मुका व बहिरा

 
 
 

संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे आंधळे पांगळे

(१)
मृत्‍युलाका माझारी गा एक सद्गुरु साचारु । त्‍याचेनि गा दर्शनें तुटला हा संसारु ।
पांगुळा हस्‍तपाद देतो कृपाळ उदारु । यालागीं नांव त्‍याचें वेदा न कळे पारु ॥१॥
धर्माचें वस्तिघर ठाकियलें बा आम्‍ही । दान मागों ब्रह्म साचें नेघों द्वैत या उर्मी ॥२॥
विश्रांति विजन आम्‍हां एक सद्गुरु दाता । सेवितां चरण त्‍याचे फिटली इंद्रियांची व्यथा ।
निमाली कल्‍पना आशा इळा परिसी झगटतां । कैवल्‍य देह झालें उपरती देह अवस्‍थां ॥३॥
मन हे निमग्‍ल झालें चरणस्‍पर्श तत्‍वतां । ब्रह्महंस्‍फूर्ति आधीं भावो उमटला उलथा ।
पांगुळलें गुह्यज्ञान ब्रह्मरुपें तेथें कथा । अधं मग दृढ झालो निमाल्‍या विषयाच्‍या वार्ता ॥४॥
ऋध्दि सिध्दि दास्‍य सख्‍य आपेआप वोळलीं । दान मान मंद बुध्दि ब्रह्मरुपें लीन झालीं ।
वोळली कामधेनु पंगु तनु वाळली । पांगुळा जीवनमार्गु सतरावी हे वोळली ॥५॥
पांगुळं मी कल्‍पनेचा पंगु झालों पैं मने । वृत्ति हे हरपली एका सद्गुरुरुप ध्‍यानें ।
निवृत्‍तीसी कृपा आली शरण गेलों ध्‍येयध्‍यानें ॥६॥
(२)
पुर्वजन्‍मीं पाप केलें ते हें बहु विस्‍तारिलें । विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदले ।
चौ-यांशी लक्ष योनि फिरतां दु:ख भोगिलें । ज्ञानदृष्‍टी हारपली दोन्‍ही नेत्र आंधळे ॥१॥
धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी । आंधळ्या दृष्‍टी देतो त्‍याचें नाम मी उच्‍चारी ॥२॥
संसार दु:खमुळ चहूंकडे इंगळ । विश्रांती नाही कोठें रात्रं दिवस तळमळ ।
कामक्रोध लोभशुनीं पाठीं लागली ओढाळ । कवण मी शरण जाऊं आतां दृष्‍टी देईल निर्मळ ॥३॥
मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणी । इष्‍ट मित्र-स्‍वजनसखे हे तों सुखाची मांडणी ।
एकला मी दु:ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथें कोणी सोडविना एका सद्गुरुवांचुनि ॥४।
।साधुसंत मायबाप तिहीं केलें कृपादान । पंढरिये यात्रे नेलें घडलें चंद्रभागे स्‍नान ।
पुंडलिके वैद्यराजें पूर्वी सधिलें साधन । वैकुंठीचें मूळमीठ डोळां घातलें तें अंजन ॥५॥
कृष्णांजन एकवेळा डोळां घालितां अढळ । तिमिर दु:ख गेलें फिटलें भ्रांतीपडळ ।
श्रीगुरुनिवृत्तिरायें मार्ग दाविला सोज्‍वळ । बापरखुमादेवीवरु विठ्ठल दीनाचा दयाळ ॥६॥
(३)
धर्म अर्थ काम मोक्ष दान मागे श्रीगुरु ।हस्‍त पाद शरीर व्‍यथा पंगु झालों मी पुढारु ।
तिमिर आलें पुंढे मायामोहो उदारु । तेणें मी जात होतों मग सहज भेटला सद्गुरु ॥१॥
धर्म जागो सद्गुरु महिमा जेंणे तुटे भवव्‍यथा । हाचि धर्म अर्ध काम येर तें मी नेघें वृथा ॥२॥
एक नाम कृष्‍ण याचें दान देई सद्गुरु । वेदशास्‍त्र मथन केलें परि नव्‍हेंचि पुढारु ।
शरण आलें निवृत्‍तीराया तोडीं संसारु । पाहातां इये भुवनी तुजविण नाहीं उदारु ॥३॥
ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी माझे पांगुळ । वृत्ति हे माझे ठायीं ह्र्दयीं बुझें गोपाळ ।
शंख चक्र पद्म गदा तुष्‍टे ऐसा तूं दयाळ । बापरखुमादेवीवरें दान देऊनि केलें अढळ ॥४॥
(४)
शंख चक्र देवा तुज चुकलों गा तेणें दृष्‍टी आलें पडळ । विषयग्रंथी गुंतलोंसे तेणें होतसें विव्‍हळ ।
अंध मंद दृष्‍टी झाली । गिळूं पाहे हा काळ । अवचित दैवयोगें निवृत्‍ती भेटला कृपाळ ॥१॥
धर्म जागो निवृत्‍तीचा तेणें फेडिलें पडळ । ज्ञानाचा निजबोधु विज्ञानरुप सकळ ॥२॥
तिहि लोकीं विश्‍वरुप दिव्‍य दृष्‍टी धिधली । द्वेत हें हरपलें अद्वेतपणें माऊली ।
उपदेश निजब्रह्म ज्ञानांजन साऊली । चिद्रुप दीप पाहे तेथें तनुमनु निवाली ॥३॥
दान हेंचि आम्‍हां गोड देहीं दृष्टी मुराली । देह हें हरपले विदेहवृत्ति स्‍फुरली ।
विज्ञान हें प्रगटलें ज्ञेय ज्ञाता निमाली । दृष्‍य तें तदाकार ममता तेथें बुडाली ॥४॥
प्रपंचु हा नाहीं जाणा एकाकार वृत्ति झाली । मी माझे हरपलें विषयांध या बोली ।
उपरती सद्गुरु बोधु तेथें प्रकृत्ति संचली । शुध्‍द धर्ममार्गे पंथ हातीं काठी दिधली ॥५॥
वेदमार्गे मुनी गेले त्‍याचि मार्गे चालिलों । न कळेचि विषयअंधा म्‍हणोनि उघड बोलिलों ।
चालतां धनुर्धरा तरंगाकारी हरपलों । ज्ञानदेव निवृत्‍तीचा द्वेत सर्व निरसलों ॥६॥
(५)
पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु झालों मी अज्ञान । विषय बुंथी घेऊनियां त्‍याचें केले पोषण ।
चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान । अवचटें गुरुमार्गे प्रगट बह्माज्ञान ॥१॥
दाते हो वेग करा कृपाळु बा श्रीहरि । समता सर्व भावीं शांती क्षमा निर्धारीं ।
सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥ शरण रिघें सद्गुरु पायां पांग फिटेल पांचाचा ।
पांगुळलें आपेआप हा निर्धारु पै साचा । मनामाजीं रुप घालीं मी माजीं तेथे कैचा ।
हरपली देह बुध्दि एकाकार शिवाचा ॥३॥ निजबोधें धवळा शुध्‍द यावरी आरुढ पैं गा ।
क्षीराब्‍धी बोध वाहे तेथें जाय पां वेगा । वासना माझी ऐसी करीं परिपूर्ण गंगा ।
नित्‍य हें ज्ञान घेई अद्वैत रुप लिंगा ॥४॥ पावन होशी आधीं पांग फिटले जन्‍माचा ।
अंधपंग विषयग्रंथी पावन होशील साचा । पांडूरंग होसी आधीं फळ पीक जन्‍माचा ।
दृष्‍टी बुध्‍दीटाकीं वेगीं टाहो करीं नामाचा ॥५॥
ज्ञानदेव पंगुपणे पांगुळली वासना । मुरालें ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना ।
दृश्‍य हें लोपलें बापा परती नारायणा । निवृत्‍ती गुरु माझा लागों त्‍याच्‍या चरणा ॥६॥


मुका

मुका झालों वाचा गेली । मुका झालों वाचा गेली ॥ धृ ॥
होतों पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्षास्‍त्र पुराणी । चारी वेद मुखोद्गत वाणी । गर्वामध्‍ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्‍हा लांचावली भोजना । दुग्‍ध घृत शर्करा पक्‍वान्‍ना । निंदिले उपान्‍ना । तेणे पावलों मुखबंधना ॥२॥
साधुसंताची निंदा केली । हरिभक्‍तांची स्‍तुती नाही केली । तेणें वाचा पंगु झाली । एका जनार्दनी कृपा लाधली ॥३॥


बहिरा

बहिरा झालों या जगीं । बहिरा झालों या जगीं ॥धृ ॥
नाही ऐकलें हरिकीर्तन । नाहीं केले पुराण श्रवण ।
नाहीं वेदशास्‍त्र पठण । गर्भी बहिरा झालों त्‍या गुणे ॥१॥
नाहीं संत कीर्ति श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थव्रतें असोनि त्‍यागिलीं ॥२॥
माता माऊली पाचारितां । शब्‍द नाही दिला मागुता ।
बहिरा झालों नरदेहीं येतां । एका जनार्दनी स्मरेन आतां ॥३॥


गौळण

(१)
ऐक एक सखये बाई । नवल मी सांगू काई । त्रेलोक्‍याचा धनी तो हा । यशोदेसी म्‍हणतो आई ॥१॥
देवकीने वाहीला । यशोदेनें पाळिला ।पांडवांचा बंदीजन । होऊनियां राफिला ॥२॥
ब्रह्मांडाची साठवण । योगियाचें निजधन । चोरी केली म्‍हणऊनी उखळासी बंधन ॥३॥
सकळ तीर्थे जया चरणी । सुलभ हा शूळपाणी । राधिकेसी म्‍हणे तुझी । करीन मी वेणीफणी ॥४॥
शरण एका जनार्दनी । कैवल्‍याचा मोक्षदानीं ।गाई गोप गोपाबाळां । मेळविले आपुलेपणीं ॥५॥
(२)
भूनि‍वलें वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्‍चळ ॥२॥
तुणचरें लुब्‍ध जालीं । पुच्‍छ वाहुनियां ठेलीं ॥३॥
नाद न समायें त्रिभुवनीं । एका भुलला जनार्दनीं ॥४॥
(३)
गोधनें चाराया जातो शारंगपाणि । मार्गी भेटली राधिका गौळणी ।
कृष्‍ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी हो ॥१॥
यशोदा म्‍हणे नाटका ऋषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी ।
येऊ रुदत सांगतो मातेपासी । माझा चेडु लपि‍वला निरीपाशीं हो ॥२॥
राधीका म्‍हणे यशोदे परियेसी । चेंडू नाही नाही वो मजपाशीं ।
परि हा लटिका लबाड ऋषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी हो ॥४॥
यशोदा म्‍हणे चाळका तुम्‍हीं नारी । मार्गी बैसता क्षण एक मुरारी ।
एका जनार्दनीं विनवी श्रीहरी । नाम घेतां पातकें जाती दूरी हो ॥५॥
(४)
तुझ्या मुरलीचा ध्‍वनी । अकल्पित पडली कानीं । विव्‍हळ झालें अंत:करणीं । मी घरधंदा विसरलें ॥१॥
अहा रे सावळीया कैसी वाजविली मुरली ॥धृ॥
मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरिला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येऊनि ह्र्दयीं संचरली ॥३॥
तुझ्या मुरलीचा सूरतान । मी विसरलें देहभान । घर सोडोनि धरिले रान । मी वृंदावनी गेलें ॥४॥
एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंदा । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥५॥
(५)
कशी जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी कान्‍हा ॥१॥
पैलतिरी हरि वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥२॥
कासे पितांबर कस्‍तुरी टिळक । कुंडले शोभे कान्‍हा ॥३॥
काय करु बाई कुणाला सांगु । नामाची सांगड आना ॥४॥
नंदाच्‍या हरिने कौतुक केले । जाणे अंतरीच्‍या खुणा ॥५॥
एका जनार्दनी मनी म्‍हणा । देव महात्‍म कळेना कोणा ॥६॥

काकडा संपूर्ण