र्य होय. इंग्रजांच्या वर्चस्वातुन देशाची सुटका करण्यासाठी क्रांतीकारी झटत होते तर समाजातील पाखंडाचे खंडन व संताचा सत्यभक्ती मार्ग दाखवण्याचे कार्य संत श्रीपाद व संत रामदास बाबा हे करत होते. भक्तीवीर व क्रांतीवीर यांनी आपले लढे नेटाने चालू ठेवले. संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांनी आपल्या सर्वस्वाचा होम करुन ते धर्म व समाज कार्यात उतरले.

यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर ॥ करावा विचार । न लगे चिंता कवणासी ॥

ही तुकोबांची हाक समाजाला मारुन सर्वसमान्यांतील देव कळण्यासाठी त्यांचे गुरु संत बंडोबा बाबा व संत केरोबा बाबा यांच्याकडून मिळालेले अद्वेत तत्वज्ञान स्वतःअनुभवले व ते जगाला सांगीतले. "अनुभव आले अंगा । ते या जगा देत असे ॥" भागवत धर्माच्या रक्षणाचे व भक्तिमार्ग उजळण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी सांगीतलेल्या तत्वज्ञानातून हजारो भावीकांना त्याची अनुभूती आली. त्या भक्ती प्रेमाचा आनंद लुटला व आजही तो आनंद घेत आहेत.

ते पहाटेवीण पाहवीत । अमृतेवीन जेववीत । योगेवीन दावीत। कैवल्य डोळा ॥

या माऊलीच्या अनुभवाप्रमाणे त्यांनी हाच मार्ग स्वीकारला. जेंव्हा ईश्वर विषयक ज्ञान लोप पावते तेंव्हाच संताचा अवतार होतो. खरा देव कोणता? जीवाशी त्याचा संबंध काय? तो देव अपरोक्ष अनुभवाने समजावून देतात तेच खरे संत होय. त्यांनी देवाची परीपूर्ण अनुभूती घेतलेली असते जो राम तोच कृष्ण तोच रामकृष्ण (परमहंस) होऊन आलाय हे म्हणणे पटले फक्त स्वामी विवेकानंदाना आम्ही वैकुंठवासी हे म्हणणे पटले फक्त तुकाबोरायांच्या चौदा टाळक-यांना

ज्यांचे घेता चरण तीर्थ । चारी मुक्ती पवीत्र होत । पाया लागती पुरुषार्थ । धन्य गुरुभक्ता त्रिलोकी ॥

श्रीकृष्णाची मुरली ऐकल्या नंतर जी स्थिती गौळणींनी अनुभवली तिच अष्टसात्वीक भावाची अवस्था साधकांनी बाबांच्या कृपेने अनुभवली हा अनुभव नुसता आनंद संप्रदायाचा नाही,तर ज्ञानेश्वरीत माऊलींनी प्रतीप्रादीत केला आहे."चित्त चाकाटले आटु घेत । वाचा पांगुळली जेथीची तेथ ॥आपादकंचुकीत । रोमांच आले ॥" (ज्ञाने अ.९ श्लोक ३४) तसेच भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचाही हाच अनुभव आहे.

पुलक धर्म रोमांच जव नाही उठले । सजल न झाले नयन जव ॥
हरीभक्तीचे सुख कळले जे म्हणती । लटिके बोलिजेती उभयलोकी ॥ नामदेव गाथा ॥
त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराजांनी अभंगगाथेमध्ये
कापे तो थरारी । स्वरूप देखे नेत्री । अश्रू त्या भीतरी। वाहताती ॥

असे वर्णन केले आहे. जगदगुरू तुकोबारायांचा कंठी प्रेम दाटे । नयनी निर लोटे । हृदयी प्रगटे । रामरूप ॥ हाच अनुभव आहे. याच संताचा वारसा वारकरी संप्रदायारुपाने आहे. सकल संताचा भक्तीचा अनुभव समान आहे. मग वारकरी संप्रदाय किंवा इतर संप्रदायांतूनही भक्तीची अनुभूती का नको? असे जर नसेल तर चालु असलेल्या परमार्थात कुठेतरी विसंगती आहे किंवा रीत नाही. परमार्थाची अत्यंत सुलभ रीत महाविष्णुपासून आलेल्या आनंद संप्रदायाचे बारावे महापुरुष संत श्रीपाद बाबा यांनी वारकरी संप्रदायाला अनमोल देणगी दीली.वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प.धुंडा महाराज देगूलकर, ह.भ.प.जोग महाराज, ह.भ.प.मामासाहेब दांडेकर, ह.भ.प.बंकट स्वामी, ह.भ.प.रंगनाथ महाराज परभणीकर, गुरुवर्य ह.भ.प.कोंडाजी बाबा डेरे व इतर अनेक महात्म्यांप्रमाणेच भक्‍तीचे महान कार्य संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबांनी केले.

गेले दिगंबर ईश्वर विभूती । राहिल्या त्या किर्ती जगामाजी ॥