संप्रदाय परंपरा

मिळालेले ज्ञान हे अनादिकालीन व संप्रदायपुर्वक असुन हा भगवंताच्या नामाचे दान देणारे संप्रदाय आहे. सकल संतानी संप्रदाय परंपरा आपापल्या अभंग वाणीतून वर्णन केली आहे.


संत ज्ञानेश्‍वर महाराजांची परंपरा

क्षिरसिंधूच्या तिरी भगवान शंकराने पार्वतीला जे गुह्य ज्ञान सांगीतले तेच गुज ज्ञानेश्‍वर महाराजांना प्रकाश संप्रदायातुन मिळाले असून खालील अभंगातून ते वर्णन केले आहे.

अदिनाथ गुरु सकल सिध्दांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥१॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला । गोरक्ष ओळला गहीनीप्रती ॥२॥
गहीनीप्रसादे निवृत्‍ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ॥३॥

अदिनाथ उमा बीज प्रगटले । मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ॥१॥
तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गहीनीनाथा ॥२॥
वैराग्‍ये तापला सप्रेमे निवाला । ठेवा जो लाधला शांतीसुख ॥३॥
निर्द्वंद्व नि:शंक विचरता मही । सुखानंद हृदयी स्थिरावला ॥४॥
विरक्‍तीचे पात्र अन्‍वयाचे मुख । ठेवुनी सम्‍यक अनन्‍यता ॥५॥
निवृती गहिनी कृपा केली पूर्ण । कुळ हे पावन कृष्‍णनामे ॥६॥

ज्ञानदेव उपदेश करोनीया पाही । सोपान मुक्‍ताईस बोधीयले ॥१॥
मुक्‍ताईने बोध खेचराशी केला । तेणे नामयास बोधीयले ॥२॥
नामयाचे कुटुंब चांगा वटेश्‍वर । एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा ॥३॥

ज्ञानराज बोध केला । सत्यबळा रेडा बोलाविला प्रतिष्ठाणी ॥१॥
बोझ लिंग समाधी आळंदी । ज्ञानराज बोधी तिघेजना ॥२॥
सत्यबळे बोध गैविराया केला । स्वये ब्रम्ह झाला सिद्धरुप ॥३॥
एका जनर्दनी ऐसी परंपरा । दाविले निर्धारा करुनिया ॥४॥


संत एकनाथ महाराजांची परंपरा

संत एकनाथ महाराजांना ज्या परंपरेनुसार बोध प्राप्‍त झाला तो संप्रदाय खालील अभंगातुन विषद केला आहे.

जो निर्गुन निराभास । जेथुन उद्भव शबल ब्रम्हास ।
अधिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वांचा अदिगुरु ॥१॥
तयाचा ब्रम्‍हा अनुग्रहीत । ब्रम्हा अत्रीस उपदेशीत ॥
अत्रीपाद प्रसादीत । श्री अवधुत दत्तात्रेय ॥२॥
दत्तात्रय परंपरा । सहस्रार्जुन यदु दुसरा ॥
जनार्दन शिष्य तिसरा । केला खर कलियुगी ॥३॥
जनार्दन कृपेस्तव जाण । समुळ निरसले भवबंधन ॥
एका जनार्दनी शरण । झाली संपुर्ण परंपरा ॥४॥


संत तुकाराम महाराजांची परंपरा

संत निळोबा महाराजांनी चैतन्‍य स्रपंदायाची परंपरा जगदगुरु तुकाराम महाराजांच्या मार्फत त्‍यांना मिळाल्‍याचे वर्णन खालील अभंगातून केले. तीच परंपरा मराठवाडयातील स्‍त्री वर्गातील संत बहीणाबाईं यांना लाभली.

हंसरुपे ब्रह्मा उपदेशी श्रीहरी । चतुश्लोकी चारी भागवत ॥१॥
ते गुज विधाता सांगे नारदासी । नारद व्यासासी उपदेशीले ॥२॥
राघव चैतन्‍य केले अनुष्‍ठान । त्‍यासी द्वैपायने कृपा केली ॥४॥
कृपा करुनि हस्‍त ठेवियेला शिरी । बोध तो अंतरी ठसावला ॥५॥
राघवा चरणी केशव शरण । बाबाजीशी पूर्ण कृपा त्‍यांची ॥६॥
बाबाजीने स्‍वप्‍नी येऊनी तुकयाला । अनुग्रह दिधला निजप्रीती ॥७॥
जगद्गुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय दिला सकळाचा येथोनिया ॥८॥
निळा म्‍हणे मज उपदेश केला । संप्रदाय ठेविला सकळ जना ॥९॥


संत श्रीपाद महाराजांची परंपरा

संत श्रीपाद बाबांनी व रामदास बाबा यांनीही आपली हंस- ब्र्हमा -अत्री- दत्तात्रय- नारायण- लक्ष्मण- बलभीम– सखयानंद- शांतामाई- बंडोबा- केरोबा ही आनंद संप्रदाय परंपरा मालीका सांगीतली. त्‍यांचे काव्‍य वर्णन गुरुवर्य ह.भ.प. पोपट महाराज चकवे यानी खालील प्रमाणे केलेले आहे.

मुळ पुरुष हंस विष्‍णुचा अवतार । कथीले जे गुज सृष्‍टयाप्रती ॥१॥
चतुराननाने तेची अर्पीले अत्रीसी । त्रिगुणाचा बोध झाला तेणे ॥२॥
अत्रिपाद प्रसादे दत्‍तात्रेया लाधले । दिधले तयाने नारायणाला ॥३॥
सहस्‍त्रार्जुन चदु आणि जनार्दन । नारायण जालवणकर शिष्‍य तैसे ॥४॥
नारायणे बोध अर्पिला लक्ष्‍मणा । लक्षातीत झाला तेणे कृपे ॥५॥
कृपा प्राप्‍त होता अष्‍टभाव दाटले । स्थिरावले अंतरी सावळे रुप ॥६॥
लक्ष्‍मणे कर्णी ओतुन ब्रम्‍हरस । तोषविला तात्‍काळ बलभीम ॥७॥
सखयानंदासी आनंद अपार । शांतामाई पार तेणेची कृपे ॥८॥
गुरुकृपे तत्‍वता विदेही अवस्था । नावरेची तत्‍वता काही केल्‍या ॥९॥
शांतीची मूर्ती अफाट जिची कीर्ती । प्रगटली अंतरी बंडोबाच्‍या ॥१०॥
पैठण क्षेत्रीचे ब्राम्‍हण । नाथबाबा जैसे दुसरे जाणा ॥११॥
अर्पिता प्रेम मुद्रा केरोबा महाराजा । ब्रम्‍हानंदाची राणीवा फावली तया ॥१२॥
तेची कृपाछत्रा श्रीपादाच्‍या शिरी । धरीताची अंतरी प्रबोध जाहला ॥१३॥
मुक्‍तीची गवांदी देऊनी विश्‍वासी । शब्‍द सार्थ करीती ज्ञानोबाचा ॥१४॥
सच्चिदानंद पुतळा हाची माझा ज्ञाना । दिधला प्रेमपान्‍हा त्‍यांनी मज ॥१५॥
कृपेच्‍या वोरसे वदलासे शुक । आनंद संप्रदाय आमुचे मुळपीठ ॥१६॥

---गुरुवर्य ह.भ.प. पोपट महाराज चकवे