काकडा भजन प्रस्तावना

अष्‍ठप्रहरामध्‍ये प्रथम प्रहर साधु संताच्‍या साधनेचा असून या वेळ प्रसन्‍न असल्‍याने देवाची केलेली साधन फलद्रुप होते. ही संध साधुन सर्वसामान्‍यांनाही भगवत भक्‍तीचे महत्‍व कळावे व भक्‍तीचा आनंद लुटता यावा याकरिता संतांनी प्रार्थनेद्वारे अनेक रुपकातून भगवंताची करुणा भाकली. ही साधना पहाटेच्‍यावेळी असल्‍याने या भजनाला काकडा भजन संबोधले जाते.

मालिका १

॥ जय जय राम कृष्‍ण हरि ॥

(१)
रुप पाहता लोचनी । सुख झालें वो साजणीं ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
बहुता सुकृताची जोडी । म्‍हणूनी विठ्ठल आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर । बापरखुमादेवीवर ॥४॥
(२)
वचन ऐका कमळापति । मज रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितों कथेकाळी । आपण असावे जवळी ॥२॥
घेई घेई माझी भाक । जरी का मागेन आणीक ॥३॥
तुकयाबंधु म्‍हणे देवा । शब्‍द इतुकाची राखावा ॥४॥
(३)
तुज पाहतां सामोरी । दृष्‍टी न फिरे माघारी ॥१॥
मांझे चित्‍त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरिराया ॥२॥
नव्‍हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥
तुका म्‍हणे बळी । जीव दिला पायांतळी ॥४॥
(४)
तुम्‍ही सनकादिक संत । म्‍हणवितां कृपावंत ॥१॥
एवढा करा उपकार । सांगा देवा नमस्‍कार ॥२॥
माझी भाकावी करुणा । विनवा पंढरीचा राणा ॥३॥
तुका म्‍हणे मज आठवा । मळ लवकरी पाठवा ॥४॥
(५)
आतां तुम्‍ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥
गोमटे तें करा माझे । भार ओझे तुम्‍हांसी ॥२॥
वंचिले तें पायांपाशी । नाहीं यासी वेगळें ॥३॥
तुका महणे सोडिल्‍या गांठी । दिली मिठी पायांसी ॥४॥
(६)
लेकुराचे हित । वाहे माऊलीचें चित्‍त ॥१॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥
पोटी भार वाहे । त्‍याचें सर्वस्‍वही साहे ॥३॥
तुका म्हणे माझें । तुम्‍हा संतावरी ओझे ॥४॥
(७)
करुनी उचित । प्रेम घाली ह्र्दयांत ॥१॥
आलों दान मागावयास । थोर करुनियां आस ॥२॥
चिंतन समयी । सेवा आपुलीच देई ॥३॥
तुकयाबंधु म्‍हणे भावा । मज निरवावें देवा ॥४॥
(८)
न करी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥
मायबाप बंधुजन । तूंचि सोयरा सज्‍जन ॥३॥
तुका म्‍हणे तुज विरहित । कोण करील माझे हित ॥४॥
(९)
गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥
वेगी आणावा तो हरी । मज दीनातें उध्‍दरीं ॥२॥
पाय लक्ष्‍मीच्‍या हातीं । म्‍हणोनि येतो काकुलती ॥३॥
तुका म्‍हणे शेषा । जागे करा ह्रषीकेशा ॥४॥
(१०)
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणीच्‍यां गंगा ॥२॥
इतुक्‍यां सहित त्‍वांबा यावें । माझे रंगणी नाचावें ॥३॥
माझा रंग तुझिया गुणीं । म्‍हणे नामयाची जनी ॥४॥

॥ रामकृष्‍णहरी जय जय रामकृष्‍णहरी ॥

मालिका २

(१)
उंचनीच कांही नेणे भगवंत । तिष्‍ठे भाव भक्‍त देखानियां ॥१॥
दासी पुत्र कण्‍या विदुराच्‍या भक्षी । दैत्‍या घरीं रक्षी प्रल्‍हादासी ॥२॥
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे । कबिराचे मागे शेलेविणी ॥३॥
सजन कसाया विकुं लागे मांस । माळ्या सावत्‍यास खुरपूं लागे ॥४॥
नरहरि सोनारा घडूं फुंकूं लागे । चोख्‍यामेळ्यासंगे ढोरे ओढी ॥५॥
नामयाची जनीं सवें वेचीं शेणी । धर्माघरी पाणी वाहे झाडी ॥६॥
नाम्‍यासवें जेवी नव्हें संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥७॥
गौळियांचे घरी अंगे गाई वळी । द्वारपाळ बळीद्वारीं झाला ॥८॥
अर्जुनाचें रथी होय हा सारथी । भक्षी पोहे प्रीति सुदाम्‍याचें ॥९॥
येकाबाचें ऋण फेडी ह्रषीकेशी । अंबऋषीचे सोशी गर्भवास ॥१०॥
मिराबाईसाठी घेतो विष प्‍याला । दामाजीचा झाला पाडिवार ॥११॥
घरी माती वाहे गो-या कुंभाराची । हुंडी त्या मेहत्‍याची अंगे भरी ॥१२॥
पुंडलिकासाठी अझूनि तिष्‍ठत । तुका म्‍हणे मात धन्‍य त्‍याची ॥१३॥
(२)
श्रवणें कीर्तनें जालें तें पावन । सनकादिक जाण परम भक्‍त ॥१॥
झाली तें विश्रांति याचकां सकळां । जीवी जीवनकळा श्रीमूर्तीरया ॥२॥
पादसेवनें आक्रूर झाला ब्रहृरुप । प्रत्‍यक्ष स्‍वरुप गोविंदाचे ॥३॥
सख्‍यपणें अर्जुन नरनारायण । सृष्ट जनार्दन एकरुप ॥४॥
दास्‍यत्‍व निकट हनुमंते पै केले। म्‍हणोनि देखिले रामचरण ॥५॥
बळी आणि भीष्‍म प्रल्‍हाद नारद । बिभीषणावरच चंद्रार्क ॥६॥
व्‍यास आणि वसिष्‍ठ वाल्मिकादिक । आणिक पुंडलिक शिरोमणी ॥७॥
शुकादिक योगी रंगले श्रीरंगी । परिक्षितीच्‍या अंगी ठसाविलें ॥८॥
उध्‍दव यादव आणि तें गोपाळ । गोपिकांचे मेळ ब्रहृरुप ॥९॥
अनंत भक्‍तराशी तरलें वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ॥१०॥
(३)
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास जन्‍म घेती ॥१॥
कर्मधर्म त्‍यांचा जाला नारायण । त्‍यांचेनि पावन तिन्‍ही लोक ॥२॥
वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशीं ॥३॥
अंत्‍यजादी योनि तरल्‍या हरिभजनें । तयांची पुराणें भाट जाली ॥४॥
वैश्‍या तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥५॥
कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्‍हावी जाण विष्‍णुदास ॥६॥
कान्‍होपात्रा खादु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायी ॥७॥
चोखामेळा बंका जातीचे महार । त्‍यासी सर्वेश्‍वर ऐक्‍य करी ॥८॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥९॥
मैराळ जनक कोण कुळ त्‍याचें । महिमान तयाचें काय सांगो ॥१०॥
यातायाती धर्म नाहीं विष्‍णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्‍त्री ॥११॥
तुका म्‍हणे तुम्‍ही विचारावें ग्रंथी । तारिलें पतित नेणों किती ॥१२॥
(४)
बहु उतावीळ भक्तिचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥
तुझ्या पायी मज झालासे विश्‍वास । म्‍हणोनियां आस मोकलिली ॥२॥
ऋषिमुनि सिध्‍द साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥३॥
नाहीं नाश ते सुख दिलें तयांस । झाले ते उदास सर्वभावें ॥४॥
तुका म्‍हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥५॥
(५)
पुण्‍यवंत व्‍हावें । घेतां सज्‍जनांची नांवे ॥१॥
नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फुकासाठी ॥२॥
विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया ॥३॥
तुका म्‍हणे पापें । जाती संतांचिया जपें ॥४॥

ज्ञानोबा तुकाराम....ज्ञानोबा तुकाराम...

पुढे वाचा