आंधळे पांगुळ

 
 
 

संत ज्ञानेश्‍वरांचे वासुदेव

(१)
घुळघुळा वाजती टाळ । झणझणा नाद रसाळ । उदो जाहाला पाहाली वेळ । उठा वाचे वदा गोपाळ गा ॥१॥
कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळापोटी मायरिघेल । मेलें माणूस जीत उठविल । वेळ काळाते ग्रासील गा ॥२॥
आतां ऐसेचि अवघे जन येतें जाते तयापासून । जगी जग झाले जनार्दन । उदो प्रगटले बिंबलें भान गा ॥३॥
टाळा टाळी लोपला नाद । अंगोअंगी मुरला छंद । भोग भोगितांचि आटला भेद । ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा ॥४॥
गांवा आंत बाहेर हिंडे आळी । देवदेवीची केली चिपळी । चरण नसतां वाजे धुमाळी । ज्ञानदेवाची कांती सांवळी गा ॥५॥
(२)
बाबा ममतानिशी अहंकार दाट । रामनामें वासुदेवी वाट । गुरुकृपें वोळलें वैकुंठ । तेणें वासुदेवो दिसे प्रगट गा ॥१॥
वासुदेव हरि वासुदेव हरि । राम कृष्‍ण हरि वासुदेवा ॥धृ॥
आला पुंडलिक भक्‍तराज । तेणें केशव वोळला सहज । दिधला विठ्ठल मंत्र बीज । तेणें झालें सर्व काज गा ॥३॥
राम कृष्‍ण वासुदेवं । वैष्‍णव गाताती आघवे । दिंडी टाळ प्रेम भावें । वासदेवी मन सामावें गा ॥४॥
शांती क्षमा दया पुरीं । वासुदेव घरोघरी । आनंद वोसंडले अंबरी । प्रेमें डुले त्रिपुरारी गा ॥५॥
वासुदेवीं ज्ञेय ज्ञान । ध्‍यानीं मनी नारायण । वासदेवो परिपूर्ण । कैसे खरलेंसे चैतन्‍य गा ॥६॥
वासुदेव वाहुनि टाळी । पातकं गेली अंतराळी । वासुदेवो वनमाळी । कीर्तन करुं ब्रह्ममेळी गा ॥७॥
ज्ञानदेवा वासुदेवी । प्रीतिपान्‍हा उजळी दिवी । टाळ चिपळी धरुनि जीवीं । ध्‍यान मुद्रा महादेवीं गा ॥८॥
(३)
ओंम नमो भगवते वासुदेवाय । द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काह्या ॥धृ॥
वोडियाणा बंदु घालुनि देहुडा लागसील पावा । ओतप्रोत सांडुनी मना धरिसी अहंभावो ।
ओंकार बिंदुचा तूं न पावसी ठावो । बोळगे वोळगे कृष्‍ण द्वारावतीये रावो ॥१॥
नागिणी उत्‍साहें नवहि द्वारे निरोधून । नाडिन्‍नयामाजी सुषुम्‍नासंचरण ।
न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन । नरहरि चिंतने अहर्निशीं मुक्तिस्‍थान ॥२॥
मोडीसी करचरण तेणे पावसी अंत समो । मोहो तृष्‍णा न तुटे ब्रम्‍ह विद्या केवी गमो ।
मोठा हा अन्‍यावो जें हरिचरणी नाहीं नमो । मोक्षाची चाड तरी मुकुंदी मन रमो ॥३॥
भांबावसी झणे हें शरीर कर्दळीस्‍तंभ । भस्‍म कृमिविष्‍ठा उभें आहे तों सुशोभ । भावितां
कीटकी झाली भृंगीतिया क्रमिले नभ । भावें भक्‍ती सुलभ वोळगा वोळगा पद्मनाभ ॥४॥
गति मति इंद्रियें जंव आहेती समयोग । गणितां आयुष्‍य न पुरे जंव हें न वचें भंग ।
गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग । गरुडध्‍वज प्रसादें निस्‍तारिजे भवतरंग ॥५॥
वनींसिंह वसतां गजीं मदु केवीं धरावा । वन्हि दग्‍धबीज त्‍यासी अंकुर केवीं फुटावा ।
वज्रपाणि कोपलियां गिरी उदधि केवीं लंघावा । वदनीं हरि उच्‍चारी तेणे संसार केवीं भुंजावा ॥६॥
तेज नयनीचा भानु जेणें तेजें मीनलें ते । त्‍याचे मानसींचा चंद्रमा तो सिंपीतो अमृतें ।
त्‍याचें नाभीकमळीं ब्रम्‍हा तेणे सृजिलीं सकळही भूतें । तें विराट स्‍वरुप ओळखावे विष्‍णुभक्‍ते ॥७॥
वाताघातें फुटे गगनी मेघांचा मेळावा । वारि बिंदु पदमणीपत्रीं केवी हो ठेवावा ।
वानराच्‍या हातीं चिंतामणी केवी हो द्यावा । वासुदेव चिंतनें तोचि कल्‍मषा उठावा ॥८॥
सूक्ष्‍म स्‍थूळ भूतें चाळीतां हे परमहंसु । शूळपाणि देवोवेवी जयाचा रे अंशु ।
शुभाशुभी कर्मी न करी नामाचा आळसु । सुखे निरंतरी ध्‍याई ध्‍याई ह्रुषिकेशु ॥९॥
देव देउनी उदार भक्ता देतो अमरपदें । देता न म्‍हणे सानाथोर वैरियासी तेंचि दे ।
देहे सार्थक अंतीं वासुदेव आद्य छंदे । देखा अजामेळ उध्‍दारलो नामें येणें मुकुंदे ॥१०॥
वाडा सायासी मनुष्‍य जन्‍म पावावा । वियाला पुरुषार्थ तो कां वायां दवडावा ।
काया वाचा मनें करुनी मुरारी ओळगावा । व्रतें एकादशी करुनी परलोक ठाकावा ॥११॥
या धनाचा न धरीं विश्‍वास जैसी तरुवर छाया । यातायाती न चुके तरी हे भोगिसील काहृयां ।
या हरिभजनेविण तुझा जन्म जातो वायां । यालागी वैकुंठनाथाच्‍या तूं चिंतीं पां रे पायां ॥१२॥
इहींच द्वाद्वशाक्षरीं ध्रुव अढळपद पावला । प्रल्‍हाद रक्षिला अग्निषस्‍त्रापासूनीजळा ।
बापरखुमादेवीवरु विठ्ठलु तुम्‍ही ध्‍यारे वेळोवेळां । तो कळिकाळपासूनी सोडवील अवलीळा ॥१३॥

जोगी

जग जोगी जग जोगी । जागे जागे बोलती ॥१॥
जागता जग देव । राखा कांही भाव ॥२॥
अवघा क्षेत्रपाळ । पुजावा सकळ ॥३॥
पूजापत्र कांही । फल पुष्‍प तोय ॥४॥
बहुतां दिवसां फेरा । आला या नगरां ॥५॥
तुका मागे दान । द्यावें जी अनन्‍य ॥६॥

॥ वासुदेव हरि जय पांडूरंग हरि ॥


आंधळे व पांगुळ

संत तुकाराम महाराजांचा आंधळा

(१)
पांगुळा झालों देंवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।
खेटिता कुंप काटी खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी मज बाप ना माय ॥१॥
दाते हो दान करा जाते पंढरपुरा । न्‍या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥२॥
हिंडता गव्‍हाणें गा शिणलो येरझारी । न मिळेचि दाता कोणी जन्‍म दु:ख निवारी ।
कीर्ती हे संता मुखी तोचि दाखवा हरि । पांगुळां पाय देतो नांदे पंढरपुरी ॥३॥
या पोटा कारणें गा झालों पांगिला जना । न सरेचि मायबाप भीके नाही खंडणा ।
पुढारा म्‍हणती एक तया नाहीं करुणा । श्‍वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा ॥४॥
काय मी चुकलों गा मागें नेणवेचि कांही । न कळेचि पापपुण्‍य येथें आठव नाही ।
मी माजीं भललों दीप पंतगासोई । द्या मज जीवदान संत महानुभाव कांही ॥।५॥
दुरोनी आलों मी गा दु:ख झालें दारुण । यावया येथवरी होतें हेचि कारण ।
दुर्लभ भेटी तुम्‍हा पायीं झाले दरुषण । विनवितो तुका संतां दोन्‍ही कर जोडून ॥६॥
(२)
सहज मी आंधळा गानिज निराकार पंथे । वृत्ति हे निवृत्‍ती झाली जन न दिसे तेथें ।
मी माझे हारपलें ठायी जेथींच्‍या तेथें । अदृश्‍य तेंचि झालें कांही दृश्‍य जें होतें ॥१॥
सुखें मी निजलों गा शुन्‍य सारुनि तेथें । त्रिकुट शिखरीं गा दान मिळे आइतें ॥धृ॥
टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा । कोल्‍हाळ चुकविला त्रिगुणांचा वोळसा ।
न मागें भीक आतां हाचि झाला भरंवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्‍छा ॥३॥
ऊर्ध्‍वमुखे आळविला सोहं शब्‍दाचा नाद । अरुप जागविला दाता घेऊनि छंद ।
घेऊनी आला दान निजतत्‍व निजबोध । स्‍वरुपीं मेळविलें नांव ठेवियला भेद ॥४॥
शब्‍द हा बहुसार उपकाराची राशी । म्‍हणोनि चालविला मागें येथील त्‍यांसी ।
मागोनि आली वाट सिध्‍द ओळीची तैसी । तरले तरती गा आणीकही विश्‍वासी ॥५॥
वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणीव नागवण लागो नेदी ते ठाव ।
म्‍हणोनि संग टाकीं सेवीं अद्वेत भाव । तुका म्‍हणे हाचि संती मागें केला उपाव ॥६॥
(३)
देखत होतों आधी मागें पुढे सकळ । मग हे दृष्‍टी गेली वरी आलें पडळ ।
तिमिर कोंदलेसे वाढे वाढतां प्रबंळ । भीत मी झालों देवा काय झाल्‍याचें फळ ॥१॥
आतां मज दृष्टि देई पांडूरंगा मायबापा । शरण मी आलों तुज निवारुनियां पापा ।
अंजन लेववूनि करीं मारग सोपा । जाईन सिध्‍दपंथे अवघ्‍या चुकतील खेपा ॥२॥
होतसे खेद चित्‍ता कांहीं नाठवे विचार । जात होतों जनामागे तोही सांडिला आधार ।
हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार । फिरलीं माझी मज कोणी न देती आधार ॥३॥
जोंवरी चळण गा तोंवरी म्‍हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्‍या काजा ।
इंद्रिये मावळलीं आला बागुल आजा । तैसी विपरीत झाला तोचि देह नव्‍हे दुजा ॥४॥
गुंतलों या संवसारें कैसा झालोंसें अंध । मी माझे वाढवूनि मायातृष्‍णेचा बाध ।
स्‍वहित न दिसेचि केला आपुला वध । लागले काळ पाठीं सवें काम हे क्रोध ॥५॥
लागली चालतां गा गुणदोषांच्‍या ठेंसा । सांडिली वाट मार्ग झालों निराळा कैसा ।
पाहतों वास तुझी थेर करुनि आशा । तुका म्‍हणे वैद्यराजा पंढरीच्‍या निवासा ॥६॥
(४)
देश वेष नव्‍हे माझा सहज फिरत आलों । करुं सत्‍ता कवणावरी कोठें स्थिर राहिलों ।
पाय डोळे म्‍हणतां माझे तिही कैसा मोकलिलों । परदेशीं नाही कोणी अंध पांगुळ झालों ॥१॥
आतां माझी करीं चिंता दान देइं भगवंता । पाठीं पोटीं नाही निरवी सज्‍जन संतां ॥२॥
चालतां वाट पुढें भाय वाटतें चित्‍ती । बहुत जण गेले नाही आले मागुती ।
न देखे काय झाले कान तरी ऐकती । बैसलों संधिभागी तुज धरुनि चित्‍तीं ॥३॥
भाकितों करुणा गा जैसा सांडिला ठाव । न भरे पोट कधीं नाही निश्‍चळ पाव ।
हिंडतां भागलों गा लक्ष चौ-यांशी गांव । धरुनि राहिलों गा हाचि वसता ठाव ॥४॥
भरंवसा काय आतां कोण आणी अवचिता । तैसीच झाली कीर्ति तया मज बहुतां ।
म्‍हणऊनि मारी हाका सोयी पावें पुण्‍यवंता । लागली भूक थोरी तूंचि कृपाळू दाता ॥५॥
संचित सांडवलें कांही होते ते जवळी । वित्‍त गोत पुत माय तुटली हे लागावळी ।
निष्‍काम झालों देवा होतें माझे कपाळी । तुका म्‍हणे तूंचि आतां माझा सर्वस्‍वें बळी ॥६॥
(५)
आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्‍व तोचि सर्व होय जाणता ।
घडी मोडी हेळामात्रें पापपुण्‍य संचिता । भवदु:ख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥
धर्म गा जागो तुझा तूंचि कृपाळू राजा । जाणसी जीवीचें गा न सांगतां सहजा ॥२॥
घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटी । पंढरी पुण्‍य ठाव नीरे भीवरे तटीं ।
न देखे दुसरे गा झाला अदृष्‍यदृष्‍टी ।वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टि ॥३॥
आणीक उपमन्‍यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवें जना चालतें वाटे ।
घातली लोळणी गा हरी नाम बोभाटे । पावला त्‍या कारणे धाव घातली नेटें ॥४॥
बैसोनी खोटी शुक राहे गर्भी आंधळा । शीणला येरझाली दु:ख आठवी वेळा ।
मागील सोसिलें ते ना भी म्‍हणे गोपाळा । पावला त्‍याकारणें लाज राखिली कळा ॥५॥
न देखे जो या जना तया दावी आपण । वेग्‍ळा सुखद:खा मोहे नाठवी धना ।
आपपर तेंही नाहीं बंधुवर्ग सज्‍जना । तुकया तेचि परि झाली पावें नारायणा ॥६॥
(६)
भगवंता तुजकारणें मेली जीवाचि कैसी । निष्‍काम बुध्दि ठेली चरण नाहीं तयेसी ।
न चलती हात पाय दृष्‍टी फिरली कैसी । जाणतां न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥२॥
भुक्ति मुक्ति तूंचि एक होसी सिध्‍दीचा दाता । म्‍हणोनि सांडवली शोक भय लज्‍जा चिंता ।
सर्वस्‍वें त्‍याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येऊनि सामोरा आतां ॥३॥
संसार सागरु गा भवदु:खाचें मूळ । जनवाद अंथरुण माजीं केले इंगळ ।
इंद्रियें वज्रघातें तपे उष्‍ण वरी ज्‍वाळ । सोसिलें का करुं दुर्भर रे चांडाळ ॥४॥
तिही लोकीं तुझें नाम वृक्ष पल्‍लव शाखा । वेंधलो वरि खोडा भाव धरुनी टेंका ।
जाणवी नरनारी जागो धर्म हा लोकां । पावती पुण्‍यवंत सोई आमुचिये हाका ॥५॥
नाठवे आपपर आतां काय बां करुं । सारिखा दोहीसवा हारपला विचारु ।
घातला योगक्षेम तुज आपुला भारु । तुकया शरणागता देई अभयकरु ॥६॥

संत एकनाथ महाराजांचा आंधळा

(१)
पंढरपुर पाटणी गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचेंतें नाम ॥१॥
आंधळ्या जीवींचे तो गा जाणतो धर्म । म्‍हणोनि आलों गा देई माझें मज वर्म ॥२॥
असोनि हात पाय डोळा जाहालों मी आंधळा । मुखी नाम तुझें लागला वाचेसी चाळा ॥३॥
देऊनि दान मातें नाम सांगे ये काळीं । विठोबाचें दान आलें ऐसी देईन आरोळी ॥४॥
दान पावलें संतसंगे भक्‍तीचें । एका जनार्दनीं अखंड नाम वाचे ॥५॥
(२)
आधीं देखत होतों सकळ । मग ही दृष्‍टी गेली आलें पडळ । चालतां मार्ग न दिसे केवळ ।
आतां मज करा कृपा । मी दीन तुम्‍ही दयाळ ॥१॥
दाते हो दान करा तुम्‍ही संत उदार । चालतां मार्ग दाखवा मज निर्धार ।
गुंतलों लोभ आशा न कळे विचार । दृष्‍टीतें फिरवूनि द्या मुखीं नामाचा उच्‍चार ॥२॥
त्रैलोक्‍यांत तुमची थोरी पुराणें वर्णिती साचार ।वेदही तुम्‍हां गाती तयां न कळे निर्धार ।
कीर्ति गाती सनकादिक तो दाखवा श्रीधर । म्‍हणोनि धरिला मार्ग नका करुं अव्‍हेरी ॥३॥
अंधपण सर्व गेलें श्रीगुरुचा आधार । तेणें पंथे चालतांना फिटला माया मोह अंधार ।
एका जनार्दनीं देखिला परेपरता पर ।श्रीगुरुजनार्दन कृपेंने दाविलें निजधर॥४॥
(३)
दाते बहुतअसती परि न देती साचार । मागत्‍याची आशा बहु तेणें न घडे विचार ।
सम देणें सम घेणें या नाही प्रकार । लाजिरवाणें जिणें दोघांचें धर्म अवघा असार ॥१॥
तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार । तुष्‍टला माझया देहीं दिधलें अक्षय अपार ।
न सरेचि कल्‍पांतीं माप लागलें निर्धार । मागतेंपण हारपलें दैन्‍य गेलें साचार ॥२॥
देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ । मायामोह तृष्‍णा हाचि चुकविला कोल्‍हाळ ।
एका जनार्दनी एकपणें निर्मळ । शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥
(४)
मी माझे कल्‍पनेनें जाहलोंसे पांगुळ । चालतां न चलवेंचि कोठें नमिळे स्‍थळ ।
हिंडतो दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण ही भ्रांती वारी कैं भेटेल गुरुदयाळ ॥१॥
धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव । निवारुनी भवर जाळें अवघा निरसला भेव ॥२॥
कर्म त्‍या अकर्माच्‍या लागती वाटें ठेंसा । संपत्‍ती विपत्‍तीचा मानिला भरवसा ।
कन्‍या पुत्र आप्‍त जन हा तों सहज वोळसा । या भ्रम डोहीं बुडालों धांवे गुरुराया सर्वशा ॥३॥
येऊनि गरुनाथें माथां ठेविला करु । अज्ञान तिमिर गेलें शुध्‍द मार्ग साचारु ।
गर्जत चालियेलों फिटला अज्ञान अंधारु । एका जनार्दनी माझा श्रीगुरु उदारु ॥४॥
(५)
सहजपुर पाटणी गा एक जनार्दन दाता । पांगुळा पाय देतो विश्रांति समस्‍तां ॥१॥
यालागीं नाम त्‍यांचे दु:ख निरसी मनाचे । पांगुळा जीवींचे तोचि चालवी साचें ॥२॥
जीवें जिता मी पांगुळ दिधला निजबोध ढवळा । त्‍यावरि बैसोनि क्रीडे सर्वश्र स्‍वलीला ॥३॥
एकाएकु परम दीन अंध पंगु अज्ञान । जनार्दनें कृपा करुन करवी निजसत्‍ता चलन ॥४॥
(६)
असोनियां दृष्‍टी जाहलों मी आंधळा । आपंगिलें जिही जाहलों त्‍या वेगळा ।
मायबाप माझे म्‍हणती मज माझ्या बाळा । शेवटी मोकलिती देती हातीं काळा ॥१॥
संत तुम्‍ही मायबाप माझी राखा कांही दया । लागतों मी वारंवार तुमचीया पायां ॥२॥
इंद्रियें माझी न चलता क्षणभरी । गुंतलों मायामाहें या संसाराचे फेरी ।
अंथरुण घातलें इंगळाचे शेजेवरी । कैसी येईल निद्रा कोण सोडवील निर्धारी ॥३॥
माय बाप तुम्‍ही संत उपकार करा । जगीं तो नांदतो जनीं एवढा जनार्दन तो खरा ।
तयाचिया चरणावरी मस्‍तक निर्धारा । एका जनार्दनी करी विनंति अवधारा ॥४॥
(७)
मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें नांव पंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर ।
पुंडलिक भक्‍तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती साधुसंत जिवा वाटे हुरहूर ॥१॥
तुम्‍ही संत मायबाप ऐवढा उपकार करा । न्‍या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥२॥
मज नाही हातपाय डोळा पडली झापड । कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड ।
नाक मुख गळूं लागले लाळ आणि शेंबूड । श्‍वानापरी गती झाली अवघे करिती हाड हाड ॥३॥
साधुसंत मायबाप जे कां दयेचे सागर । भावाचे मुख्‍य स्‍थान भक्‍तीचें तें माहेर ।
तिहीं केले कृपादान मस्‍तकी ठेविला कर । माया मोह निरसली शुध्‍द झालें कलेंवर ॥४॥
भाव दिला मज सांगातें मार्ग दाविला निट । भ्रांति हे समूळ गेली दिसूं लागली वाट ।
नाचता प्रेमछंदे चालूं लागलों सपाट । एकाजनार्दनी पावलों पंढरी पेंठ ॥५॥
(८)
मार्ग बहु असती परि तयांची न कळे गती । म्‍हणोनि पडियलो माया मोहभ्रांती ।
तेणे मी जाहालों अंध कोण धरिल चित्‍ती । मारितों हांका मोठ्यानें अहो उदार श्रीगुरुमुर्ति ॥१॥
धांव धांव श्रीगुरुराया काढीं देऊनि हात । बुडतसे भवनदीमाजीं न कळे अंत ।
शिण बहु मज जाहला श्रमलों पाहत पाहत । यांतुनी सोडी वेगी तुम्‍हां श्रीगुरुसमर्थ ॥२॥
वाटे आडवाट दरी दरकुटे यांमाजीं गुंतले । कन्‍या पुत्र स्‍त्रीधन हें वर पाडिले जाळें ।
कवण उगवील कवणा शरण जाऊं तें न कळे । करितों चिंता ह्र्दयीं तंव श्रींगुरु प्रसन्‍न जाहले निवारली अवघी भ्रांती ॥३॥
एका शरण जनार्दनी जाहली संतोषवृत्‍ती । अंधपण फिटलें निवारली पुनरावृत्‍ती ॥४॥
(९)
अंध पंगू दृढ जाहलों बांधलों संसारी । मायामोह भरली नदीमाजीं दुसतर मगरी ।
यातून कोण सोडवील नाना परिचे दु:ख भारी । दैवयोगें भेटला तो जनार्दन गुरुसत्‍वरीं ॥१॥
धर्म जागो जनार्दनाचा तेणें निवारिला फेरा । चुकविल्‍या चौ-यांशीच्‍या तयानें वेरझारा ।
मोक्षप्राप्‍ती वाट जाहली दाविला सोयरा । जन्‍म मरण दु:ख गेलें जाहालों सैराट मोकळा ॥२॥
घातिलें अंजन डोळां दिसों लागली वाट । मोकळा मार्ग जाहला चालिलों सैराट ।
श्रीगुरुजनार्दन मुखीं नामाचा । बौभाट । एका जनार्दनी पावलों मूळची पेठ ॥ ३॥
(१०)
ओंकार निजवृक्ष त्‍यावरी वेधलों प्रत्‍यक्ष । दान मागो रामकृष्‍ण जनार्दनां प्रत्‍यक्ष ॥१॥
झालों मी अंध पंगु । माझा कोणी न धरिती संगु ॥२ ॥
चालतां वाट मार्गी मज कांही दिसेना । उच्‍चारिती नाम संतमार्गे चालिलों जाणा ॥३॥
पाहुनी पंढरीं पेठ अंधपणा फिटलों । एका जनार्दनी संतपायी लीन झालों ॥४॥

संत नामदेव महाराजांचा आंधळा

जंबु या द्वीपामाजीं एक पंढरपूर गांव । धर्माचे नगर देखा विठो पाटील त्‍याचें नांव ।
चला जाऊं तयां ठाया । कांही भोजन मागाया ॥१॥
विठोबाचा धर्म जागो । त्‍याची चरणी लक्ष लागो ॥२॥
ज्‍यासी नाही पंख पाय तेणे करावें ते काय । शुध्‍द भाव धरोनियां पंढरपुरासी जावे ।
इि‍च्‍छलें फळ देतो यासी नवलाव तें काय ॥४ ॥
भक्ति आणि भावार्थाचा तेणे गुंफियेला शेला । विठोबा दाताराच्‍या घरा उचित नेला ।
उशिर न लागतां जनमा वेगळा केला ॥५॥
सुदामा ब्राम्‍हण दु:खे दारिद्रे पिडीला । मुष्‍टी पोहे घेऊनि त्‍याचे भेटिलागी गेला ।
शुध्‍द भाव देखोनियां नांव सोनियाचा दिला ॥६॥
गण आणि गोत्रज सर्व हांसताती मज । गेलें याचे मनुष्‍यपण येणें सांडियेली लाज ।
विनवितों शिंपी नामा संत चरणींचा रज ॥५॥

पुढे वाचा