सामान्य माणसे संसारात त्रस्त झाली व व्यवहारीक उपाययोजनेने ते दु:ख दुर होत नाही असे दिसले म्हणजे मग देवाकडे धाव घेतात व म्हणूनच दु:ख हरण करणारा हा देवाचा धर्म ज्यात सांगीतला आहे ते नाम हरीपाठ रुपाने चटकन डोळयासमोर येते व वारंवार उच्चारले जाते.

देव भक्त दोन्ही एकरुप झाले । मुळीचे संचले जैसे तैसे ॥

सर्वसामान्य माणुस देव म्हणजे आपल्यास योग्य अयोग्य स्वार्थासाठी ज्याचा उपयोग होऊ शकेल असे साधन समजतात. संत शिकवतात की देव हे संसाराचे साधन नसून जीवनाचे साध्य आहे. हे साध्य मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे शुध्द व एकनिष्ठ भावाने केलेली भक्ती . संतानी नामस्मरणाच्या द्वारे हा भक्तीमार्ग सर्वांना अनुसरण्या सारखा हसता खेळता अवलं‍बिण्यासारखा सोपा केला.

हरिपाठात थोडक्यात पण सर्व बाजुंनी भक्तीमार्गाचा ता‍त्विक विचार झालेला आहे. संसाराचे स्वरुप, जीवनात भक्तीची आवश्यकता, ज्याची भक्ती करावयाची त्याचे स्वरुप, भक्तीसाठी आवश्य‍क असणारी मनाची वृत्ती, ही वृत्ती निर्माण होण्याचे साधन- संतसंग, भक्तीची इतर साधनमार्गाशी तुलना, भक्तीचे शुध्द स्वरुप व तिची परिणीती आणि जीवनातील श्रेष्ठ सुख प्राप्त करुन देणा-या हरिनामाचे महत्व‍ अशा सर्व दृष्टीनी भक्तीचा संपूर्ण विचार हरीपाठात झालेला आहे.