काकडा २

 
 
 

मालिका ५

(१)
योगिया दुर्लभ तो म्‍यां देखिला साजणी । पाहतां पाहातां मना न पुरे धणी ॥१॥
देखिला देखिला मायें देवांचा देवो । फिटला संदेहो निमालें दुजेपणा ॥२॥
अनंतरुपे अनंत वेषे देखिला म्‍यां त्‍यासी । बापरखुमादेवीवरु खूण बाणली कैसी ॥३॥
(२)
करुनी विनवणी पायी ठेवितो माथा । परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेंसे वाटतें पायी । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥२॥
असो नसो भाव आलो तुझीया ठाया । कृपादृष्‍टी पाहे मजकडे पंढरीराया ॥३॥
तुका म्‍हणे आम्‍ही तुझी वेडी वाकुडी । नामें भवपाश हाते आपुल्‍या तोडी ॥४॥
(३)
माझे चित्‍त तुझे पायी । राहे ऐसे करी कांही । धरोनियां बाही । भव हा तरी दातारा ॥१॥
चतुरा तूं शिरोमणी । गुण लावण्‍याची खाणी । मुगुट सकळांमणी । धन्‍य तुचि विठोबा ॥२॥
करी या तिमिराचा नाश । उदय होऊनि प्रकाश । तोडी आशा पाश । करी वास ह्रदयीं ॥३॥
पाहे गुंतलो नेणतां । माझी असो तुम्‍हां चिंता । तुका ठेवी माथा । पायी आतां राखावें ॥४॥
(४)
ऐसी वाट पाहें कांही निरोप कां मूळ । कांहो कळवळा तुम्‍हां उमटेचि नां ॥१॥
आहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आसे चाळवूनी ठेविलें ॥२॥
काय जन्‍मा येऊनियां केली म्‍यां जोडी । ऐसे घडोघडी चित्‍ता येतो आठव ॥३॥
तुका म्‍हणे खरा न पवेचि विभाग । धिक्‍कारितें जग हेचि लाहें हिशोंब ॥४॥
(५)
बोलोनियां दाऊ कां तुम्‍ही नेणाजी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेना ॥१॥
पांगुळले मन कांही नाठवे उपाय । म्‍हणऊनी आस जीवीं धरुनी राहिलों ॥२॥
त्‍याग भोग दु:ख काय सांडावे मांडावे । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोर आशंका ॥३॥
तुका म्‍हणे बाळ माता चुकलिया वनीं । न पवतां जजनी दु:ख पावे विठ्ठले ॥४॥
(६)
कां गा केविलवाण केलों दिनाचा दीन । काय तुझी हीन शक्ति झालीसे दिसे ॥१॥
जाल येते मना तुझा म्‍हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिलीया सारिखी ॥२॥
लाजविली मागे संतांची ही उत्‍तरें । कळो येतें खरे दुजें एकावरुनी ॥३॥
तुका म्‍हणे माझी कोणी वदविली वाणी । प्रसादावांचूनी तुमचियां विठ्ठले ॥४॥
(७)
जळो माझें कर्म वायां केली कटकट । जालें तैसे तट नाहीं आले अनुभवा ॥१॥
आतां पुढें धरी काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥२॥
गुणवंत केलों दोष जाणायासाठी । माझे मज पोटी बळकट दुषण ॥३॥
तुका म्‍हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटी ॥४॥
(८)
जळोत तीं येथे उपजविती अंतराया । सायासाची जोडी माझीं तुमचे पाया ॥१॥
आतां मज साह्य येथें करावे देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवुनी ॥२॥
भोगें रोगा जोडोनियां दिलें आणिकां । अरुचि ते हो कां आतां सकळलां पासूनि ॥३॥
तुका म्‍हणे असो तुझें तुज मस्‍तकी । नाही ये लौकिकीं आतां मज वर्तणें ॥४॥
(९)
न सांगतां तुम्‍हां कळों येते अंतर । विश्‍वी विश्‍वंभर परिहारचि नलगे ॥१॥
परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों एकी देत नाहीं ॥२॥
काय उणें मज येथे ठेविलिये ठायी । पोटा आलों तई पासूनियां समर्थे ॥३॥
तुका म्‍हणे अवघी आवरिली वासना । आतां नारायण दुसरिया पासूनी ॥४॥
(१०)
तुजसवें आम्‍ही अनुसरलों अबळा । नको अंगी कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥
सासुरवासा भीतों जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहोविशी लज्‍जा राखें आमुची ॥२॥
न कळतां संग झाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलाचियावरी ॥३॥
तुका म्‍हणे असतां जैसे तैसे बरवें । वचन या भावें वेचूनियां विनटलों ॥४॥
(११)
कामें नेलें चित्‍त नेदी अवलोकूं मुख । बहू वाटे दु:ख फुटों पाहे ह्रदय ॥१॥
कां गा सासुरवासी मज केले भगवंता । आपुलिया सत्‍ता स्‍वाधीनता तें नाही ॥२॥
प्रभातेची वाटे तुमच्‍या यावें दर्शना । येथे न चले चोरी उरली राहे वासनां ॥३॥
येथे अवघें वायां गेले दिसती सायास । तुका म्‍हणे नाशदिसे जाल्‍या वेंचाचा ॥४॥
(१२)
आतां कोठें धांवे मन । तुमचे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंदु ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥३॥
तुका म्‍हणे आम्‍हां जोगें । विठ्ठल घोगे खरें माप ॥४॥

॥ जय जय विठोबा रखुमाई ॥

मालिका ६

(१)
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव । म्‍हणती ज्ञानदेव तुम्‍हां ऐसें ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायीची वाहाण पायीं बरी ॥२॥
ब्रह्मंदिक जेथें तुम्‍हां ओळंगणे । इतर तुळणें कायं पुरे ॥३॥
तुका म्‍हणे नेणें युक्‍तीची ते खोली । म्‍हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
(२)
जयाचिये द्वारी सोन्‍याचा पिंपळ । अंगी ऐंसें बळ रेडा बोले ॥१॥
करील ते काय नव्‍हे महाराज । परिपाहे बीज शुध्‍द अंगी ॥२॥
जयाने घातली मुक्‍तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्‍णवांची ॥३॥
तुका म्‍हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्‍ताचिया ॥४॥
(३)
श्री पंढरीशा पतित पावना । एक विज्ञापना पायांपाशी ॥१॥
अनाथ जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रीदावळी ॥२॥
न सांगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥३॥
आळिकर ज्‍यांचे करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥४॥
तुका म्‍हणे तूचि खेळे दोही ठायी । नसेल तो देई धीर मना ॥५॥
(४)
अगाये उदारा अगा विश्‍वंभरा । रखुमाईच्‍या वरा पांडुरंगा ॥१॥
अगा सर्वोत्‍तमा अगा कृष्‍णरामा । अगा मेघ:श्‍यामा विश्‍वजनित्‍या ॥२॥
अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्व सत्‍ता धरतिया ॥३॥
अगा सर्व जाणा अगा नारायणा । करुणावचना चित्‍त द्यावे ॥४॥
तुका म्‍हणे नाही आधिकार तैसी । सरती पायांपाशी केली मागें ॥५॥
(५)
नव्‍हे दास खरा । परि हा झालासे डोगोरा ॥१॥
यासी काय करुं आतां । तू हें सकळ जाणता ॥२॥
नाहीं पुण्‍य गाठी । जें हें वेचूं कोणासाठी ॥३॥
तुका म्‍हणे कां उपाधि । वाढविली कृपानिधी ॥४॥
(६)
शंखचक्रगदाधरुं । कासे सुरंग पितांबरु । चरणी ब्रीदाचा तोडरुं । असुरावरी काढितसे ॥१॥
बरवा बरवा केशवराज । गरुडवाहन चतर्भुज । कंठी कौस्‍तुभ झळके बीज । मेघ:श्‍याम देखोनि ॥२॥
करी सृष्‍टीची रचना । नाभीं जन्‍म चतुरानना । जग हे वाखाणी मदना । ते लेकरुं तयाचें ॥३॥
कमळां विलासलीं पायी । आर्त तुळसीचें ठायी । ब्रह्मादिका अवसरु नाहीं । तो यशोदे वोसंगा ॥४॥
उपमा द्यावी कवणे अगा । चरणी जन्‍मली पै गंगा । सोळा सहस्‍त्र रमा संभोगा । नित्‍य न पुरती कामिनी ॥५॥
अधिष्‍ठान गोदातीरी । ऋध्दिसिध्‍दी तिष्‍ठती द्वारी। भानुदास पुजा करी । वाक्पुष्‍पे अनुपम्‍य ॥६॥
(७)
समर्पिली वाणी । पांडुरंगी घेते धणी ॥१॥
पुजा होते मुक्‍ताफळी । रस वोविया मंगळी ॥२॥
धार अखंडीत ओघ चालियेला नित्‍य ॥३॥
पूर्णाहुति जीव । तुका घेऊनि ठेला भाव ॥४॥
(८)
येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचें भाव ॥१॥
उंच देवाचें चरण । तेथे झाले अधिष्‍ठान ॥२॥
आघाता वेगळा । असे ठाव हा निराळा ॥३॥
तुका म्‍हणे स्‍थळ धरुनि राहिलो अचळ ॥४॥
(९)
स्‍वामीचें हें देणे । येथे पावलो दर्शनें ॥१॥
करुं आवडीनें वाद । तुमच्‍या सुखाचा संवाद ॥२॥
कळावया वर्म । हा तों पायांचाचि धर्म ॥३॥
तुका म्‍हणे सिध्‍दी । हेचि पावविली बुध्‍दी ॥४॥

॥ जय जय विठोबा रखुमाई ॥

मालिका ७

(१)
चित्‍ती तुझे पाय डोळां रुपाचें ध्‍यान । अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेचि एक तुम्‍हां देवा मागतो मी दातारा । उचित ते करा भाव जाणोनी खरा ॥२॥
खुंटले जाणीव माझे बोलणे आतां । कळों येईल तैसी करा बाळाची चिंता ॥३॥
तुका म्‍हणे आतां नको देऊ अंतर । न कळे पुढे काय कैसा होईल विचार ॥४॥
(२)
वाट पाहें वाहे निढळी ठेवूनियां हात । पंढरीचे वाटे दृष्‍टी लागलेंसे चित्‍त ॥१॥
कई येता देखन माझा मायबाप । घटीका बोटे दिवस लेखीं धरुनियां माफ ॥२॥
डावा डोळा लवे उजवी स्‍फुरतसे बाहे । मन उताविळ भाव सांडुनियां देहे ॥३॥
सुख सेज गोड चित्‍ती नलगे आनिक । नाठवे घरदार तहान पळाली भूक ॥४॥
तुका म्‍हणे ऐसा दिवस तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥५॥
(३)
पडले दुरदेशी मज आठवें मानसीं । नको नको हा वियोग कष्‍ट होताती जीवासी ॥१॥
दिन तैसी रजनी झाली गे माय । अवस्‍था लाऊनि गेला अझूनि कां नये ॥२॥
गरुड वाहाना गंभिरा येई गा दातारा । बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥
(४)
येतियां पुसें जातियां धाडी निरोप । पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥१॥
येईवो येईवो विठाबाई माऊली ये । निढळावरील कर ठेवऊनि वाट मी पाहे ॥२॥
पिवळा पितांबर गगनी झळकला । गरुडावरीं बैसोनि माझा कैवारी आला ॥३॥
विठोबाचे राज्‍य आम्‍हां नित्‍य दिवाळी । विष्‍णुदास नामा जिवेभावे ओवाळी ॥४॥
(५)
धन्‍य आजि दिन । झाले संतांचे दर्शन ॥१॥
झाली पापा तापा तुटी । दैन्‍य गेले उठा उठी ॥२॥
झाले समाधान । पायी विसावले मन ॥३॥
तुका म्‍हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ॥४॥
(६)
पंढीरीसी जावें ऐसें माझे मनी । विठाई जननी भेटे केव्‍हां ॥१॥
नलगे त्‍याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्‍वाळा आग्निचिया ॥२॥
तुका म्‍हणे त्‍याचे पाहिलिया पाय । मग दु:ख जाय सर्व माझे ॥३॥
(७)
संपदा सोहळा नावडें मनाला । लागला टकळा पंढरीचा ॥१॥
जावे पंढरीसी आवडी मनासी । कई एकादशी आषाढी यें हें ॥२॥
तुका म्‍हणे ऐसें आर्त ज्‍याचे मनी । त्‍याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
(८)
आर्त माझे पोटीं दिवस लेखी बोटीं । प्राण धरुनि कंठी वाट पाहे ॥१॥
भेटसी केधवा माझिया जिवलगा । येई गा पांडूरंगा मायबापा ॥२॥
चित्‍त निरंतर माझे महाद्वारी । अखंड पंढरी ह्रदयी वसें ॥३॥
कटी करविटे समचरण साजिरें । देखावया झुरे मन माझे ॥४॥
श्रीमुख साजिरें कुंडले गोमटी । तेथे माझी दृष्‍टी बैसलीसे ॥५॥
आसुवे दाटली उभारुनी बाहें । नामा वाट पाहे रात्रंदिवस ॥६॥

॥ जय जय विठोबा रखुमाई ॥

पुढे वाचा