शिष्य श्रीसद्गुरुंना अनन्य भावाने शरण जाऊन अनुग्रह घेतल्यानंतर श्रीगुरु त्याला कसे कृतार्थ करतात त्याची अनुभूती विवेक सिंधु या ग्रंथात यथार्थपणे आहे. याचे साधकाला किंवा भक्ताला भक्तीमार्गात अत्यंत उत्तम मार्गदर्शन आहे.
तवशिष्य तापत्रयीं संतप्तु । शमदमसाधनीं संयुक्तु । गुरुतें शरणांगतु । विनविता जाला ॥८९॥ जी मी संसारसागरीं बुडालो । तापत्रयेंवडवानळीं पोळलो । क्रोधादि जळचरीं विसंचिलों । जालो अतिशोच्यु ॥९०॥ ज्ञानाचिया तारुवीं बैसऊनि । कृपेचिये सुवायें पेलौनि । देवेंचि तारक होवौनि । उतरावें मातें ॥९१॥ संसाराचिये बंदिशाळे । बांधलों अज्ञानसांखळे । तियें बंधनें तोडावीं स्वामी सकळें । ज्ञानशस्त्रे दावानळें ॥९२॥ भवार्क मध्यान्ह तापवेळे । तापलों तापत्रयें दावानळें । जी कृपाजळधरा ज्ञानजळें । निववावे मातें ॥९३॥ ऐसी कृपा उपजवौनि । विनवी शिष्य शिरोमणी । मस्तकु श्रीगुरुचरणीं । न्यासिता जाला ॥९४॥ तंव बोलिला श्रीगरुराजा । बारे तूं शिणलासि कवणीये काजा । कैसें बंधन तोडिजैल वोजा । हें चोज पाही रोकडेंचि ॥९५॥ एैसि प्रतिज्ञा स्वीकारौनि । शिष्यातें सन्मुख बैसवौनि । ज्ञानसमावेश करौनि । गुरुसंप्रदायक्रमें ॥९६॥ तेथें ज्ञानशक्तीचा प्रवेशु । अज्ञानशक्तीचा निरासु । बोध उठिला स्वयंप्रकाशु । शिष्य चैतन्यीं ॥९७॥ तेवेळी कंपस्वेदादक । उठिले भाव सात्विक । जैसें साम्राज्य पावे रंक । तैसें वर्तते जाले ॥९८॥या नांव शक्तिपात बोलिजे । जेथे स्वानुभवुचि अनुभविजे । नि:शेष तेही विसरिजे । स्मरण सांसारिक ॥ ९९॥ स्तंभ स्वेद रोम उभारण । स्वरभंगादि कंपायमान । वैवर्ण्य अश्रु प्रलपन । अष्ट सात्विक भाव हे ॥१००॥ चित्त चाकाटले आंतु घेत । वाचा पांगुळनी जेथिच्या तेथ । आपाद कंचुकित । रोमांच आले ॥ १०१ ॥ वर्षताती आनंदजळें । आंतुला सुखर्मिचेनि बळें । बाहीर कापे अंग सगळे । अति वेगें थराथरा ॥१०२॥ तंव आनंदाचा पुरु । शिष्य सरिते आला थोरु । तेथ अविवेक पोहणारु । बुडोनि जाये ॥१०३॥ अहंकारद्रुम उन्मुळिला । तृष्णे पक्षिणीचा कुरुठा मोडिला । इंद्रियेग्रामु बुडाला । तिये आनंदजळीं ॥१०४॥ असो हे सुखाचिये शेजारी । तेथ स्वानुभूर्ती अंतरी । तिया आलंगिला सुंदरी । तो योगीराजु ॥१०५॥ तिये चेनि आंगमेळै । नुठती इंद्रियाचे डोहाळे । तेथ आसकें चि केवळें । स्वस्वरुप ॥१०६॥ तेथ नेणीव ना जाणीव । सरले भावाभाव । जेथ एकछत्र राणीव । तया योगीराजासी ॥१०७॥ स्वस्वरुप सुखाचेनि भरे । तेथ काहींच न स्फुरे । ते योगनिद्रा न संहरे । तया योगिराजासी ॥१०८॥ तेथ र्स्वसुखाची कुरवंडी । वोवाळोनि सांडिजे फुडी । तेया ब्रम्हसुखाची गोडी । केवीं बोलावी ॥१०९॥ जेथ मनाचें जाणणें । खुंटले वाचेचें बोलणें । हें जयाचें तोचि जाणे । येरा टकमकचि ॥११०॥ तैसे वैराग्यवन्ही तापले । ज्ञानधिकारु पातले । अवधातुही ब्रम्ह जाले । गुरुचरणस्पर्शे ॥७३॥ पाहतां श्रीगुरुचेया महिमाना । परिसुहि होये ठेंगणा । तो लोहाते करी सुवर्णा । परि तो परिसु नोहेचि ॥७४॥ परिससन्निधीं वेंधले । लोहो सुवर्ण होऊन ठेलें । परि तेथ अवधातु लागलें । ते कनक नोहेचि कीं ॥७५॥ तैसा नोहे गुरुकृपेचा वेधु । जो सद्यस्वरुपावबोधु । शिष्यचि ब्रम्ह होये या विनोदु । नवल तेथिंचा ॥७६॥ कल्पतरुची उपमा द्यावी । तरी तो कल्पिलिया अर्थातें पुरवी । कल्पनातीत भेटवी । श्रीगुरुनाथु ॥७७॥ कामधेनू आणि चिंतामणी । इये पुरवू न सकता आयणी । चिंतिलेया अर्थाची दानी । म्हणौनिया ॥७८॥ जीयें जननीजके । तीयें संसारदायकें । परि नव्हेति भवबंधछेदकें। येके श्रीगुरुवांचौनि ॥७९॥ जे चितनासि अतीत । सकळ कल्पनाविरहित। ते ब्रम्हनिजानंद भरित । देता श्रीगुरुनाथु ॥८०॥ म्हणोनि श्रीगुरुसीं उपमा । यैसी कवणासी असे महिमा । प्रपंचचि होये परब्रम्ह । प्रसादें जयाचेनि ॥ ८१ ॥