जय जय राम कृष्ण हरि ॥

सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥१॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥२॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥४॥
तुळसीहार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥

देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥२॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥४॥

चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसी गाती॥१॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥२॥
एक हरि आत्मा जिवशिव सम । वाया तु दुर्गम न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥४॥

त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जाणोनी पुण्य होय॥४॥

भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया॥२॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणे॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥४॥

योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेविण देव नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधुचे संगती तरणोपाय ॥४॥

साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ॥१॥
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ॥२॥
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ॥४॥

पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ॥१॥
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मा हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ॥४॥

संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ॥१॥
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उध्दवा लाधला कृष्ण जाता जाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥१॥
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा । रामकृष्णी पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करि ॥

जय जय राम कृष्ण हरि ॥
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ॥

त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ॥२॥
पुराण प्रसिध्द बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ॥४॥

हरिउच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्नीमेळे समरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ॥२॥
हरी उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथे ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ॥४॥

तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ॥१॥
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ॥४॥

समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ॥१॥
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ॥२॥
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ॥३॥
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ॥४॥

नित्य सत्य मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्ण‍ उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ॥२॥
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ॥४॥

एक नाम हरि द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे ॥१॥
समबुध्दी घेता समान श्रीहरी । शम दमा वैरी हरी झाला ॥२॥
सर्वाघटी राम देहादेही एक। सुर्य प्रकाशक सहस्त्री रश्मी ॥३॥
ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा । मागीलीया जन्मा मुक्ती झालो ॥४॥

हरिबुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेशी सुलभ रामकृष्ण ॥१॥
रामकृष्ण नामी उन्मनी साधली । तयाशी लाधली सकळ सिध्दी ॥२॥
सिध्दी‍ बुध्दी धर्म हरिपाठी आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणे दश दिशा आत्माराम ॥४॥

हरिपाठ किर्ती मुखे जरी गाय । पवित्रची होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥३॥
ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवा लाधले । निवृत्तीने दिधले माझो हाती ॥४॥

हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन । हरिवीण सौजन्य नेणे काही ॥१॥
तया नरा लाधले वैकुंठ जोडले । सकळही घडले तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गे गेला तो तेथे मुकला । हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ॥३॥
ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्ण आवडी सर्वकाळ ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करि ॥

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ॥

नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंतकोटी गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्माचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठे ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाही दुजा ॥४॥

वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन । एक नारायण सारजप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाची श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठी गेले ते निवांतची ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळीके ॥३॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमे कुळगोत्र वर्जीयले ॥४॥

काळवेळ नाम उच्चारीता नाही । दोन्ही‍ पक्ष पाही उध्दरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जड जीवा तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोणी वानी ॥३॥
ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ । पुर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥

नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मी वल्लभ तया जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरी त्याच्या ॥२॥
हरिविण जन्म नर्कची पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनी वाड नाम आहे ॥४॥

सात पाच तीन दशकांचा मेळा । एकतत्वी कळा दावी हरि ॥१॥
तैसे नव्हे नाम सर्वमार्गी वरिष्ठ । येथे काही कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेही मनाचा निर्धारु असे ॥३॥
ज्ञानदेव जिणे नामेविण व्यर्थ । रामकृष्णी पंथी क्रमियेला ॥४॥

जप तप कर्म क्रिया नेमा धर्म । सर्वांघटी राम भाव शुध्द ॥१॥
न सोडी हा भाव टाकी रे संदेहो । रामकृष्णा टाहो नित्य फोडी ॥२॥
जात वित्त गोत कुळ शीळ मात । भजे का त्वरीत भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । वैकुंठभुवनी घर केले ॥४॥

जाणीव नेणीव भगवंती नाही । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कळी काळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीव जंतूसी केवी कळे ॥३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥

एक तत्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥१॥
ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गगत जपे आधी ॥२॥
नामापरते तत्व नाही रे अन्यथा । वाया अणिक पंथा जासील झणी ॥३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥४॥

सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वाया येरझार हरिविण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरुनी राहे ॥३॥
निजवृती काढी सर्व माया तोडी । इंद्रियासवडी लपू नको ॥४॥
तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा । शांती दया पाहूणा हरी करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥६॥

कोणाचे हे घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥१॥
मी तू हा विचार विवेके शोधावा । गोविंदा माधवा याच देही ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा । सहस्त्रदळी उगवला सुर्य जैसा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नांवे रुपे ती तुम्ही जाणा ॥४॥

अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासे ज्ञानदेवे ॥१॥
नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥
अंतकाळी तैसा संकटाचे वेळी । हरि त्या सांभाळी अंतरबाह्य ॥३॥
संत सज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमती केवी तरे ॥४॥
श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ। तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥५॥

नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥१॥
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥२॥
ठायीच बैसोनि करा एक चित्त ।आवडी अनंत आळवावा ॥३॥
रामकृष्ण हरि विठठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४॥
याविण आणिक असता पै साधन । वाहातसे आण विठोबाची ॥५॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी घेतो येथे ॥६॥

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या। ॥१॥
हरि मुखे म्हदणा हरि मुखे म्ह्णा । पुण्यायची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारी जीव्हाण वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हसणे व्या‍साचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करि ॥

ज्ञानोबा तुकाराम । ज्ञानोबा तुकाराम

गुरुपरंपरेचे अभंग

सत्यगुरुराये कृपा मज केली । परी नाही घडली सेवा काही ॥१॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काही कळे उपजला अंतराय । म्हणोनिया काय त्वरा झाली ॥४॥
राघवचेतन्य केशवचैतन्य । सांगितली खुण मालीकेची ॥५॥
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरी ॥६॥
माघ शुध्द दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥७॥

सापडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥

माझिये मनीचा जाणोनिया भाव । तो करी उपाव गुरुराव ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणे नोहे गुंफा कोठे काही ॥२॥
जाती पुढे एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥३॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटे ॥४॥
तुका म्हणे संती दावियेला तारु । कृपेचा सागरु पांडूरंग ॥५॥

आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणे नोहे गुंफा कोठे काही ॥२॥

घालुनिया भार राहीलो निश्चिंती । निरविले संती विठोबासी ॥१॥
लावूनिया हात कुरवाळीला माथा । सांगितली चिंता न करावी ॥२॥
कटीकर समचरण साजिरे । राहीला भीवरे तीरी उभा ॥३॥
खुंटले सायास अणिक या जीवा । धरीले केशवा पाय तुझे ॥४॥
तुज वाटे आता ते करी अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥५॥

लावूनिया हात कुरवाळीला माथा । सांगितली चिंता न करावी ॥२॥

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणची देव होय गुरु ॥१॥
पढिये देहभाव पुरवी वासना । अंती ते आपणापाशी न्यावे ॥२॥
मागे पुढे उभा राहे सांभाळीत । आलीया आघात निवाराया ॥३॥
योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी । वाट दावी करी धरुनिया ॥४॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी । पहावे पुराणी विचारुनी ॥५॥

पढिये देहभाव पुरवी वासना । अंती ते आपणापाशी न्यावे ॥२॥

मुख्य महाविष्णु चैतन्याचे मुळ। संप्रदाय फळ तेथूनिया ॥१॥
हंसरुपे ब्रम्हा उपदेशी श्रीहरी । चतु:श्लोकी चारी भागवत ॥२॥
ते गुज विधाता सांगे नारदासी । नारदे व्या्सासी उपदेशीले ॥३॥
राघव चैतन्य केले अनुष्ठान । त्यासी द्वैपायने कृपा केली ॥४॥
कृपा करुनि हस्ता ठेवियेला शिरी । बोध तो अंतरी ठसावला ॥५॥
रावघा चरणी केशव शरण । बाबाजीशी पूर्ण कृपा त्यांची ॥६॥
बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला । अनुग्रह दिधला निजप्रीती ॥७॥
जगद्गुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा तेथोनिया ॥८॥
निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥९॥

हंसरुपे ब्रम्हा उपदेशी श्रीहरी । चतु:श्लोकी चारी भागवत ॥२॥

संप्रदायाचे मुळ हंसरुपी ब्रम्हाशी । ब्रम्हाने अत्रीशी अनुग्रहीले ॥१॥
तोचि अनुग्रह दत्तात्रया लाभला । पूर्णकृपे दिधला नारायणा ॥२॥
नारायण कृपे लक्ष्मणाशी बोध । कृपेचा तो लाभ बलभिमाशी ॥३॥
बलभिमाचा बोध झाला सखयानंदा । संती परमानंदा प्राप्त झाली ॥४॥
शांतामाई कृपेने बंडोबा सदगद । केरोबा ब्रम्हपदी बैसविले ॥५॥
केरोबांनी हस्त मस्तदकी ठेवूनी । श्रीपादा उन्मैनी साधियेली ॥६॥
श्रीपाद हा सुर्य रामदास प्रभा । धोंडा तेथे उभा पायापाशी ॥७॥

तोचि अनुग्रह दत्तात्रया लाभला । पूर्णकृपे दिधला नारायणा ॥२॥

आदिनाथ उमा बीज प्रगटले । मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ॥१॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गहीनीनाथा ॥२॥
वैराग्ये तापला सप्रेमे निवाला । ठेवा जो लाधला शांतीसुख ॥३॥
निर्द्वंद्व नि:शंक विचरता मही । सुखानंद –हदयी स्थिरावला ॥४॥
विरक्तिचे पात्र अन्वयाचे मुख । येवुनी सम्यक् अनन्यता ॥५॥
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण । कुळ हे पावन कृष्णनामे ॥६॥

तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गहीनीनाथा ॥२॥

अदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥१॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहीनीप्रती ॥२॥
गहीनी प्रसादे निवृत्तीष दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ॥३॥

मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहीनीप्रती ॥२॥

अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आंता । चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥१॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ जनार्दन ॥२॥
एका जनार्दनी एकपणे उभा । चैतन्या‍ची शोभा शोभतसे ॥३॥

माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ जनार्दन ॥२॥

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपूरा । भेटन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडूरंगा ॥३॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलाची भेटी । आपुल्या संवसाठी करुनी ठेला ॥४॥

जाईन गे माये तया पंढरपूरा । भेटन माहेरा आपुलिया ॥२॥

श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे । मनाचिया जोगे सिध्दी पावे ॥२॥
कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला । काय वाणू त्याला सांगा जोजी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो । साच उध्दरलो गुरुकृपे ॥४॥

श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥

इवलेसे रोप लावियले द्वारी । त्याचा वेलू गेला गगनावरी ॥१॥
मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलेवेचिताची बहरु कळीयासी आला ॥२॥
मनाचिये मनी गुंफीयेला शेला । बापरखुमादेवी वरु विठ्ठलु अर्पिला ॥३॥

मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलेवेचिताची बहरु कळीयासी आला ॥२॥

ज्ञानेश्वर माऊली । ज्ञानराज माऊली तुकाराम ।

विनंती व मागणीपर अभंग

हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेची माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥४॥

जय विठठल । जय जय विठठल

बोलीली लुकुरे । वेडी वाकडी उत्तरे ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्हि सिध्द ॥२॥
नाही विचारीला । अधिकार म्या आपुला ॥३॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पाया पै किंकरा ॥४॥

ज्ञानदेव तुकाराम

पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरिनाथ महाराज की जय ॥