संत श्रीपादबाबांचे कीर्तन [१]

महाराष्ट्रातील राहूरी कृषीविद्यापीठ,जिल्‍हा अहमदनगर या ठिकाणी भक्‍तीप्रेमाचा आनंद लुटता यावा यासाठी भव्‍य वैष्‍णव मेळावा साधकांनी आयोजीत केला होता.त्‍यामध्‍ये जन्‍ममरणाच्‍या फे-यातून सुटता यावे व अत्‍यंतीक दु:खाची निवृत्‍ती व्‍हावी यासाठी कीर्तनाद्वारे संत श्रीपाद बाबा यांनी दिलेला अमोलीक संदेश व मार्गदर्शन.

कीर्तनासाठी घेतलेला संत ज्ञानेश्वरांचा अभंग :-
एक नाम हरी द्वेतनाम दुरी । अद्वेत कुसरी विरळ जाणे॥१॥
समबुध्‍दी घेता समान श्रीहरी । शमदमा वैरी हरी झाला॥२॥
सर्वाघटी राम देहादेही एक । सुर्य प्रकाशक सहस्‍त्ररश्‍मी ॥२॥
ज्ञानदेवा चित्‍ती हरीपाठ नेमा । मागिलीया जन्‍मा मुक्‍त झालो॥४॥

तुम्‍हा संताच्‍या सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानेश्‍वर माऊलींचा असून या अभंगातून माऊली अद्वेतरुपाने व समानतेने नटलेल्‍या देवाचे व जगाचे वर्णन करतात.परंतु एक शेवटी एक गोष्‍ट ठरविली आहे की, मी या जन्‍म मरणाच्‍या फे-यातून सुटू शकतो.
ज्ञानदेव चित्‍ती हरीपाठी नेमा । मागिलीया जन्‍मा मुक्‍त झालो.॥
माणसाला जन्‍म कां घ्‍यावा लागतो तर वासनेमुळे
जन्‍म घेणे लागे वासनेच्‍या संगे । तेची झाली अंगे हरीरुप॥

वासनेचं परीवर्तन करायला किती वेळ लागतो.चांगला विचार केला तर सोपे आहे.पण रित कळली तर. प्रत्‍येक माणूस देवाची भक्‍ती करतो. पण जन्‍म मरण टाळण्‍यासाठी.
किती वेळा जन्‍मा यावे । कीती व्‍हावे फजीत॥
मग शरण जाण्‍याचा विचार कोणी करावा. जाणत्‍याने की नेणत्‍याने. जाणत्‍याने. मग विचार सांगतात कां, तर नाही.
हरीप्राप्‍तीशी उपाय । धरावे संताचे ते पाय॥तेणे साधती साधने । तुटतील भवाची बंधने॥
माणसाला पहील्‍या नंबरचे भय मरणाचे आहे, इथे तर – "मरुन गेले बकदालभ्‍य, भ्रशुंडी, सारखे । चौदा चौकडया लंकापती तेही गेले भेंडया कातरीत"
येथे नाही उरो आले अवतार । येर ते पामर जीव कीती ।
विचार करायला पाहीजे , विचार करण्‍याची रीत. सामान्‍य पीक काढायचे म्‍हणजे जमीनीला पाळी घातली पाहीजे,मग तुम्‍हाला आम्‍हाला यातून जन्‍म मरणाच्‍या फे-यातून सुटायचे तर काही साधन नको का करायला.
तेणे साधती साधने । तुटती भवाची बंधने॥
मरणाच्‍या भयातून सूटका साधूसंतांनी केली, कशी म्‍हणाल तर
बीज भाजून केली लाही । आम्‍हा जन्‍म मरण नाही॥
माणसाला रीत सांगण्‍याची गरज आहे. त्‍यासाठी देवाला शरण गेले पाहीजे. देव समजण्‍यासाठी भाव पाहीजे.
भावबळे आकळे ये-हवी ना कळे । करतळी आवळे तैसा हरी॥
कुठे आहे तर –
आत हरी बाहेर हरी । हरीने कोंडीले घरी॥
हरी आला हाता । मग कैची भय चिंता॥
तुका म्‍हणे हरी । काही ऊरु न दे ऊरी॥

मग जेवण का म्‍हणा म्‍हणीचा विषय आहे, नाही. तर मग परमार्थ म्‍हणा म्‍हणीचा चालेल का,
या पोटा कारणे गा शिणलो येरझारी । न मिळेची दाता कोणी जन्‍म दु:ख निवारी ।
कीर्ती हे संतामुखी तो मज दाखवा हरी । पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी॥

पहा देव वाट पाहून राहीला, पण देवाकडे कोणी जातच नाही.
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ॥
देवाकडे कां जात नाही, तर दोष आहे म्‍हणून. नाम व देव एकच आहेत. नाम घेता वदनी दोष जाती ।
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥
नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥
पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥

मग आता नाही कां आजही तसेच आहे. नामामध्‍ये आजही तशीच पावर आहे.
न सरे लुटीता मागे बहुता जणी । जुनाट हे खाणी उघडली॥१॥
सिध्‍द महामुनी साधक संपन्‍न । जिही हे जतन केले होते॥२॥
पायाळूच्‍या गुणे पडले ठाऊक । जगा पुंडलीके दाखवीले॥२॥
तुका म्‍हणे तेथे होतो मी दुबळा । लाधले कपाळा थोडे बहु॥४॥

आयुष्‍याचा गॅरंटी पास कोणाजवळ आहे का.

क्षणभंगूर नाही भरवसा । व्‍हा रे सावध तोडा माया आशा ।
इथे कोणाचाही भरवसा नाही,

अल्‍प आयुष्‍य माणव देह । शत गणीले अर्ध रात्र खाय॥मध्‍ये बालत्‍व पिडा रोग क्षय । काय भजनाशी उरले ते पाही गा॥राम राम स्‍मरा आधी । ......
अगोदर करायला पाहीजे मग आम्‍ही करतो का.आमची अशी म्‍हातारपणाची अवस्‍ता होते तरी कळत नाही. अहो सांगणा-यालाच कळत नाही तर ऐकणा-याला कधी कळेल. कुणाला कळेल तर ज्‍याने समन्‍वय घातला आहे त्‍याला. माऊली म्‍हणतात समन्‍वय घालण्‍याचा ज्‍यांचा प्रयत्‍न असेल त्‍याचेकडेच देव गेलेत.

एक नाम हरी द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे॥

वास्‍तवीक पाहता नाम, देव, व नाम घेणारा एकच आहे.

जिसकी उसकी टेक । सबकी निशाणी एक॥
एक उदाहरण सांगतो पहा गणपतीचे वाहन उंदीर आहे. पण मांजर उंदराला गटट करते. येथे कर्म वेगवेगळे आहे, म्‍हणून मांजर उंदराला खाते. पण अधिष्ठान मात्र एकच आहे. कर्माचा विचार येथे समजला पाहीजे. अधिष्‍ठानाचा विचार येथे समजला पाहीजे व ते कळले पाहीजे. पाप पुण्‍य सम झाले म्‍हणजे मृत्‍युलोकात जन्‍म होते.

पाप पुण्‍य समान समी । तरीच पाविजे कर्मभूमी॥
बहूत सुकृते नरदेह लाधला । भक्‍तीवीण गेला अधोगती॥


चौथ्‍या अध्‍यायात कर्म जाणून कशी कर्मे केली जातात ते सांगितले.

मागील मुमूक्ष जे होते । तीही ऐसीया जाणेनी माते । कर्मे केली समस्‍ते । धनुर्धरा॥
मग इथे कांय करायचे तर परीवर्तन करायला पाहीजे, बदल करायला पाहीजे. चांगला विचार केला तर सांगणा-याने नीट सांगीतले तर अवघड काही नाही. आमच्‍या महाराजांचा फैसला झाला.

आजी फिटले माझे कोडे । बहुत जन्‍माचे साकडे॥कोंदाटले पुढे । परब्रम्‍ह सावळे॥
हे सर्व कशाने घडेल तर अलींगने संताचीया । दिव्‍य झाली माझी काया । किंवा पुण्य फळले बहुता दिसा । भाग्‍य उदयाचा ठसा । झालो सन्‍मूख तो कैसा । संत चरण पावलो॥

हे सर्व अनुभवाचे की नुसते म्‍हणा म्‍हणीचे, अनुभवाचे बोल आहेत, आमचाही अनुभव आहे. याला धर्म प्रवर्तकांनी नांवे ठेवावीत कां, तर नांव ठेवतात. कारण त्‍यांना रीत कळली नाही. त्‍यासाठी

दिली इंद्रीये हात पाय कान । डोळे मुख बोलाया वचन ।
तेणे तू जोडशी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥


राम अवतरामध्‍ये प्रभूच्‍या नावांने दगड तरले. मग देवाच्‍या नामाने माणसे तरणार नाहीत काय.

ज्ञानेदव म्‍हणे तरलो तरलो । साच उध्‍दरलो गुरुकृपे॥

साधू संतांचे कार्य जगाला तारावयाचे आहे. धर्माचा जीर्णोध्‍दार करण्‍यासाठीच संत अवतार घेतात.

धर्माचे पालन करणे पाखंड खंडण । हेची करणे आम्‍हा काम बीज वाढवावे नाम॥

चांगला विचार केला तर अवघड नाही, पण रीत कळली पाहिजे. रीत कळत नाही म्‍हणून अवघड आहे. प्रभूने दगड तारले. समुद्र मंथनाचे वेळी विष निघाले. विष कोणी घेईन,शंकराने ते प्राशन केलें व देहाची लाही लाही झाली.सर्व उपाय केलें पण दाह काही कमी होईना.तेंव्‍हा भगवान शंकराने नामच घेतले.

शिव हलाहले तापला । तोही नामे शितल झाला॥

तुम्‍ही आम्‍ही सुध्‍दा त्रिवीध तापाने तापलो आहोत. त्‍यासाठी देवाचे नामच घेतले पाहीजे.

आला शीतल शांतीचा वारा । तेणे सुख झाले या शरीरा॥
फिटला पातकांचा थारा । कळीकाळीशी धाक दरारा गा॥


नामामध्‍ये किती पावर किती पावर तर पापाचे कळप पळती पुढे.

हरी उच्‍चारणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे॥

विषय व विषयाचे प्रयोजन कळले पाहीजे. वेगळे नाही पण शिकले पाहीजे. वडाच्‍या झाडाची रुई कानसीचा तुकडा घेऊन चकमक केल्‍यास पेटणार नाही का. रोख का उधार, परमार्थ रोखीचा का उधारीचा.

ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ । भरला घनदाट हरी दिसे ।

भरला घनदाट हरी दिसे आता नाही कां,आता भी तसच आहे,काही फरक झालेला नाही.पण रित कळत नाही. रित कळली तर फार सोप आहे.
नाम उच्‍चारीता कंठी । पुढे उभा जगजेठी॥
ऐसे धरोनीया ध्‍यान । मनी करावे चिंतन॥
चिंतन जर केले तर चिंतन चित्‍ताला । लावी मनाच्‍या मनाला॥
उन्‍मनीच्‍या सुखा आत । पांडूरंग भेटी देत॥


मग उन्‍मन अवस्‍था हाधी नको व्‍हायला. मग उन्‍मनीच्‍या सुखाआंत । पांडूरंग भेटी देत॥

ऐसा आहे श्रेष्‍ठाचार वेद शास्‍त्राचा आधार॥मग वेदशास्‍त्रे खोटे आहेत कां.कोणाचे पांच गेले कोणाचे दहा गेले,कुणाचे पंचवीस गेले.काही आले तसे गेलेत.पण कळले नाही,रीत नाही समजली तर घोटाळाच इथून तीथून.

तुका म्‍हणे ठाया । जाय आल्‍या आपुलीया॥

प्रत्‍येकाला इथे अधीकार आहे.मात्र रीत समजावून घेतलीच पाहीजे.देवाचे नाम हेच परमार्थाचे साधन आहे.

नामापरते साधन नाही । जे तू आणीक करशी काही॥
हेची आम्‍हा करणे काम । बीज वाढवावे नाम॥ म्‍हणून
संताचे सगती मनो मार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे॥
पण एकच ज्ञानदेव म्‍हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे॥


हरीपाठ पाठ करुन कळेल कां,तर मुळीच नाही.प्रभू रामचंद्रांच्या‍या सत्‍तेने दगड तरले मग माणसं तरायला नको कां,

भवनदीचे पाणी गडया रे भरपूर ओढीचे । भले भले पोहणारे आसडून पाडीते॥
येथे एकच लीला तरले । जे सर्वभावे मज भजले । तया ऐलथडीचं सरले । मायाजळ॥


आमच्‍या जवळ अनुभव आहे.बाकी ही तर भानामती आहे म्‍हणतात.त्‍याला सर्व भाव म्‍हणतात. मग भाव म्‍हणजे काय,उदा पहा –आई लहान मुलाला घरी ठेवून शेतात गेली.तिकडे दुपारी मुल उठले व रडू लागले,तर इकडे शेतामध्‍ये आईला पान्‍हा फुटला.आई म्‍हणते मला घरी गेल पाहीजे.

पाजी प्रेम पान्‍हा । मुखी घालूनीया स्तना॥

म्‍हणून आई – लेकरु व्‍हायला पाहीजे तरच कळेल. हे कळण्‍याची योग्‍यता सर्वांचीच आहे,पण रीत कळली तर--

तृण अग्‍नी मेळे समरस झाले । तैसे नामे केले जपता हरी॥
जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांशी शिकवावे । शहाणे करुन सोडावे । सकळ जन॥

इथे नाम घेण्‍याचा अधीकार सर्वांना आहे, पण

एक नाम हरी द्वेतनाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे॥अद्वेत म्‍हणजे काय.

दृष्‍ठांत सांगतो भजन करा.कवडयाचा टोपीवाला दारात असतो. दुसरा गल्‍लीत असतो, कवडयावाला दान मागतो व खानाखुना करतो.गल्‍लीतला बरोबर ओळखतो,तुकाराम बाबाच्‍या नावाने दान पावलं.पंढरपूरच्‍या विठोबाला दान.आळंदीच्‍या ज्ञानोबाला दान. नगद खिशात, उधार तीकडे.ही नाव जिक्‍याची विद्या शिकायची असेल तर त्‍यांची भांडी नको का घासायला.हया गोष्‍टी कदाचीत सर्वाना कळणार नाहीत.जमणार नाही,पण नाम घ्‍यायला व समजायला सर्वांना अधिकार आहे.

नित्‍य नेम नामी ते प्राणी दुर्लभ । लक्ष्‍मी वल्‍लभ तया जवळी॥

माऊलीने केव्‍हढी क्रांती केली पहा,

जे कां रंजले गांजले । त्‍यास म्‍हणे जो आपुले॥तोची साधु ओळखावा।देव तेथेची जाणावा॥

नामाचा प्रचार केला व जीवाला मुक्‍त केले.

जयाने घातली मुक्‍तीची गवांदी । मेळवीली मांदी वैष्‍णवांची॥
उभारीला ध्‍वज तीही लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ती ज्‍याची॥


पहा इतके सोपे आहे इतके सोपे आहे –

तुका म्‍हणे सोपे आहे सर्वाहुनी । शहाणा तो धनी घेत असे॥
हरी मुखे म्‍हणा हरी मुखे म्‍हणा । पुण्‍याची गणना कोण करी॥
देवाचीये द्वारी उभा क्षण भरी । तेणे मुक्‍ती चारी साधीयेल्‍या॥


पण एकच पाहीजे नित्‍य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्‍मी वल्‍लभ तया जवळी ॥ आजही नामामध्‍ये तेवढीच ताकद आहे. कीती म्‍हणाल तर सांगतो भजन करा. एक छोटीशी नळी सुध्‍दा रॉकेलची गाडी रिकामी करते. माऊली हरीपाठात सांगते,

ज्ञानदेव पुसे निवृत्‍तीसी चाड । गगनाहूनी वाड नाम आहे॥
सत्‍य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण । नाही रुप वर्ण गुण तेथे ।
तो हा रे श्रीहरी पाहीला डोळे भरी । पाहता पाहणे दुरी सारोनिया॥


ती वस्‍तू मीच आहे मग कसे पाहू.वस्‍तू व पहाणारा एकच आहे.साधकाला प्रबोध दिल्‍यावर तो जगभर नाही कां,

तुझे आहे तुज पासी । परी तु जागा चुकलासी॥
मना वचना अगोचर । बुध्‍दीसी न कळे ज्‍याची मेर । दृष्‍टी दावीजे साक्षात ।
हाती देईजे पदार्थ । तैसा नव्‍हे परमार्थ । तोही सदगुरुनाथ प्रबोधी शिष्‍या॥


करुनी प्रबोध संत पार उतरले । मग ज्ञानेश्‍वर महाराज म्‍हणतात

हे विश्‍वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहूना चराचर । आपणची जाहला॥
तो मी वैकुंठी नसे । एक वेळ भानू बिंबीही न दिसे । परी योगीयाचे मानसे । उमरडोनी जाय॥
परी तयापाशी पांडवा । मी हरपलो गिवसावा । जेथे नामघोष बरवा । करीती माझा॥
कृष्‍ण विष्‍णु हरी गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध । माझी आत्‍म चर्चा विषद । उदंड गाती॥


तुम्‍ही जगभर का तुमच्‍या पुरते – तर तुम्‍ही जगभर आहाता.

आम्‍ही नाही आधी मधीचे । आम्‍ही देवाच्‍याही आधीचे॥
आधी मध्‍य अंती । अवघा हरी एक । एकाचे अनेक हरी करी॥


इथे अनुभव पाहीजे. दिसायला दिसत नाही पण अनुभव आहे.

तुका म्‍हणे येथे अनुभव प्रमाण । शब्‍दाचे गौरव कामा नये॥

तुमचा आपला अनुभव आहे. तुमचा आमचा प्राणच भजन करतो.

आता नाही येणे जाणे । सहज खुंटले बोलणे॥

मग तुम्‍ही कोणामुळे जिवंत आहात.

चाले हे शरीर कोणाचीये सत्‍ते । कोण बोलवीते हरीवीण ।
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नका ।


आमचा अनुभव आहे, सांगता येईल कां. नाही. जावे त्याच्या वंशा तेव्‍हा कळे ।

पाण्‍यामध्‍ये मासा झोप घेई कैसा । जावे त्‍याच्‍या वंशा तेव्‍हा कळे॥म्‍हणून
एक नाम हरी द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे॥


बंध जो आहे तो गेला व मोक्ष झाला.

जाणीव नेणीव भगवंती नाही । हरी उच्‍चारणी पाही मोक्ष सदा॥

बंध म्‍हणजे मी देह आहे.मोक्ष म्‍हणजे मी आत्‍मरुप व अज्ञान म्‍हणजे चांगदेव.ज्ञान म्‍हणजे मुक्‍ताबाई

सुख पहाता जवा पाडे । दु:ख पर्वता एवढे॥
धरी धरी आठवण । मानी संताचे वचन॥


संतवचन आज खोट आहे कां, नाही तर आजही तसेंच आहे.

संत संज्‍जनांनी घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवी तरे॥

त्‍याचा जो संबंध आहे. अमलात आणला तर शरीरावर परीणाम होतो.

समबुध्‍दी घेता समान श्रीहरी । शमदमा वैरी हरी झाला ॥

पाहुण सांगा मग आता आपली बुध्‍दी सम कां विषम.सांगणा-याची बुध्‍दी विषम असेल तर मेळ बसेल. विचाराने गेले तर आकाश सम कां विषम, वायु, पाणी, पृथ्‍वी सम का विषम, आत्‍मा सम का विषम. तर सम होय. सम बुध्‍दी नसेल तर –

वर वर भजन करुनी काही । नाचायाची एकच घाई । उडती तटतट रे तटतट ।
चल मना शोध कर झटझट । नाहीतर अवघीच लटपट ॥


सुर्य उगवल्‍या बरोबर प्रकाश. हा सुर्य का जयद्रथ. समबुध्‍दीसाठी समचाच विचार करायला पाहिजे. महाराष्ट्रात तुमची आमची बुध्‍दी सम आहे.बाकीच्‍यांची नाही.समबुध्‍दी म्‍हणजे काय.कपडे सरकीमध्‍ये नव्‍हते काय.

कापसाच्‍या पोटी । काय कापडाच्‍या होत्‍या गाठी। तो वेठीतयाच्‍या दिठी कापड झाला॥
जगामध्‍ये ब्रम्‍ह दिसे उघडे । एकच धागा नानापरी कपडे । चोळी आणी लुगडे ।


विष्णुमय ‍जग वैष्‍णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥ फक्‍त निश्‍चय करायला पाहीजे.व निश्‍चय बुध्‍दी करायला पाहीजे.

बुध्‍दीचे वैभव अन्‍य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्‍दी॥
सिध्‍दी बुध्‍दी धर्म हरीपाठी आले । प्रपंची निमाले साधुसंगे ॥

बुध्‍दी निश्‍चय आत्‍मज्ञान । ब्रम्‍हरुप भावी आपणा आपण । ब्रम्‍हनीष्‍ठा राखे पुर्ण । तत्‍परायण अहर्नीशी॥ऐसे व्‍यापक ज्ञान भले । जयांच्‍या हृदयी गिवसीत आले । तयासी समता दृष्‍टी बोले । विशेषू काही ॥ पहा आपली सम बुध्‍दी आहे कां.तर नाही.समबुध्‍दी करण्‍यासाठी फक्‍त मनुष्‍य जन्‍मच आहे. –
पशू का होत पन्‍हैया । नर का कुछ ना होय । एक बार करनी करे । सो नर का नारायण होय॥
बीज लावतो बाभळीचं व इच्‍छा करतो आंब्‍याची जमणार नाही. केले कर्म झाले । तेची भोगा आले । उपजले मेले ऐसे कीती॥
मग काय करायला पाहीजे. --- भरला घनदाट हरी दिसे ।
ज्ञानदेव पाठ हरी हा वैंकुठ । भरला घनदाट हरी दिसे॥
त्‍यासाठी साधुसंताच्‍याच संगतीने जायला पाहीजे. मार्ग दाऊनी गेले आधी । दया निधी संत ते ॥ तेणेची पंथे चालू जाता । न पडे गुंता कोठे काही ॥ शमदम म्‍हणजे मनोनिग्रह व इंद्रीये दमन.कासव पाहीजे तेंव्‍हा इंद्रीये आत घेते व बाहेर काढते.घराला कडी लावून झोपतात.तुम्‍हाला कडी लावायचे कळले, बरं झाल.
तुका म्‍हणे किल्‍ल्‍या । हया तो संता हाती दिल्‍या ॥
मी व देव वेगळा आहे ही विषमता आहे.
ओंकार प्रणव उच्‍चार । होय साचार आत बघ कैसा ।
मां शब्‍ध अवांगमय । तो मी तो मी ऐसा ।
वरी वरी मेघ अंबरी । उठोनी सागरी मावळती ।
ही उपमा घेता । वृती तुला त्‍या कळती ॥

तुमचा उगम आईच्‍या पोटातून का देवा जवळून.देवाशी संबंध होता,पण नाळं खांडलं व देवाला विसरला बर झाल तुम्‍ही परत देवाशी संबंध संताच्‍या कृपेने जोडला.

काय वर्णू आता न पुरे ही वाणी । मस्‍तक चरणी ठेवितसे॥
तुकोबाराय अनुभव सांगतात. – उजळले भाग्‍य आता । अवघी चिंता वारली॥
संत दर्शनी हा लाभ । पद्मनाभ जोडीयेला॥


कल्‍पना बाद केली.समजूत बाद केली.सगळा घोटाळा कल्‍पनेमुळे आहे. कल्‍पना अवीद्या येणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलियेले । आणि म्‍हणून,सांडी आता कुडी कल्‍पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥ इथे करायचे काय तर कल्‍पना बाद करायची व इंद्रीयाचे पहीले वळण बाद करुन त्‍याला परमार्थीक वळण लावायचे आहे.
पडीले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाही दुजा॥
तेणे भ्रांतीपासून हिरतले । गुरुवाक्‍ये मन धुतले । मग आत्‍मस्‍वरुपी घातले । हारोनिया॥

इतर योनीच्‍या ठायी हा विचारच नाही । यासाठी एकच उपाय संताविण प्राप्‍ती नाही । ऐसे वेद देती ग्‍वाही ॥ तेंव्‍हाच समबुध्‍दी होईल.
समबुध्‍दी घेता समान श्रीहरी । शमदमा वैरी हरी झाला॥
समबुध्‍दी कांय तर देव कोठे नाही. –
वैकुंठ कैलासी तिर्थक्षेत्री देव । तयाविण ठाव रिता कोठे॥
खांबावरी लाथ मारीली दुर्जने । स्‍तंभी नारायण प्रगटला॥

असे कळले तेव्‍हा समबुध्‍दी होईल; समबुध्‍दी होईल. तेंव्‍हा
वैराग्‍याच्‍या शेणी लागल्‍या शरीरा । ज्ञानाग्‍नी चेतवीला ब्रम्‍हत्‍वेशी॥
त्‍यानंतरच जे जे दृष्‍टी दिसे ते ते हरीरुप । पुजा ध्‍यान जप त्‍यासी नाही॥

तुकाराम महाराज म्‍हणतात
अणू रेणू या थोकडा । तुका आकाशा ऐवढा॥
हे समजून घेण्‍याचा अधिकार सर्वांनाच आहे.
सकळांशी येथे आहे अधिकार । कलीयुगी उध्‍दार हरीच्‍या नामे । तुका म्‍हणे सोपे आहे सर्वांहुनी । शहाण तो धनी घेत असे ॥१॥
देव सदा जवळीच असे । यालागी जन कैसे पिसे ।
पाहो जात देशोदेशे । ज्‍याला समजले तो गदगदा हासे॥

असा देव समजावून घेऊन काय केलं पाहीजे तर
साठवीला हरी । जेणे हृदय मंदीरी । त्‍यांची सरली येरझार । झाला सफल व्‍यापार॥
वस्‍तु तयार आहे पण कळली पाहीजे
जैसे दुधात लोणी । तैसा देही चक्रपाणी ।
तैसा हृदयामध्‍ये मी रामु । असता सर्व सुखाचा आरामू ।
का भ्रांताशी कामु । विषयावरी ।

काळ वेळ नाम उच्‍चारीता नाही । दोन्‍ही पक्ष पाही उध्‍दरती ।

भजन घेऊया
‘जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई'

सर्वाघटी राम देहादेही एक । सुर्यप्रकाशक सहस्‍त्ररश्‍मी॥
आत्‍मतत्‍व जसे आहे तसेच आहे.माणूस मेला तरी आत्‍मा कधी मरत नाही, तो अमर आहे.तर काय होते तर काल जातो.सुर्य रात्रीचे वेळी दिसत नाही मग सुर्य नाही काय.सुर्य आहेच फक्‍त कालगतीमुळे असे होते. आपल्‍यालाही कालगतीच आडवी आलेली आहे. त्‍यासाठी एकच
नको नको मान नको अभिमान । सोडी मी तु पण तोची सुखी॥
आमचे मी तू पण गेलेच नाही,म्‍हणून कळत नाही.फुले अनेक आहेत,पण एकच धाग्‍यात जोडली आहेत.सर्वांमध्‍ये एकच धागा आहे.तुम्‍ही हार घातले ना,हा हार काय म्‍हणतो बुवा नम्रतेने राहा व नम्रतेने सांगा।कारण सर्वांना एकच सुर्य,सर्वांना आत्‍मा एकच आहे,मी मोठा कीर्तनकार,प्रवचनकार हा अभिमान धरु नको कारण
सर्वाघटी राम देहा देही एक । सुर्य प्रकाशक सहस्‍त्ररश्‍मी॥
जरी कल्‍मशाचा आगरु । तू भ्रांतीचा सागरु । व्‍यामोहाचा डोंगरु । होऊनी अससी ।

रित आत पाहीजे वर वर नको. ही झाली आत मात । विश्‍वात सर्वाठायी । मग ते चैतन्‍य तुझे अनुभवास येई॥ तुकाराम महाराज म्‍हणतात मी खुप सांगतो पण कुणी ऐकत नाही.
वाजतसे बोंब कोणी नाईके कानी । पण ज्ञानेश्‍वर माऊलींनी अमलात आणले ते म्‍हणतात
ज्ञानदेव चित्‍ती हरीपाठ नेमा । मागीलीया जन्‍मा मुक्‍त झालो॥
जन्‍म घेणे लागे वासनेच्‍या संगे.वासनेचे परीवर्तन करण्‍यासाठी आपला जन्‍म आहे.संताच्‍या कृपेने परीवर्तन झालं म्‍हणून ते म्‍हणतात.
काय उतराई व्‍हावे कवण्‍या गुणे । जन्‍मा नाही येणे ऐसे केलें॥
बीज भाजून केली लाई । आम्हा जन्‍म मरण नाही । हे कशामुळे घडले तर संतामुळे संतचरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळोनी जाय ।
यासाठी काय करावे लागेल तर देवाचीये द्वारी । उभा क्षण भरी । तेणे मुक्‍ती चारी साधीयेल्‍या ।
हरी मुखे म्‍हणा हरी मुखे म्‍हणा । पुण्‍याची गणना कोण करी ॥ निव्‍वळ पुण्‍य व्‍हायला पाहीजे. तुका म्‍हणे आम्‍ही झालो अग्‍नीरुप । लागो नेती पाप पुण्‍य अंगा ॥ वासनेत बदल करावयाचा आहे. -- तुका म्‍हणे महापातकी पतीत । होती जीवनमुक्‍त हेळा मात्रे ।
त्‍यासाठी अद्वेत वाट माहित पाहीजे.आमच्‍या माऊलींनी अद्वेत वाट जाणली,आमलात आणली व आपल्‍या सर्वांसाठी ती अद्वेत वाट मोकळी केली.कळकळीने सांगीतले की,याच अद्वेत वाटेने गेला तर मुक्‍त व्‍हाल. – नाहीतर
निघुन गेला वारा । खाली राहीला पसारा ।
त्‍या मारुलींच्‍या चरणी सेवा समर्पीत करु या.

ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

बोलीली लेकुरे वेडी वाकुडी उत्‍तरे । करा क्षमा अपराध । महाराज तुम्‍ही सिध्‍द । नाही विचारीला अधिकार मी आपुला । तुका म्‍हणे ज्ञानेश्‍वरा । राखा पाया पै किंकरा॥

ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
पुंडलीक वरदे हरी विठठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.

पुढे वाचा