(१)
सुंदर तें ध्यान उभा विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥२॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४॥
(२)
सदा माझे डोळां जडो तुझी मुर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रुप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्वकाळ ॥२॥
विठो माऊलिये हाचि वर देई । संचरोनि राहीं ह्रदयामाजी ॥३॥
तुका म्हणे कांही न मागें आणिक । तुझें पायीं सुख सर्व आहे ॥४॥
(३)
आवडे हें रुप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥१॥
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जो मी तुज पाहें पांडुरंगा ॥२॥
लांचावलें मन लागलीसें गोडी । ते जीवें न सोडी ऐसें झालें ॥ ३॥
तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापा ॥४॥
(४)
झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा । जेणे माझ्या मना बोध केला ॥१॥
अनंता जन्मीचें विसरलों दु:ख । पाहतां तुझें मुख पांडुरंगा ॥२॥
योगियांच्या ध्यानी ध्यातां नातुडसी । तो तूं आम्हांपाशी मागेंपुढे ॥३॥
नामा म्हणे जीवें करीने निंबलोण । विटेसहित चरण ओवाळीन ॥४॥
(५)
पाहतां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥२॥
श्रवणाची वाट चोखाळली शुध्द । गेले भेदाभेद निवारोनी ॥३॥
महामळे मन होतें जे गांदलें । शुध्द चोखाळलें स्फटिक जैसें ॥४॥
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल निधान सांपडले ॥५॥
(६)
येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम । तेंचि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरुनियां पाहीन तुझें मुख । तेचि मज सुख देई देवा ॥२॥
कान भरोनियां ऐकेने तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥३॥
वाहे रंगी टाळी नाचेन उदास । हें देई हातांस पायां सुख ॥४॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणिक नको ठाव चिंतूं यासी ॥५॥
(७)
नको ब्रहृज्ञान आत्मस्थि भाव । मी भक्त तूं देव ऐसें करी ॥१॥
दावी रुप मज गोपिका रमणा । ठेवूंदे चरणांवरी माथा ॥२॥
पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥३॥
पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥४॥
तुका म्हणे यासी न लावीं उशीर । माझे अभ्यंतर जाणोनियां ॥५॥
॥ जय जय विठोबा रखुमाई ॥
(१)
उठा उठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठल माऊली । दीन जनांची साउलीं । येई धांउनी स्मरतांचि ॥१॥
पंढरपुरी जे भीमातटी । सुंदर मनोहर गोमटी ।दोन्ही कर ठेवोनियां कटी । भेटीसाठी तिष्ठतसे ॥२॥
किरीट कुंडलें मंडित । श्रीमुख अतिसुंदर शोभत । गळां वैजयंती डुल्लत । हार मिरवत तुळशीचा ॥३॥
सुरेख मूर्ति सगुण सावळी । कंठी कौस्तुभ एकावळी । केशर उटी परिमळ आगळी । बुक्का भाळी विलतसें ॥४॥
पीत पीतांबर कसला कटीं । अक्षयी वीट चरण तळवटी । सकळ सौंदर्य सुखाची पेटी । ह्र्दय संपुष्टी आठवा तें ॥५॥
अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का । तैसीच प्रीति करी भोळ्या भाविका । नामा पदपंकज पादुका । शिरी मस्तकी वंदीतसें ॥६॥
(२)
उठा जागे व्हा रे आतां । स्मरण करा पंढरिनाथा । भावे चरणी ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ॥१॥
धन दारा पुत्र जन । बंधु सोयरे पिशून ।सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥
माया विघ्ने भ्रमलां खरे । म्हणतां मी माझेनि घरें । हें तों संपत्तीचें वारे । साचोकारें जाईल ॥३॥
आयुष्य जात आहे पहा । काळ जपतसे महा । स्वहिताचा घोर वहा । ध्यानीं रहा श्रीहरीच्या ॥४॥
संत चरणी भाव धरा । क्षणक्षणा नामस्मरा । मुक्ति सायोज्यता वरा । हेचि करा बापांनो ॥५॥
विष्णु दास विनवी नामा । भुलूं नका भवकामा । धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ती ॥६॥
(३)
उठा उठा साधुसंत । साधा आपुलें हित । गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥१॥
उठुनी वेगेसी । चला जाऊ राऊळासी । जळती पातकांच्या राशी । काकड आरती देखिलिया ॥२॥
उठोनियां पहाटे । विठ्ठल पहा उभाविटे । चरण तयाचे गोमटे । अमृत दृष्टी अवलोका ॥३॥
जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा । वेगें लिंबलोण करा । दृष्टी होईल तयासी ॥४॥
पुढे वाजंत्रे वाजती । ढोल ढमामे गर्जती । होते काकड आरती । पांडूरंग रायाची ॥५॥
सिंह नाद शंख भेरी । गरज होतो महाद्वारी । केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥६॥
(४)
उठा पांडूरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥
संत साधुमुनी अवघे झालेती गोळा । सोडा शेजसुख आतां पाहू द्या मुख कमळा ॥२॥
रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी । मन उतावेळ रुप पाहावया दृष्टी ॥३॥
राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया । शेजें हालउनी जागें करा देवराया ॥४॥
गरुड हनुमंत पुढे पहाती वाट । स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बोभाट ॥५॥
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥
(५)
उठा अरुणोदय प्रकाश जहाला । घंटा गजर गर्जिन्नला ।हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा॥१॥
महाद्वारी वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन । आले द्यावें तयासी दर्शन । बंदिजन गर्जती ॥२॥
सभामंडपी कीर्तनघोष मृदंग टाळविणें सुरस । आनंदे गाती हरिचें दास । परम उल्हास करुनियां ॥३॥
चंद्रभागें वाळवंटी । प्रात स्नानाची जनदाटी । आता येतिल आपुलें भेटी । उठीं उठीं गोविंदा ॥४॥
ऐसें विनवी रुक्मिणी । जागृत जाहालें चक्रपाणी । नामा बंध्दाजुळी जोडुनी । चरणी माथा ठेवितसें ॥५॥
(६)
उठा पांडूरंगा प्रभात समयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडापारी दाटला ॥१॥
वाळवंटापासुनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची मांदी उभें जोडूनि हात ॥२॥
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडुनी पाहताती जगजेठी ॥३॥
सुरवरांची विमानें गगनी दाटली सकळ । रखुमाबाईमाते वेगीं उठवा घननीळ ॥४॥
रंभादीक नाचती उभ्या जोडुनी हात । त्रिशुळ डमरु घेऊनि आला गिरजेचा कांत ॥५॥
पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्रिया येती । भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥६॥
अनंत अवतार घेसी भक्ताकारणें । कनवाळु कृपाळू दीनालागीं उद्वरणें ॥७॥
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी । पाठीमागे डोळे झांकुनी उभी ते जनी ॥८॥
(७)
अवघे हरिजन मिळोनि आले राऊळा । दोन्ही कर जोडूनी मिनविती गोपाळा ॥१॥
उठा पांडूरंगा हरिजना सांभाळी । पाहूं द्या वदन वंदू पायांची धूळी ॥२॥
उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा । कोठवरी निद्रा आतां उठा परेशा ॥३॥
तुका म्हणे आम्ही उभे तिष्टत द्वाराशी । दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥४॥
(८)
कां हो तुम्ही निश्चिंतीनें निजलाती हरी । मानियेले सुख आम्ही वाचूं कैशापरी ॥१॥
उठा सावध व्हावें क्षेम सकळांसी द्यावे । जया जी वासना तयां तैसे पुरवावे ॥२॥
जन्मोजन्मीं सांभाळिले क्षमा करा अन्याय । कृपा करी देवा आम्हां तुचि बापमाय ॥३॥
तुका म्हणे करा वडीलपणा दानासी । जेणे सुख होय सकळ हे जनासी ॥४॥
(९)
उठा सकळ जन उठिलें नारायण । आनंदें मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥
जोडोनिया कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥३॥
तुका म्हणे काय पढियंते मागा । आपुलालें सांगा दु:ख सकळ ॥४॥
(१०)
भक्तिचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जिवें भावे ओवाळू आरती ॥१॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडुनी चरणी ठेवीन माथा ॥२॥
काय महीमा वर्णू आतां सांगणें ते किती । कोटि ब्रहृहत्या मुख पाहता जाती ॥३॥
राही रखुमाई दोन्ही उभ्या दो बाहीं । मयुर पिच्छे चामरे ढाळिती ठायी ठायी ॥४॥
तुका म्हणे दिप घेऊनि उन्मनी ती शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥५॥
(११)
सहस्त्र दीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा।उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१॥
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया । चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया ॥२॥
कोंदलेसे तेज प्रभा झालीसें एक । नित्यनवा आनंद ओवाळीता श्रीमुख ॥३॥
आरती करिता तेज प्रकाशले नयनी । तेणॆ तेजें मिनला एकाएकी जनार्दनी ॥४॥
(१२)
संतसनकादिक भक्त मिळाले आणीक । स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥१॥
नवल होत हे आरती देवाधिदेवा । स्वर्गाहुनी सुरवर पाहू येती केशवा ॥२॥
नरनारीबाळां ठक पाडियले नयनां । ओवाळितां श्रीमुख धणी न पुरे मना ॥३॥
एका जनार्दनी मंगळ आरत्या गाती । मिळाले वैष्णव जयजयकारें गर्जती ॥४॥
(१३)
कनकाच्या परियेळी उजळुनि आरती । यत्न दीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥
ओवाळू गे माये सबाह्य साजिरा । राही रखुबाई सत्यभामेच्या वरा ॥२॥
मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहाता तेज फांकले ॥३॥
वैजयंतीमाळ गळा शोभे श्रीमंत । शंख चक्रगदा पद्य आयुधें शोभत ॥४॥
सावळा सकुमार जैसा कर्दळीचा गाभा । चरणींची नेपूरें वांकी गर्जती नभा ॥५॥
ओवाळीता मन हें उभें ठाकले ठायी । समदृष्टी समान तुकया लागला पायी ॥६॥
(१४)
तपें तीर्थे व्रतें जयापायीं मिरवती । संतमुनीवृंदे जया सुखासी लाधती ॥१॥
हरिच्या पायलागीं आरती करुं । काया वाचा मने चरण दृढ धरुं ॥२॥
सुरासुर उभे नमना कर जोडुनि । प्रल्हाद पारद अखंड जयाचे ध्यानी ॥३॥
एका एकी विनटला जनार्दन पायीं । आरती करितां देहीं देहभाव नाहीं ॥४॥
(१५)
लाजले गे माय आतां कोणा आवाळूं । जिकडे पाहावें तिकडे चतुर्भुज गोपाळू ॥१॥
ओवाळूं मी गेले माय गेले द्वारकें । जिकडे पहावें तिकडे चतर्भुज सारखें ॥२॥
ओवाळूं मी गेलें माय सखिया माझारी । जिकडे पहावें तिकडे चतुर्भूज नरनारी ॥३॥
ओवाळूं मी गेले माय सारंगधरा । जिकडे पहावे तिकडे चतुर्भूज परिवारा ॥४॥
वैजयंती गळां श्रीवत्सलांछन । विष्णुदास नामा येणे दाविली खूण ॥५॥
(१६)
तुझें दास्य करुं आणिका मागों खावया । धिक झाले जिणें माझें पंढरिराया ॥१॥
काय गा विठोबा तुज आतां म्हणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोरांच्या दैवे ॥२॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा ऐसी ॥३॥
तुझा शरणांगत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हे कां नेणसीं ॥४॥
(१७)
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंखचक्रगदापद्मसहित करि ॥१॥
देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहतां वाटे ग मायें ॥२॥
सगुण चतुर्भुज रुपडें तेज पुंजाळती । वंदी चरणरज नामा विनवीतसे पुढती ॥३॥
(१८)
सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण । नाही रुप वर्ण गुण जेथे ॥ १॥
तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी । पहाता पाहणे दुरी सारोनिया ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती । ते हे उभी विटेवरी ॥३॥
॥ जय जय विठोबा रखुमाई ॥