ऐसिया देखोनि श्रीरामा । कौशलेसी आला प्रेमा । त्याव सुखाच्या सुख संभ्रमा । देहधर्मा विसरली॥६४॥ अंग सर्वांगे रोमांचित । स्वेद बिंदु रवरवित । चित्त चैतन्यी विरत । नेत्री स्त्रवत आनंदाश्रु ॥ ६५॥
आध्यात्मशास्त्रातील प्रभु रामचंद्राच्या जीवन चरीत्रातावर आधारील माणवी जीवनाला भक्तीमार्गाची दिशा देणारा व मार्गदर्शन ठरणारा भावार्थ रामायण हा महान ग्रंथ संत एकनाथ महाराजांनी आत्मीयतेने व प्रेमभावाने जगाचे कल्यासाठी साकारलेला आहे.साधकाला श्रोत्रीय, ब्रहमनिष्ठ व दयाळू सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनात साधना करताना देवाविषयी प्रेमभाव अर्थात अष्ठसात्वीकभाव निर्माण होतात.प्रेमावस्था म्हणजे जीवनात अतीउच्च स्थिती असून ही भगवंताची कृपा म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय.याबाबतचे निरुपन भावार्थ रामायण या ग्रंथात प्रत्यक्षपणे साकारले आहे.त्यातील काही लक्षणे प्रभूकृपेने आपल्याही जीवनात निर्माण व्हावीत हीच श्री सद्गुरुजवळ प्रार्थना.
आइका कौसल्येची स्थिती । अखंड बैसे एकांती । न साहे संगु सांगाती । गर्भप्राप्ती श्रीरामु ॥ ७५ ॥ नावडे वस्त्र भूषण । नावडे सुमन चंदन । नावडे भाग दिव्यान्न । नावडे शयन मंचकी ॥७६॥ देही निर्लोभ लक्षण । हेचि वैराग्य दृढ दारुण । उदरा आला रघुनंदन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे ॥७७॥ आस्था सांडोनिया जन । आवडी बसवी विजन । लेइली गर्भ दिव्यांजन । राम निधान उदरस्थ ॥७८॥ करुनी कल्पनेसी मारु । सेवी र्निवकल्प कल्पतरु । तया तळी अति आदरु । सहजासनी सन्नध्द ॥७९॥ गर्भोदरीं बैसली दृष्टी । यालागी वृत्ति उफराटी । आपणा समान देखे सृष्टि । गर्भपुष्टी स्वाभावें ॥८०॥ यापरी ते राजबाळा । वसवी शुध्द सुमनशाळा । द्वैत दृष्टी न लगे डोळा । सुख सोहळा अद्वैती॥८१। आधीच प्रीती प्रियासी । त्यावरी वसिष्ट उपदेशी । राजा निघाला वेगेसी । डोहळीयासी पुसावया ॥८२॥ सेवक सांडोनि बाहेरी । रिघाला कौसल्येच्या मंदिरी । केऊती आहे ते सुंदरी । दिशा चाह्री अवलोकी ॥८३॥ राजा पाहे भोगभुवनी । तेथ नातुडे धर्मपत्नी । पाहे अति लोभे अवोलोकुनी । नयनोन्मीलनीं न दिसे ॥८४॥ पाहता वैखरीच्या घरी । तेथ न देखे सुंदरी । मध्यमेचा माजघरी । पाहता दूरी दृष्टीसी ॥८५॥ शोधिता पश्यंती वोवरी । तेथही न देखे निजनारी । चढला परेची उपरी । शुध्दी निर्धारी न लभेची ॥८६॥ काढो नि द्वैताची अर्गळा । फेडोनि शब्दांची सांखळा । उघडी अद्वैत सुमनशाळा । गुरुवाक्य मेळा निर्धारें ॥८७॥ तेथ निघतां अतित सांकडी । फेडिली रजतमाचीं लुगडी । शुध्द सत्वाची भूषणे आडी । तेही काढी तात्काळ । ॥८८॥ ऐसी एकाकी स्वलीळा । रावो प्रवेशे सुमनशाळा । पाहे स्वये सगर्भ बाळा । तंव इही डोळा दिसेना ॥८९॥ नेत्री भरुनिया विवेका । पाहे निर्विकल्प रुखा । तया तळी बैसली देखा । अति सुरेखा कौसल्या ॥९०॥ राजा पाहे निज तन्वंगी । तेज न समाये अंगींच्या अंगली । धन्य धन्य हेचि जगी । गर्भ लिंगी सुलिंग ॥९१॥ कैसी बसली सहजासनी । जैसी योगिया लागे उन्मनी । मग राज पाहता निवाला मनी धर्मपत्नी सगर्भ ॥९२॥ तिसी देखता गर्भभावे । राजा सर्वांगे निवे । दृष्टी सुखावली सुखावे । जीवु सद्भावे दोंदिल ॥९३॥ जिसी देखता चित दृष्टी । आनंदे ओसंडे सकळ सृष्टि । तिसी करिता सुख गोष्टी । पडे मिठी परबृम्ही ॥९४॥ मग बैसोनिया नेहटी । हाती धरिली हनुवटी । झणी माझी लागेल दृष्टि । डोहळे पोटी ते सांग ॥९५॥ येरी न पाहे वरुती । दृष्टी दृश्य नये हाती । रामरुपी संचली स्थिती । व्यक्ताव्यक्ती ना देखे ॥९६॥ राजा ओसंडला अति प्रीती । मग आलिंगली दोही हाती । येरी लागली विदेह स्थिती । देहाकृति नाठवे ॥९७॥ उदरी संभवला विदेही । यालागी आठवु नुठीच देही ।सबाहय रिते उरले नाहीं । तटस्थ पाही श्रीरामे ॥९८॥ राजा म्हणे कटकटा । कैसी अवचटली हे बरबटा । की महद्भूत आले पोटा । नयनी ताठा पडियला ॥९९॥ कैसे करील मेघश्यामु । कैसे होईल पुत्र कामु । सिध्द पाववु पुरुषोत्तमु । आत्मारामु रघुवीर ॥१००॥ रामनाम कर्णपुटी । ऐकताचि ते गोरटी । उघडूनि पाहे दृष्टि । देखे सृष्टि श्रीरामु ॥१०१ ॥जंव सादरे वास पाहे । तंव नयनी तेज न समाये । मी एकी गर्भिणी येथ आहे । हा आठवु देही नाठवे ॥१०२॥ वृक्षवल्ली तृण मंडप । अवलोकिता रामरुप । अशोक पुष्पक नागचंपक । पाहता एक श्रीराम ॥१०३॥ देखे क्रीडती पाडसे । पाहता रामची प्रकाशे । जे जे देखावया बैसे । ते ते दिसे श्रीराम ॥१०४॥ जव तळवटी पृथ्वी पाहे । तव ते राम जाली आहे । फिटली पार्थिवाची सोये । देही विदेही श्रीरामु ॥१०५॥ जंव अवलोकी दाही दिशा । तंव त्या पडिला राम ठसा । पाहतां न देखे आकाशा । श्वासोच्छ्वासामाजी श्रीरामु ॥१०६॥ उदरीं विदेही संभवला । तोचि सर्वेद्रीयी ओसंडला । देहाचा पांगु फिटला । प्रपंच जाला परब्रह्म ॥१०७॥ दोरु सर्प नाहीं जाला। दोरां सर्प नाहीं भावला । दोरे सर्प नाहीं देखिला । भ्रमें भाविला भुजंगु ॥१०८॥ तेवीं ब्रह्मं प्रपंच नाहीं देखिला । ब्रह्में प्रपंच नाहीं चाखिला । ब्रह्में प्रपंच नाहीं आइकिला । भ्रमें भाविला अतिभ्रांती ॥१०९॥ प्रपंचु एकु जाला होता । हें समुळ मिथ्या वार्ता । पुढां होईल मागुता । न घडे परिभ्रांता सत्य वाटे ॥११०॥ येचि विषींचा श्लोक । वसिष्ठ बोले अलौकिक । त्याचा अर्थु तात्विक । परिस तूं सात्विक सज्जन ॥१११॥
भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपसका जना: । मेणेश्वरभावत्वं भ्रममूल मिदं जगत्
भ्रमें श्रेष्ठत्वें ईश्वर । भ्रमें कर्म धर्मं सदाचार । भ्रमें वाढविला व्यवहार । भ्रम मूल संसार निजसत्य ॥११२॥ जनकादिक मुक्त असती । तेही प्रपंचीं वर्तती । त्यांच्या प्रपंचाची स्थिती । वसिष्ट श्लोकोक्ति वदे तें ऐका ॥११३॥
ब्रह्मत्वं ब्रह्मभुवनं ब्रह्मभूतपरंपरा । ब्रह्माहं ब्रह्म मच्छत्रुर्ब्रह्म सन्मित्रबांधवा:
जैसा सोनियाचा रवा घेतां । तो अलंकारा समस्ता । सोनेपणें घे तत्वतां । तेवीं व्यवहार मुक्तां परब्रह्मत्वें ॥११४॥ मुक्तां ब्रह्म मी तूं पण । शत्रु मित्र ब्रह्म पूर्ण । ब्रह्मरुप त्रिभूवन । भूत सनातन ब्रह्मरुप ॥११५॥ ऐसिया ब्रह्मस्थिथी । मुक्त संसारी वर्तती । जिण्यामरण्याभ्रांती । नाहीं त्याचे चित्तीं ब्रह्मरुपत्वें ॥११६॥ कौसल्या रामगर्भे निभ्रांत । राजा पुत्रधर्मे कर्मभ्रांत । डोहळे तीस पसतां तेथ । विनोदें विस्मीत परमार्थ परिसावा ॥११७॥ स्वस्ति श्रीरामायण । एकाजनार्दनी शरण । डोहळीयांचे निरोपण । विनोदीपूर्ण परब्रह्म ॥११८॥
इति श्रीभावार्थ रामायणे बालकांडे एकाकारटीकायां चतुर्थप्रसंग: ॥
ऐसिया देखोनि श्रीरामा । कौसल्येची आला प्रेमा । त्या सुखाच्या सुखसंभ्रमा । देहधर्मा विसरली ॥६४॥ अंग सर्वांगे रोमांचित । स्वेदबिंदु रवरवित । चित्त चैतन्यी विरमत । नेत्री स्त्रवत आनंदाश्रु ॥६५॥ स्वानंदु न समाये पोटी । सुखोर्मी बाष्पु दाटे कंठीं । उन्मळीत जाली दृष्टी । पडिली सृष्टी मूर्छित ॥६६॥ जेवी केळीते झगटी पवन । तैसे शरीर कंपायमान । वाचेसी पडिले महामौन । देहाभिमान विसरली ॥६७॥ सत्वगुणांचेभरिते भरे । ते आपेआप ओसरे । सावधान होउनि चमत्कारे । राम निर्धारे निर्धारी ॥६८॥
रायासी पडिली आशंका । पोटा विवशी आली देखा । की गर्भीच उठिली ताटिका । थितिया सुखा अंतरलो ॥२५॥ येरी म्हणे सुमैत्र नेटका । अझुणी कैची रे ताटिका । छेदू बाणे एका । जनाच्या सुखा अवरोधी ॥२६॥ राजा म्हणे न चले मंत्रु गुणिया पाचारा विश्वामित्रु । येरी म्हणे केऊता गेला सौमित्रु । आला विप्रु यागासी ॥२७॥ वेगे बाण देका बहु । विंधु मारिच मारु सुबाहू । आजि राक्षसा करु कुहू । हा हो हु हू करिताती ॥२८॥ राजा करिता हे स्मरण । परशुराम अवतारु जाण । त्याचेनि नामे हरो दारुण । महद्भूत संचार ॥२९॥ येरी म्हणे आइके जामदग्ना । धरुष्य भंगिले म्या प्राज्ञा । विचारी ब्राम्हणां सर्वज्ञा । जाई तुज आज्ञा तपासी ॥३०॥ राजा म्हणे इसी देही संचार ताठा । मुखी सुटलासे फाटा । काइसे डोहळे कटकटा । नेणे पोटा काय आले ॥३११। वेगी पाचारा वसिष्ठ । पंचाक्षरी तो अदटु । रक्षा परीक्षा करील सुभटु । आम्हा श्रेष्ठ कुलगुरु ॥३२ ॥ येऊनि वसिष्ठ जव पाहे । तव ते रामु जाली आहे । म्हणे धन्य धन्य वो माये । वंदा पाये इयेचे ॥३३॥ सादरे पाहो गेला दृष्टी । तवचित्तचैतन्या पडिली मिठी । हरिखे बाष्प दाटे कंठी पडिला सृष्टी मूर्छ्चित ॥१३४॥ नेत्री अश्रुंचिया धारा । रोम थरकती स्वेद शरिरा । अंग कापतसे थरथरा । अवस्था मुनिवरा अनावर ॥३५॥ रावो म्हणे कांही न चले येथे । गुणिया ग्रासियेलो भुतें । कवण सोडवी ययाते । म्हणौनि चित्ते व्याकुळै ॥३६॥ म्हणे मी कौसल्येची आवरु । की वसिष्ठा सावध करु । ऐसा जाजावे नुपवरु । धावा थोर फोकारी ॥३७॥ श्रावण वधाचे क्लेश । सोशिले म्या अशेष । पुढा तेचि बहुवस । वसिष्ठ दोष हत्येचे ॥३८॥ म्हणे विधातया दुष्टा । काय लिहिले अदृष्टा ।भूते ग्रासिले वसिष्ठा । दोष मोठा मज घडला ॥३९॥ यज्ञ केला म्या पवित्र । कुळी पावेन सुपुत्र । तव माझारीच हे चरित्र । कैसे विचित्र ओढवले ॥४०॥ अवस्था जिरऊनि पोटी । वसिष्ठे उघडिली दृष्टी । राजा धावोनि झोंबिन्नला कंठी । सृष्ठि उफराटी पै जाली ॥४१॥ अग्नीसी आली शीतळ कणी । मेरु उलथला वारियांनी । जो काळ कोण्हा दृष्टीसी नाणी । तो व्याधीने पीडुनिजिजंतिला ॥४२॥ स्वामी वसिष्ठा तुज हि बाधा । हे तव गोष्टी न घडे कदा । पुत्र सुखाआड आपदा । भाग्य मंदा आम्हासी ॥४३॥ वसिष्ठ म्हणे भाग्यश्रेष्ठ । पोटा आले वैकुंठपीठ । पुरुषोत्तम जाला प्रगट । दैवे उद्भट कौसल्या ॥४४॥
एवं जन्म मरणातीत । अपार सुखे पदोदित । त्या स्वरुपा नांव रघुनाथ । जाण निश्चित श्रीरामा ॥१७७॥वेद वदांग पुराण । श्रुति स्मृति शास्त्रे विज्ञान । इतिहासाचे गुहय ज्ञान । ते हे निरोपण रघुनाथा ॥१७८॥ सर्व साराचे सुख सार । तो हा इतिहास साचार । सकळ ज्ञानाचे ज्ञानगव्हर । अति उदार मुक्तत्वे ॥१७९॥ हे निरोपण जै जीवे घोटे तै विषयांचे लाहाणे फिटे । जन्ममरणाचे खत फाटे । भवभाव आटे मृगजळत्वे ॥१८०॥ या इतिहासाचे निजवर्म । कर्मची होय परब्रह्म । साधकु होये आत्माराम । नित्यत्वे परम निजमोक्ष जोडे ॥१८१॥ म्या जे निरोपले निरोपण । ते जीवन्मुक्ताचे लक्षण । तू तव आत्माराम आपण । पूर्णत्वे पूर्ण परमात्मा तू ॥१८२॥ आईकोनि वसिष्ठाचे वचन । श्रीराम स्वये आपण । आपुले देखे पूर्णपण । स्वानंदघन सुखरुप ॥१८३॥ होता स्वस्वरुपीं भेटी । चित्तचैतन्या पडली मिठी । हरुषे बाष्प दाटे कंठी । आनंद पोटी न समाये ॥१८४॥ आनंद ह्र्दयी न समाये । तो उलथला नेत्री वाहे । पूर्ण दाटला विस्मये । देहाची सोये स्फुरेना ॥१८५॥ प्राण पांगुळला जेथीचा जेथ । कंठ जाला सद्गदित । इंद्रिये उपरमलीं समस्त । पडिले तटस्थ चिद्रूपत्वे ॥१८६॥ सर्वांसी रोममुळी । आली स्वेदुकणिका निर्मळी । मुक्त मोतियांची जाळी । पांघुरविली निजसत्वे ॥१८७॥ नि:शेष नाठवे मी तू पण । खुंटली वाचा पडिले मौन । जीव शिवाचे पुसले भान । चित्त्समाधान पावला ॥१८८॥
वसिष्ठ पाहे शत्रुघ्नाकडे । तव तो बोले चाले ना रडे । श्रीराम विरहे जाले वेडे । मागे पुढे स्मरेना ॥१०८॥ विसरला तो घरदार । विसरला इंद्रिंयव्यापार । विसरला निजशरीर । तदाकार होऊनि ठेला ॥१०९॥ आठविता रामचंद्र । शत्रुघ्ना लागली योगमुद्रा । विसरला निद्रातंद्रा । कृपा रामचंद्राची ऐसी ॥११०॥ दृश्य द्रष्टा दर्शन । कर्म किया कर्तेपण । शत्रुघ्नासी नाठवे जाण । आपणया आपण विसरला ॥१११॥ करणे न करणे कांही । उठीना शत्रुघ्नाच्या ठायी धैर्य श्रीरामस्मरता पाही । देही विदेही तो जाला ॥११२॥
श्रीराम सौमित्र आणि सीता । भरत जालासे देखता । उल्हास न संडे चित्ता । प्रेमावस्था नावरे ॥ ९६॥ धावोनि धरिले दृढ चरण । सवेची घातले लोटांगण । अश्रुधारा स्त्रवती लोचन । प्रेमे शत्रुघ्न लागला पायीं ॥९७॥ त्या दोघांचे गळती नयन । श्रीरामाचे स्त्रवती लोचन । तिघां पिडले आळिंगण । त्रिवेणी पूर्ण होऊ सरली ॥९८॥ श्रीराम स्वये गंगाजीवन । भरत यमुना अति पावन । सरस्वती तो शत्रुघ्न । त्रिवेणी पूर्ण हो सरली ॥९९॥ संगमी दिसे त्रिवेणीरुप । पुढे गंगोदक निष्पाप । भरत शत्रुघ्ननिर्विकल्प । श्रीरामरुपा ते जाले ॥१००॥ लवणजळा जाहाली भेटी । तैसी खेवा पडिली मिठी । विरोनी यरयेरांच्या पोटी । ऐक्य संतुष्टी सुखरुप ॥१०१॥ अग्नि कापुरा आळिंगण । प्रथम प्रेम दैदीप्यमान । सवेची दोही हारपोन । होती गगन निर्विकार ॥१०२॥ तैसे भरत आणि शत्रुघ्न । श्रीरामी देता आळिंगण । दोघां नाठवे दोनीपण । जाले परिपूर्ण श्रीराम ॥१०३॥ अग्नीसी काष्टे खेव देती । तेही अग्निरुप स्वये होती । भरतशत्रुघ्न त्या स्थिती । स्वये होती श्रीराम ॥१०४॥ त्यांचे देखोनी आळिंगण । सीता आणि लक्ष्मण । त्यांचेही गळती नयन । जेवी घृतकण रवितेजे ॥१०५॥ भरत आणि शत्रुघ्न । तिही वंदिता लक्ष्मण । ऐक्ये पडिले आळिंगण । भिन्नपणे दिसेना ॥१०६॥ एकपिंडे जन्मले सृष्टी । त्यासी खेवा पडता मिठी । विसरोनी दु:ख कोटी । सुखसंतुष्टी श्रीरामे ॥१०७॥ जवळी असता रघुटिळक । पूर्वी हेळणा स्वाभाविक । वियोगसंगमाचे सुख । द्वंद्वदु:ख विसरले ॥१०८॥ नित्य निकट असता जाण । स्वभावे उपजे हेळन । हेळणासवे दोषगुण । सहजे संपूर्ण देखती ॥१०९॥
भरत धावोनी आपण । दृढ धरिले श्रीरामचरण । अश्रु चालिले संपूर्ण । चरणक्षाळण श्रीरामा ॥१॥ स्वेद रोमांच रवरवीत । तेणे सर्वांग डवडवीत । हरिखे उत्कंठित जाले चित्त । सद्गदित पै वाचा ॥२॥ विकळ वाचा ठेऊनी ठाई । विनटोनी श्रीरामाच्या पायी । अंजुळीपुट जोडुनिया पाही । भरत लवलाही विनवीत ॥३॥
ऐकतां श्रीराम वचन । हनुमंता आल्हाद सूंपर्ण । स्वेद रोमांच आले रुदन । श्रीराम चरण वंदिले ॥९३॥ तुटली भिन्न भेदाची गोष्टी । सुख उसळले कोट्यानुकोटी । तिघा जणा उठाउठी । पडलीमिठी क्षेमाची ॥९४॥ गंगा यमुना सरस्वती । तिन्ही मिळोनि एकी भागीरथी । रामलक्ष्मण मारुती । ऐक्यानपुवृत्ती चिन्मात्रे ॥९५॥ नाना सरितेचे संभार । मिळणी होती सागर । तेवि मारुती आणि सौमित्र । जाले चिन्मात्र श्रीराम ॥९६॥ एका विनवी जनार्दन । तिघां जाले समाधान । स्वामी समर्थ रघुनंदन । दोघजण सेवक ॥९७॥ गूळ गोडी नांवाची भिन्नता । स्वरुप एक एकात्मता । तेवि लक्ष्मण हनुमंता । सेवकता श्रीरामी ॥९८॥ पिंड भाग व्यवस्था शिवरामायणी कथा । वृथानुवाद न म्हणावा श्रोता । पहावे ग्रंथा अनाक्रोशे ॥९१॥
सीता स्वरुप वृत्तांत । आदरे सांगता रघुनाथ । ते ऐकोनि हनुमंत । पडे मूर्छितु स्वानंदे ॥७८॥ सप्रेम प्रेम प्रेम युक्त । मूर्छितु पडे हनुमंत । कृपने कळवळीला रघुनाथ । ह्र्दयाआतआलिंगी ॥७९॥ देता हनुमंता । आलिंगन । श्रीरामा नाठवे रामपण । मारुतीसी नाठवे वानरपण । ब्रह्म परिपूर्ण स्वये जाले ॥८०॥ विरोनी गेले मी तू पण । खुंटला बोल तुटले मौन । दोघे जाले चैतन्यघन । वस्तु परिपूर्ण पूर्णत्वे ॥८१॥ जीचे स्वरुप सांगता । धणी न पुरे रघुनाथा । धन्य धन्य श्रीरामकांता । तेणे हनुमंता उल्हासु ॥८२॥ तुम्ही सीताशुध्दी करिता । या खुणा पहाव्या हनुमंता । ऐसे श्रीरामे सांगता । मारुती चित्ता उल्हासु ॥८३॥
ऐकोनि सीतेचे वचन । हनुमंते स्वये उतरोन । सीतेसी घालोनि लोटांगन । मस्तकी चरण वंदिले ॥१०६॥ सीता देखताची दृष्टी । वानरासी हर्ष कोटी । तिसी होता निकट भेटी । आनंद कोटी न समाये ॥१०७ ॥ महा निधीचा लाभ जाला । सुधाब्धि चूळोदके प्राशिला । किंवा कळिकाळ जिंकोनि आला । तो पाडु जाहला हनुमंता ॥ १०८ ॥ तेणे हरखाचे नि मेळे । गडबडा पायांवरी लोळे । आनंदाश्रु स्त्रवती डोळे । सुख संमेळे डुल्ल्त ॥१०९॥ धाव धावोनि पायापडे । स्वेदगद्गदे सप्रेम रडे । पुच्छ नाचवोनि पुढे । हरुषे उडे वानर ॥११०॥ येथे सापडली सीता । जाली कार्य सिध्दी रघुनाथा । यश आले मज हनुमंता । उल्हासता नाचत ॥१११॥ श्रध्दा श्रीरामकथा श्रवण । ऐक तीचे महिमान । अहं सोहं कोहं विरोन । ब्रह्मपरीपूर्ण स्वये होती ॥१२८॥ चित्त चिंतन होय चैतन्य । बुद्धि समसाम्य समाधिघन। कर्मचि होय ब्रहम परिपूर्ण । इंद्रिया चरण चिन्मात्र ॥१२९।१ ऐसी श्रीराम स्वरुप संस्था । सादर पुसता पै सीता । ठक पडले हनुमंता । कथा वार्ता विसरला ॥१३०॥श्रीराम स्वरुप वदे सुंदरा । तेणे अवस्था वानरा । नैत्री अश्रुंचिया धारा । थरथरा कापत ॥१३१॥ अंग जाले रोमांचित । स्वेद आला डबडबीत । मूर्च्छापत्र पडे हनुमंत । तेणे विस्मित जानकी ॥१३२॥
सीता देखोनिया दिठी । तिची होता निकट भेटी । हनुमंताची हर्ष कोटी । आनंद सृष्टी न समाये ॥११३॥ महानिधीचा लाभ झाला । सुधाब्धि चुळोदके प्राशिला । की कळीकाळ जिणोनी आला । तो पाडु जाहला हनुमंता ॥११४॥ तेणे हरिखाचेनी मेळे । गडबडा पायावरी लोळे । आनंदश्रु स्रवती डोळे । सुखसमेळे नाचत ॥११५॥ धावधावोनि पाया पडे । स्वेदसद्गदे सप्रेम रडे । पुच्छे नाचवोनिया पुढे । हरुषे उडे वानर ॥११६॥ येथे सांपडली सीता । कार्यसिद्धी श्रीरघुनाथा । यश आले हनुमंता । उल्हासता उपरमत ॥११७॥ ऐसी मुद्रिका आनंद युक्त । देखानि सीता सद्गदीत । नेत्री आनंद जळ स्त्रवत । रोमांचित जानकी ॥११८॥ साक्ष करोनि मुद्रिकेसी । मुद्रा धरोनि ह्रदयेसी । आठ विता श्रीरामासी । पडे भूमीसी मूर्च्छित॥७३॥
रंगी नाचता हनुमंतु । रंगी वोसंडला परमार्थु । तेणे बिभीषण मुर्छित परमभक्त परमार्थी ॥१४४॥ हनुमंता स्वेदरुदन । नाठवे देहविदेहभान । बिभीषण मुर्छापन्न । आपणया आपण विसरला ॥१४५॥ दिघांही वोळखी नसता । दोघांही भेटीगोठीनव्हता । दिघांही जाली एकात्मता । श्रीराम कथा कीर्तने ॥१४६॥
मुखी सद्गरुनाम स्मरण । मनी गुरुमर्तींचे ध्यान । श्रवणी गुरुचरीत्र श्रवण । कीजे पूजन पादसेवा ॥ ११४॥ पायी नित्य प्रदक्षण । अथवा दर्शनागमन । बुध्दीचा निश्चयो पूर्ण । आज्ञापाळण संप्रदाये ॥११५॥ ऐसे सांगता सांगता । पूर्ण भरिते दाटले चित्ता । ना सांभाळे प्रेमावस्था । पडली तत्वता मूर्च्छित ॥११६॥ ते देखोनिया समग्र । अवघी केला जयजयकार । गुरुमहात्म्यचरित्र । अतिविचित्र महामहिमा ॥११७॥ साचार श्रीरामाची प्राप्ती गुरुवचनी अतितिष्ठती । एवढी गुरुदास्याची स्थिती । त्रिजटाख्याती अनुवादली ॥११८॥
पाहता श्रीरामाचे मुख । परमानंदे होय सुख । डोळया लागली टकमक । नावडे आणिक दृष्टीसी ॥७७॥ लवो विसरली पाती । प्राण पांगुळला निजगती । सर्वेंद्रिया एकीच तृप्ती । श्रीराममूर्ति देखोनि ॥७८॥ सादरें पाहातां रघुपति । आनंदें कोंदली त्रिजगती । सर्वेंद्रिया एकीच तृप्ती । श्रीराममूर्ति देखोनि ॥७९॥ देखता श्रीरामश्रीमुख । नि:शेष निमाले पै दु:ख । तिही लोकी न माय सुख । हरिखे हरिख कोंदाटे ॥८०॥ देखोनि श्रीरामवदन । जीऊ विसरे भूक तहान । आनंदे नाचती नयन । रघुनंदन देखोनि ॥८१॥
ऋषेश्वरांतेची अवस्था । श्रीरामिवयोगे भरतचिंता । नेत्री जळ बिंदु श्रवता । रोमांचिता शरीरे ॥४१॥ कंठी बाष्प पै दाटती । गात्रे चळचळा कापती । अनावर प्रेमस्थिती । ऋषी लाळती गडबडा ॥४२॥ नागरीक लोक समस्त । श्रीरामवियोगे संतप्त । देहभाव न सांभाळीत । अवघे मूर्छ्चित पडीयले ॥४३॥ देखोनि भरताची अवस्था । प्रेम न सहेची हनुमंता । मूर्च्छीत पडता तत्वता । होय आवरिता विवेके ॥४४॥ सत्वावस्था आवरोनी तेथ । अगोचर हनुमंत । होऊनी पाहतसे वृत्त । तव अद्भुत आणिक जाहले ॥४५॥
विश्वकर्मा येऊनी पुढे । श्रीराम नमीला वाडेकोडे । अति प्रेमाचे सुरवाडे । पडले झापडे नेत्रांसी ॥७४॥ अर्धोन्मिलीत झाली दृष्टी । बाष्प दाटला पै कंठी । श्वास दाटलासे पोटी । नये वाग्पुटी पै शब्द ॥७५॥ अति प्रेमा देखोनि त्यासी । कृपा उपजली राघवासी । स्वये उचलूनी वेगेसी । निजह्र्रदयेसी आळंगिले ॥७६॥