संताचे किंवा सद्गुरुच्‍या बोधाने भक्‍त नामस्‍मरणाचे योगे आत्‍मसाक्षात्‍कार पावलेल्‍या भक्‍तांच्‍या व देवाच्‍या लिलांचे वर्णन श्रवण करताना भगवद्भक्‍तीमध्‍ये वेड्या झालेल्‍या भक्‍ताची अवस्‍था कशी होते याबाबते विवरण श्रीहरिविजय या ग्रंथात केले आहे.या ग्रंथातील भावावस्‍था व प्रेमाचे वर्णन खालील अध्‍यायात केले आहे.

अध्‍याय तिसरा - ओवी (७४ ते ८९)

पोटा आला विदेही हरी । देवकी नाहीं देहावरी । जनीं वनीं दिगंतरीं । अवघा मुरारी दिसतसे ॥७४॥ वसुदेव म्‍हणे देवकीप्रती । तुज चिंता कां न वाटे चित्‍तीं । आठव्‍याची कैसी गति । होईल ते नकळे पां ॥७५॥ कंस जपतो बहुत । आठव्‍याचा करावया घात । यावरी देवकी बोलत । प्रतिउत्‍तर काय तेव्‍हां ॥७६॥ भुजा पिटोनि बोले वचन । कंसास मारीन आपटोन । मुष्टिक चाणूरांचा प्राण । क्षणमात्रें घेईन मी ॥७७॥ हांस फोडोन गर्जे थोर । उतरीन पृथ्‍वीचा भार करुनि दैत्‍यांचा संहार । बंदिशाळा फोडीन मी ॥७८॥ आणीं वेगे धनुष्‍यबाण । युध्‍द करीन मी दारुण । जरासंध रथीं बांधोन । सत्रा वेळां आणीन मी ॥७९॥ भस्‍म करीन कालयवन । रचीन द्वारकापट्टण । सकळ नृपांशिक्षा लावून । पट्टराणी आणीन मी ॥८०॥ हांक फोडिली क्रोधें थोर । जिवें मारीन भौमासुर । निवटीन कौरवभार । निजभक्‍तकैवारें ॥८१॥ मी भक्‍तांचा सारथि होईन । दृष्‍ट सर्व संहारीन । मी ब्रह्मानंद परिपूर्ण । अवतरलों पृथ्‍वीवर ॥८२॥ वसुदेवासी चिंता वाटे । ही गर्जते तेवढ्या नेटें । जरी बाहेर मात प्रकटे । तरी अनर्थ होईल पां ॥८३॥ वसुदेव बोले वचन । देवकी धरी आतां मौन । येरी म्‍हणे कैंची देवकी पूर्ण । ब्रम्‍ह सनातन मी असें ॥८४॥ स्‍त्री पुरुष नपुंसक । त्‍याहूनि वेगळा मी निष्‍कलंक । सकळ मायाचक्रचाळक । कर्ता हर्ता मीच पै ॥८५॥ मी सर्वद्रष्‍टा अतींद्रिय । मी आज अव्‍यय निरामय । अजित अपार निष्क्रिय । आनंदमय वर्ते मी ॥८६॥ मी प्रळयकाळाचा शास्‍ता । मी आदिमायेचा नियंता । मी चहूं वाचांपरता । माया र्नि‍र्माता मीच पैं ॥८७॥ मीच सगुण मीच निर्गुण । मीच थोर मीच लहान । देव दैत्‍य निर्मून । पाळिता हर्ता मीच पैं ॥८८॥ देसें देवकी बोलोन । मागुती धरिलें मौन । तों आकाशीं देव संपूर्ण । गजर करिती दुंदुभींचा ॥८९॥

अध्‍याय पांचवा - ओवी (४१ व ४२)

अनंत ब्रह्मांडनाथ । लीला त्‍याची परमाद्भुत । यशोदा झाली तटस्‍थ । बोलों चालों विसरली ॥४१॥ अनंत यशोदा अनंत कृष्‍ण । अनंत नामें अनंत गुण । पाहतां यशोदेचें मन । झाले उन्‍मन ब्रह्मानंदी ॥४२॥

अध्‍याय नववा - ओवी (२२ व २३)

अनंत ब्रहमांडरचना ते क्षणीं । नंदे आनंदे देखतां नयनीं । गेला देहभाव विसरोनी । शब्‍द न फुटे बोलतां ॥२२॥ विसरला कार्यकरण । विसरला स्‍नान देवतार्चन । नाठवे भोजन शयन । मन निमग्‍न हरिरुपीं ॥२३॥

अध्‍याय नववा - ओवी (२७९ ते २८२)

पाहोनियां कृष्‍णमुखा । सदगद रडती गोपिका । धांवे यावें इंदिरानायका । कृष्‍ण आमुचा वांचवीं ॥७९॥ जानूइतुकें नीर गोपिकांस जाहलें । श्रीकृष्‍णास नाभीपर्यंत आलें । हरीस कडेवरी घेतलें । कंठ दाटले गोपिकांचे ॥२८०॥ ह्र्दयपर्यंत जाहलें जीवन । स्‍कंधी घेतला जगज्‍जीवन । आकंठ उदक जाहलें पूर्ण । म्‍हणती मरण आलें की ॥२८१॥ देहांत आला जवळी । गोपिकांनी मुर्ति सांवळी । -हदयीं तैसीच रोखिली । वृत्ति मुराली हरिरुपीं ॥२८२॥

अध्‍याय दहावा - ओवी (५६ ते ५८)

ऐसें बोलतां हरीचे नेत्रीं । अश्रु वाहती भडभडां ॥५६॥ ऐसें ते क्षणी देखोनी । पेंधा धांवोनि लागे चरणी । आपुल्‍या नेत्रोंदकेंकरुनी । हरिपदीं केला अभिषेक ॥ ५७॥ गउ स्‍फुंदत बोलती तेव्‍हां । वैकुंठपाळा ग माधवा । आम्‍ही तुज दडवूनि केशवा । ठकलों सर्वस्‍वें ॥५८॥

अध्‍याय दहावा - ओवी (२१५ ते २१८)

म्‍यां हरिस्‍वरुप नेणोनियां । गेलों वत्‍स गोप घेऊनियां । आतां शरण रिघावें यांच्‍या पाया । प्रेमभावें अनन्‍य ॥२१५॥ निरंजनी सांपडला श्रीधर । समोर घेऊनि चतुर्वक्‍त्र । साष्‍टांग घातला नमस्‍कार । प्रेमे अंतर सद्गदित ॥२१६॥ जैसा कनकदंड पृथ्‍वीवरी । हरिचरणीं शिरें ठेविलीं चारी । नेत्रादकें अभिषेक करी । अष्‍टभाव उमटले ॥२१७॥ मागुती करी प्रदक्षिणा । वारंवार घाली लोटांगणा । सवेंचि उठोनि विलोकी ध्‍याना । तों दहींभातें वदन माखलेंसे ॥२१८॥

अध्‍याय दहावा - ओवी (२३४ ते २५०)

मनमोहन पूतनारी । कृष्‍ण हस्‍त ठेवी त्याचे शिरीं । विरिंचि तृप्‍त झाला अंतरी । सुखसमुद्रीं निमग्‍न ॥२३४॥ वत्‍सें गोप हरि झाला होता । सादर विलोकी जों विधाता । तंव त्‍या कृष्‍णमूर्ति तत्‍वता । पाहता जाहला तन्‍मय ।२३५॥ लक्षानुलक्ष कृष्‍णमुर्ती । शंखचक्रादि आयुधें हातीं । श्रीवत्‍सादि चिन्‍हें झळकती । श्रीनिकेतनासमवेत ॥२३६॥ श्रृंग तेत्र पांवे पायतण । सर्व स्‍वरुपें नटला नारायण । असंख्‍य मूर्ती घनश्‍यामवर्ण । दुसरेपण दिसेना ॥२३७॥ असंख्‍य नाभिकमलें विराजमान । तेथें असंख्‍य विरिंचि शिव साहस्‍त्रनयन । चंद्र सूर्य कुबेर वरुण । सृष्टि संपूर्ण चालविती ॥२३८॥ कमलाप्रति भिन्‍न भिन्‍न ब्रम्‍हांड । चित्रविचित्र परम प्रचंड । वैकुंठ कैलासादि उदंड । पदे दिसती कमलाप्रति ॥२३९॥ समाधिस्‍थ झाला विधाता । अहंकृति गेली पाहतां पाहतां । वाचा विधाता । अहंकृति गेली पाहतां पाहतां । वाचा राहिली बोलतां । वृत्‍ती समस्‍त निमाल्‍या ॥२४०॥ मुख्‍य मूर्ति त्‍यांत कोण । न दिसे कांही दुजेपण । वृंदावनींचे द्रुम पाषाण । श्‍वापदें कृष्‍णरुप दिसतीं पैं ॥२४१॥ भू आप तेज वात नभ । दिसती कृष्‍णरुप स्‍वयंभ । सरिता सिंधु चराचर सुप्रभ । श्रीवल्‍ल्‍भरुप दिसताती ॥२४२॥ हरली सकळ अहंकृति । अनंत ब्रह्मांडे अनंत किर्ती । अनंत वेद अनंत शास्‍त्ररीती । किर्ती गाती अनंत ॥२४३॥ अनंत पुराण अनंत कला । अनंत अवतार अनंत लिला । अनंत स्‍वरुपें आपण नटला । दावी तो सोहळा विधातया ॥२४४॥ बहुत आकृती नाना याती । स्‍त्री पुरुष नपुसंक व्‍यक्ति । अवघा ओतला वैकुंठपती । नाहं स्थिती दुसरी ॥२४५॥ विराट हिरण्‍यगर्भ महतत्‍व । न दिसे स्‍थूल लिंग कारण । न चले तर्काचें विंदाण । अवघा जगज्‍जीवन ओतला ॥२४६॥ जागृति स्‍वप्‍न सुपुप्ति तुर्या । अवस्‍था गेल्‍या हरोनियां । सृष्टि स्थितीप्रलय सर्वसा-क्षिणीया । न उरे माया समूळीं ॥२४७॥ विश्‍व तैजस प्राज्ञ प्रत्‍यगात्‍मा । ब्रम्‍हा विष्‍णु रुद्र परमात्‍मा । अवघा एक जगदात्‍माः नामानामातील जो ॥२४८॥ अकार उकार मकार । चवथा अर्धमात्रा ओंकार । रजतमसत्‍व विकार । सर्व यादवेंद्र ओतला ॥२४९। वैखरी मध्‍यमां पश्‍चंती परा । वाचा खुंटल्‍या नयनीं धारा । पाहतां ब्रह्मानंदा उदारा । ब्रह्मा जाहला समाधिस्‍थ ॥२५०॥

अध्‍याय तेरावा - (ओवी २१४)

घालता साष्‍टांग नमस्‍कार । उभा ठाकला जोडोनि कर । प्रेमें सदगद जाहलें अंतर । नेत्रीं नीर वाहतसे ॥२१४॥

अध्‍याय सोळावा - (ओवी १३६ ते १३८)

तूं या देहाचा पति कीं निर्धारीं । तरी तो देह ठेवीं आपुलें घरी । जतन करुनि साक्षेपें ॥१३६॥ समस्‍त गेल्‍या देखोन । सदगदित आंसुवे भरिलें नयन । अंतरी रेखिलें कृष्‍णध्‍यान । मुखी स्‍मरण नामाचें । १३७॥ गोविंद गोपाळा माधवा । वैकुंठ विलासिया रमामाधवा । ऐसें बोलानियां तेधवां । प्राण सोडिता सतीनें ॥१३८॥

अध्‍याय सोळावा - ओवी (१८७ व १८८)

जाहले सद्गदित ब्राह्मण । नयनी वाहे अश्रुजीवन । म्‍हणती कैसें कर्म गहन । जवळी असोनि हरि नेणों ॥१८७॥ एक म्‍हणत उठाउठीं । चला घेऊं हरीची भेटी । घालूं हरीचरणी दृढ मिठी । प्रेम पोटीं न समायें ॥१८८॥