(१)
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचें ॥१॥
सुखद:खसमान सकळ जीवांचा कृपाळा । ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ ॥२॥
विषयीं विरक्त जया नाहीं आपपर । सर्वदा संतुष्ट स्वयें व्यापक निर्धार ॥३॥
जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी । आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४॥
एका जनार्दनी नित्य हरिचें कीर्तन । आसनी शयनीं सदा हरीचें चिंतन ॥५॥
(२)
कर जोडोनि विनवितों तुम्हा । नका गुंतूं संसार श्रमा । नका गुंतूं विषय कामा । तुम्ही आठवा मधुसूदना ॥१॥
तुम्हीं वासुदेव वासुदेव म्हण । तुम्हीं वासुदेव वासुदेव म्हण ॥धृ॥
नरदेह दुर्लभ जाणा । शत वर्षाची गणना । त्यामध्ये दु:ख यातना । तुम्ही आठवा मधुसुदना ॥३॥
नलगे तीर्थाचें प्रभण । नलगे दंडण मुंडण । नलगे पंचाग्नी साधन । तुम्ही आठवा मधुसूदन ॥४॥
हेचि माझी विनवणी । जोडितों कर दोन्ही । शरण एका जनार्दनी । तुम्ही वासदेव म्हणा अनुदिनीं ॥५॥
(३)
वासुदेव स्मरण पापहरणाचें मूळ । तीर्थाचें माहेर ब्रम्ह व्यापक निश्चळ ।
त्रिविधताप शोषुनी रुपीं स्वरुपीं सुमंगळ ॥१॥ ओंम नमो भगवते राम कृष्ण वासुदेव ॥ धृ ॥
जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणें । तीर्थ ब्रत यम नेम नलगे दैवता धरणें ।
केशव माधव अच्युत वदतां होय पातक हरणें ॥२॥
शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग । गुदपीडन कुंडलिनी कलीमल दलभंग ।
उर्ध्व वायुचा स्वेतु तोडोनि करीं वो वनभंग ।ब्रम्हरंध्री मिसळे परि मुमुक्ष दंग ॥३॥
मनोजय वासना तोडोनि केली बीमोडी । मनपुर नगरी पाहतां दुर्गति मोडी ।
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार झोडी । अखंड परमानंद सेऊनि उभवी गुढी ॥४॥
भेदभाव तोडोनियां घेतला प्रेमाचा गरळा । शुध्दनाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा ।
हरिस्मरणाचेनी बळें अंकित केलें कलिकाळा । एका जनार्दनी अखंड सुख सोहळा ॥५॥
(४)
विषय सेवितां गा जन्ममरणाचा बाधु । विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधु ॥१॥
रामकृष्ण वासुदेव हरि ब्रम्हानंदे गळती गां । राम कृष्ण वासुदेव हरि देही विदेही झाला गा ॥२॥
गुरुवाक्य भावबळें निजबोधें पैं बुध्दि । तेणें बोधें पाहातां गा अखंड ते समाधी ॥३॥
जनीं वनीं निरंजनी वासुदेव समान । एका जनार्दनी चित्त चैतन्यघन ॥४॥
(५)
वासुदेव स्मरणें तुटती जन्ममरणव्याधी । अहं सोहं कोहं मूळ ह्या सांडीं उपाधी ॥१॥
रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा । जन्मजरा तुटे वाचे आठवित सांठवा ॥२॥
चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नादें । तेणें ब्रम्हानंद ह्रदयीं आठवण नांदे ॥३॥
एका जनार्दनी वासुदेव चिंतीतां । यम काळदूत पळती नाम ऐंकतां ॥४॥
(६)
मी वासुदेव नामें फोडितों नित्य टाहों । देखिले पाय आतां मागतों दान द्या हों ।
सांवळे रुप माझया मानसी नित्य राहों । पावन संतवृदें सादरें दृष्टि पहा हों ॥१॥
राम कृष्ण वासुदेवा । हरि राम कृष्ण वसुदेवा ॥२॥
सांडोनि सर्व चिंता संतपदीं लक्ष लागों । मुक्त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ति जागों ।
भाविक प्रेमळांच्या संगतीं चित्त लागों ॥३॥
अद्वैतेंचि चालों अक्षयी भक्तीयोग ।स्वप्नींही मानसातें नातळों द्वेतसंग ।
अद्वयानंदवेधें नावडों अन्यभोग ।अक्रियत्व चि वाहों सत्क्रियारुप बोध ॥४॥
पातां विश्व मातें निजरुप दाखवी । सत्काथा श्रवण कर्णी पीयूष चाखवी ।
रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा म्हणे बा रे घेई ॥५॥
हें दान पावलें सद्गुरु शांतिलिंगा । हें दान पावलें आत्मया पांडरुगा ।
हे दान पावलें व्यापका अंतरंगा । हें दान पावलें एका जनार्दनी दोष जाती भंगा ॥६॥
(७)
जया परमार्थी चाड । तेणें सांडावें लिगाड । धरुनी भजनाची चाड । नित्य नेम आदरें ॥१॥
सांडी मांडी परती टाकीं । वासुदेव नाम घोकी । मोक्ष येईन सुखी । नाम स्मरतां आदरें ॥२॥
रामकृष्ण वासुदेव । धरीं हाचि दृढ भाव । आणिकाचा हेवा । दुरी करीं आदरे ॥३॥
घाली संतासी आसनें । पूजा करी कायावाचा मने । एका जनार्दनी जाणे । इच्छिले तें पुरवी ॥४॥
(८)
सुखे सेऊं ब्रम्हानंदा । गाऊं रामनाम सदा । नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥
करुं वासुदेव स्मरण । तेणे तुटेरे बंधन । खंडेल कर्माचे विंदान । वासुदेव जपतांचि ॥२॥
तीर्थयात्रें सुखें जाऊ । वाचे विठ्ठल नाम घेऊं । संतासंगे सेऊं । वासुदेव धणीवरी ॥३॥
लोभ ममता दवडूं आशा ।उदर व्यथेचा वोळसा ।न करुं आणिक सायासा । वासुदेवा वांचूनी ॥ ४॥
मुख्य वर्माचे हें वर्म । येणे साधे सकळ धर्म । एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ॥५॥
(१)
गातों वासुदेव मी ऐका । चित्त ठायीं ठेवूनि भावें एका ।
डोळे झांकुनि रात्र करुं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥
राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंधी ।
सांडा वाउगियां उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदी गां ॥२॥
अल्प आयुष्य मानव देह । शत गणिलें तें अर्ध रात्र खाय ।
मध्यें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासी उरलें ते पाहें गा॥३॥
क्षणभंगुर नाहीं भरवंसा । व्हारे सावध तोडा माय आशा ।
कांही न चले मग गळां पडेल फांसा। पुढें हुशार थोर आहे ओळसा गां ॥४॥
कांही थोडा बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट ।
तन मन ध्यान द्या लावुनियां नीट । जरी असेल करणें गोड शेवट गां ॥५॥
विनवितों सकळां जना । कर जोडुनि थोरां लहानां ।
दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥६॥
(२)
बोल अबोलणे बोले । जागे बाहेर आत निजेले । कैसे घरात घरकुल केले । नेणो अंधार ना उजेडले गा ॥१॥
वासुदेव करितो फेरा । वाडीयांत बाहेर दारा । कोणी काही तरी दान पुण्य करा । जाब न घाली तरी जातो माघारा गा ॥२॥
हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे । गजर होतो बहु मोठ्याने । नाही निवडली थोर लहाने । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥३॥
मी तो वासुदेव तत्त्वतां । कळों येईल विचारारितां। आहे ठाऊका सभाग्य संतां । नाही दुजा आणिक मागता गा ॥४॥
काय जागा कीं निजलासी । सुने जागवूनि दारापाशीं । तुझ्या हितासाठी करी वसवसी । भेटी न घेसी वासुदेवासी गां ॥५॥
ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तिही केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोण कोण । गेली वासुदेवा विसरुन गा ॥६॥
(३)
रामकृष्ण गीतीं गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदे आपुलिया नाचत । निज घेऊनी फिरत गा ॥१॥
जनीं वनीं अवघा देव । वासनेचा पुसावा ठाव । मग वोळगातो वासुदेव । ऐसा मनी वंसू द्यावा भाव गा ॥२॥
निज नामाची थोर आवडी । वासुदेवासी लागली गोडी । मुखी नाम उच्चारी घडोघडी । ऐसी करा वासुदेव जोडी गां ॥३॥
अवघा सारुनि शेवट झाला । प्रयत्न न चले कांही केला । जागा होई सांडूनि झोपेला । दान देई वासुदेवाला गां ॥४।
तुका म्हणे रे धन्य त्यांचे जिणें । जिहीं वासुदेवीं घातले दान । तया न लगे येणें जाणें । झालें वासुदेवी राहणें गा ॥५॥
(४)
राम राम दोनीं अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । शेवटिचें गोड तोंचि खरें गा ॥१॥
राम कृष्ण वासुदेवा । जाणवीतसे जनासी । वाजवी चिपळिया । टाळ घाग-या घोषें गा । राम कृष्ण वासुदेवा ॥२॥
गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं यावा । न ठेवीं उरी कांही ठेवा गा ॥३॥
नीज घेऊनियां फिरती । एक वेळा जाणविती । धरुनियां राहा चित्तीं । नेघे भार सांडी कामा हातीं गा ॥४॥
सुपात्री सर्व भाव मी तो सर्व वासुदेव । जाणती कृपाळू संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठावा गां ॥५॥
शूर दान जीवे उदार । नाही वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥६॥
(५)
मनुराजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासी दोघी नारी । पुत्रपौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥
म्हणऊनि आलों या देशा । होतों नाही तरी भुललों दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येऊनि मार्ग दाविला सरिता गा ॥२॥
सवें घेऊनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।कडे चुकवूनि कांटेवन । ऐका आणिलीं ती कोण कोण गां ॥३॥
पुढें भक्तींने धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य धर्म येती ।स्थिर केली जी अचपळे होतीं । सिध्द आणूनि लाविती पंथी गा ॥४॥
केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय । धर्मे त्यांच्या देखियलें पाय । दिलें अभय दान अक्षय गा ॥५॥
होतों पीडत हिंडत गांव । पोट न भरे न राहावया ठाव ।तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बांधव गा ॥६॥
(६)
गेले टळले पहार तीन । काय निदसुरा अजून । जागे होऊनि करा कांही दान । नका ऐकोंनी झांकूं लोचन गा ॥१॥
हरि राम कृष्णा । वासुदेव जाणवितसे जना । चिपळ्या टाळ हातीं विणा । मुखी घोष नाम नारायणा गा ॥२॥
जें ठाकेल कोणा कांही । फळ पुष्प अथवा तोयी । द्या परि मीस घेऊं नका भाई । पुढे विन्मुख होतां बरें नाही गां ॥३॥
देवाकारणें भाव तस्मात । द्यावे नलगे फारसें वित्त । झालें एकचित्त तरी बहुत । येवढ्यासाठी नका करुं वाताहात गा ॥४॥
आलों येथवरी बहु सायासें । करीतां दान हेचि मागावयास । नका भार घेऊं करुं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥५॥
आतां मागुतां येईल फेरा । हें तों न धडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु भाव धरा । ओळखी नाही तरी जाल अघोर गा ॥६॥
(७)
ओले मृतिकेचें मंदिर । आंत सहा जण उंदिर ।गुंफा करिताती पोखर । याचा नका करुं अंगिकार गा ॥१॥
वासदेव करितो फेरा । तूं अद्यापि कां निदसुरा ।सावध होई रे गव्हारा । भज भज तूं शारंगधरा गा ॥२॥
बा तुझे तूं सोयरें । तुचि वडील बा धारे ।तूं तुझेनि आधारें । वरकड मिळाले ते अवघे चोर गा ॥३॥
वासुदेव फोडितो टाहो । उठी उठी लवलाहो ।हा दुर्लभ नवदेहो । म्हणे तुकयाबंधु स्वहित लवलाहो गा ॥४॥
उठ बा जागा होय पाहे वासुदेवाला । सुदिन उगवला दान आपुले घाला ॥१॥
आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥२॥
ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर । भक्तासी भय नाहीं संत संगती धर ॥३॥
संसार सार नोहे माया मृगजळ भासत । क्षणांत भ्रांती यांचा काय विश्वास ॥४॥
घे करी टाळ दिंडी हो या विठ्ठलाचा दास । सावधान नरहरी मालो चरणी निज ध्यास ॥५॥
बाबा अहंकार निशी घनदाट । गुरुवचनीं फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट ॥१॥
तिने मार्ग दाविला चोखट गा । नरहरी रामा गोविंदा वासुदेवा ॥२॥
एक बोल सुस्पष्ट बोलावा । वाचे हरि हरि म्हणावा । संत समागमु धरावा । तेणें ब्रम्हानंद होय आघवा गो ॥३॥
आला शीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झालें या शरीरा । फिटला पातकांचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा ॥४॥
अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभवें तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळु गा ॥५॥