१] मार्गदर्शक कसा असावा

एका प्रवाशाला एका गांवातून दुस-या गांवाला जात असताना मध्‍यंतरी नदीपार करुन जावयाचे होते.परंतु नदीपात्र व पाण्‍याबाबत त्‍याला काहीही माहिती नसल्‍याने तो इतर प्रवाशांना नदी पार करुन जाण्‍याबाबत मार्गदर्शन विचारतो.पुढे जाता जाता पहील्‍या प्रवाशाला विचारले-तो सांगतो सरळ १० हात वरच्‍या बाजूने पुन्‍हा १५ पावले सरळ पुढे जा नंतर पुन्‍हा वरच्‍या बाजुने पुढे जा आणि नंतर थोडे उजव्‍या बाजूला १०पावले सरळ गेल्‍यानंतर आपण नदीपात्र पार करुन जाऊ शकाता.हे ऐकल्‍यानंतर त्‍यांने सांगणा-याचे बारकाईने निरीक्षण केले तर तो आंधळा दिसत होता.त्‍याचेवर विश्‍वास बसेना म्‍हणून त्‍याला त्‍याने विचारले तू आंधळा आहे काय तर केंव्‍हा पासून आहे,तर त्‍याने जन्‍मांधच आहे, असे म्‍हटल्‍यावर प्रवाशाने त्‍याच्‍यावर विश्‍वास न ठेवता पुढे चालत राहीला.दुस-याला नदीतून पलीकडे जाण्‍याचा सल्‍ला विचारला, त्‍यानेही त्याला तसाच सल्ला दिला.त्‍याचेकडे पाहीले तर तो पांगळा असल्‍याचे दिसले,त्‍याला विचारले तू नदीपार करुन गेला कां? तर नाही, मी दुस-याच्‍या खांदयावर बसून पलीकडे गेलो आहे. यावरही त्‍याचा विश्‍वास बसेना.नंतर त्‍याने पुन्‍हा तिस-या प्रवाशाला विचारले.त्‍यांने सांगीतले की,मलाही पलीकडील गांवी जायचे आहे.चला तुम्‍हाला मी बरोबर घेऊन जातो.त्‍या प्रवाशाला आनंद झाला व मार्गदर्शकही मिळाला व इच्‍छीत मुक्‍काम गाठता आला.

सिध्दांत - प्रत्‍येक नरदेहरुपी काठावरील जीवाला जन्‍म- मरणरुपी भवनदी पार करुन जावयाचे आहे.त्‍यासाठी जो पैलतीराला गेला आहे त्‍याचा अनुभव व मार्गदर्शनाची गरज जीवाला आहे. ज्‍याला फक्‍त शास्‍त्राचे ज्ञान आहे,तो श्रोतीय आहे पण ब्रम्‍हज्ञानी नाही तो आंधळा.दुसरा ब्रम्‍हज्ञानी आहे पण श्रोतीय नाही तो पांगळा.हे दोघेही जन्‍ममरणरुपी नदी पार करुन गेले नसल्‍याने अशांच्‍या मार्गदर्शनाने आपण जन्‍ममरणरुपी भवनदी पार करु शकणार नाही.तर श्रोतीय व ब्रम्‍हज्ञानी महात्‍म्‍यांच्‍या मार्गदर्शनाने जीव नि‍श्‍चत हे साध्‍य करु शकतो.

प्रमाण - १} मंत्र तंत्र उपदेशीती । घरोघर गुरु आहेत आयते । परी शिष्‍याते मेळवी सदवस्‍तूते । श्रीकृष्‍ण तयाते सदगुरु मानी ॥
२} जो शब्‍दज्ञाने पारंगतु । ब्रम्‍हांनदे सदा डुल्‍लतु । शिष्‍य प्रबोधी समर्थु । यथोचितु निजभावे-॥


२] माकडाला सापडलेला नारळ

नारळाच्‍या बागेत माकड उडयामारत खाण्‍यासाठी शोधत असता त्‍याला एक नारळ भेटला.तो घेतला व त्‍यात काहीतरी आवाज येतो म्‍हणून हे काही तरी खाण्‍याची वस्‍तू आहे असे समजून ते पहाण्‍यासाठी नखाने नारळाच्‍या शेंडया काढल्‍या.नारळाची कठीण कवटी नखाने काढण्‍याचा प्रयत्‍न करताना बोटांची नखे रक्‍तभंबाळ झाली पण त्‍याला काय आहे ते कळले नाही.मग ते माकड हताश होऊन एका झाडाचे फांदीवर बसले.बाजूच्‍या रस्‍त्‍याने एक प्रवाशी जात असता त्‍याला तो नारळ भेटला त्‍याने तो दगडावर आपटून त्‍यामधील पाणी ‍पीले, खोबर खात खात रस्‍त्‍याने निघून गेला.हे माकडाने पाहीले व युक्ती त्‍याच्‍या लक्षात आल्‍यावर त्‍याने इतरत्र पडलेले नारळ घेतले, त्‍याच्‍या शेंडया काढल्‍या दगडावर आपटले त्‍यातील पाणी पिऊन खोबरे खाण्‍याचा आनंद घेत व पोटही भरले.

सिध्‍दांत - परमार्थ करत असताना त्‍याची रीत माहिती असणे आवश्‍यक आहे.अन्‍यथा व्‍यर्थ कष्‍ट पडून भक्‍तीचा आनंद मिळणार नाही.

प्रमाण - १} तुका म्‍हणे सोपे आहे सर्वांहूनी । शहाणा तो धनी घेत असे ॥
२} तुका म्‍हणे नेणो युक्‍तीचीया खोली । म्‍हणोनी ठेवीली पाय डोई ॥


३] नुसतं शिक्षण किंवा ज्ञान महत्‍वाचं नाही

एक कोळयाच्‍या मुलाचे शिक्षण नसल्‍याने तो समुद्र काठी होडी वल्‍लवण्‍याचा धंदा करत. रोज समुद्र काठावर येणा-या पर्यटकांना होडीत बसून त्‍यांना समुद्रात घेऊन फेरफटका मारत. त्‍यातून त्‍याचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह होत.एक दिवस समुद्रात फेरफटका मारण्‍यासाठी तीन व्‍यक्‍ती त्‍याच्‍या होडीमध्‍ये बसल्‍या.त्‍यांना होडीत घेऊन तो समुद्रात निघाला. त्‍यापैकी एक डॉक्‍टर, दुसरा वकील व तिसरा इंजीनियर होते.प्रत्‍येकाला आपापल्‍या ज्ञानाचा अहंकार असल्‍याने ते प्रत्‍येक जण त्‍या मुलाला शिक्षण न घेतल्‍याने हीन लेखून मुर्ख म्‍हणून त्‍याची कुचंबना करु लागले.परंतु तो होडी वल्‍लवण्‍यात पारंगत होता समुद्रात कितीही आंत गेला,तरी युक्‍तीने मेहनतीने समुद्र तिरावर पोचत.समुद्रातील वादळ,इतर निर्माण होणारी संकटे यातून तो स्‍वत:ला वाचवू शकेल एवढा आत्‍मविश्वास त्‍या मुलाला होता.त्‍यामुळे त्‍या उच्‍च शिक्षीतांनी त्‍याला जे जे बोलले ते त्‍याने निमूटपणे ऐकून सहन केले.समुद्रात अचानक चक्री वादळ सुरु झाले व ते त्‍या होडीच्‍या दिशेने येऊ लागले.हे संकट पाहून ते उच्‍च शिक्षीत लोक एकदम घाबरले व आरडा ओरडा करु लागले.त्‍यावर त्‍या होडी वल्‍लवणा-या मुलाने त्‍यांना सांगीतले आता आलेल्‍या वादळाने होडी उलटण्‍याची भीती आहे.तुम्‍हाला पोहता येते असल्‍यास आलेल्‍या संकटाला सामना करण्‍यास तयार व्‍हा.कारण होडी उलटली तर बुडणार,म्‍हणून आपापल्‍या डिग्रीने त्‍या वादळाला परत फिरवा अन्‍यथा जीवाला धोका आहे,असे त्‍या मुलाने त्‍या उच्‍च शिक्षीत माणसांना सांगीतल्‍यावर ते सर्व घाबरले.त्‍यापैकी कोणालाच पोहता येत नव्‍हते.त्‍यांनी त्‍या मुलाला जीव वाचवण्‍यासाठी काकुळतीने विनंती केली.मुलगा होडी वल्‍लवण्‍यात कुशल असल्‍याने त्‍याने वादळाला हुलकावून अतिशय तत्‍परतेने त्‍याने ती होडी समद्राच्‍या काठावर आणली व आलेले सर्वांचे संकट टळले.

सिध्‍दांत - परमार्थामध्‍ये विद्वत्ता,पांडीत्‍य उपयागाचे नाही तर जन्‍म मरणरुपी भवसागरातून तरुन जाण्‍यासाठी विषयाच्‍या लाटा चुकवून जगता येणे आवश्‍यक असते.ज्ञानी पंडित वेदांती,किर्तन केसरी,प्रवचन-कीर्तनकार,इत्‍यादी पदव्‍यांनी जिवाचा उध्‍दार होणार नाही तर यासाठी प्रत्‍यक्ष अनुभव असावा लागतो.

प्रमाण - १} तुका म्‍हणे येथे अनुभव प्रमाण । शब्‍दांचे गौरव कामा नये ॥
२} भवनदीचे पाणी रे गडया भलतेच ओढीते । भल्‍या भल्‍या पोहणारांस उलथून पाडीते ॥


४] पहारा चालु आहे

एका नगरातील राजा व त्‍याची राणी दोघेही फार धार्मीक वृतीचे होते.राणीला देवीच्‍या पुजेसाठी दररोज फुले लागत,कधी कधी फुले न मिळाल्‍याने तीची पुजा परिपुर्ण होत नसे व तीला उपवास घडत असे.त्‍यामुळे तीने फुलांची बाग तयार करुन रक्षणासाठी दोन पहारेकरी ठेवले.तीचा पुजेचा नित्‍यक्रम सुरु झाला.काही काळानंतर मुलाचे ताब्‍यात राज्‍य कारभार दिला राजा व राणी तीर्थयात्रेला गेले व .दुदैवाने राजाराणी परत केंव्‍हाच आली नाही.असा बराच काळ गेला व राज्‍यात दुष्‍काळाचे सावट आले.त्‍यामुळे तिजोरीवर आर्थीक ताण वाढू लागला.खर्चात कपात करण्‍यात आली.प्रधानाला प्रत्‍येक खात्‍याबाबत अनावश्‍यक खर्च कोठे कोठे आहे याची चौकशी करण्‍याचे आदेश दिले.चौकशीअंती दोन पहारेकरी मोकळया जागेवर पहारा करताना आढळले.त्‍या पहारेक-याच्‍यांबाबातचा अहवाल राजाकडे आला तो अहवाल तपासला व प्रत्‍यक्ष चौकशी केली तर ज्‍या ठिकाणी पहारा होता त्‍या ठिकाणी राणीने पुजेला फुले उपलब्‍ध व्‍हावीत म्‍हणून फुलांची बाग लावली. त्‍या बागेत फुलांची वेल होती ती पहारेक-यांच्‍या पायात अडकत असल्‍याने ती वेल त्‍यांनी उपटून टाकली व बागही नष्ट झाली, मात्र पहारा सुरुच होता.

सिध्‍दांत - आताच्‍या परिस्थितीत परमार्थ जोरात चालू असून आळंदी पंढरपूरच्‍या वा-या, तीर्थयात्रा, वृतवैकल्‍य, होम हवन,पूजापाठइत्‍यादी धार्मीक कर्मे जोरात सुरु आहेत. मात्र करण्‍याचे वर्म माहित नसल्‍याने त्‍यातील अनुभव येत नाही.ज्ञानोबा तुकोबांनी लावलेला भक्‍तीमार्गाचा वेल आज योग्‍य पध्‍दतीने जोपासला न जाता तो उपटून टाकण्‍याचेच काम सुरु आहे.इतर साधने कशासाठी याचे वर्म समजावून घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.

प्रमाण - १} अर्थ लोपले पुराणे । नाश केला शब्‍द ज्ञाने । विषय लोभी मने । साधन अवघी बु‍डवली ॥ संत तुकाराम महाराज


५] जिथे चुकले तिथेच जोडणे

एका गांवात अत्‍यंत श्रीमंत वडारी रहाता होता,त्‍याला एक मुलगी असून ती त्‍याची अत्‍यंत लाडकी होती.ती उपवर झाली असता तीला वर शोधण्‍याचे त्‍यांने ठरवले.जगामध्‍ये सर्वांत मोठा वर आपल्‍या मुलीला मिळावा म्‍हणून त्‍याने भवीष्‍य सांगणा-याकडे जाऊन युक्‍ती विचारली पैसे पाहिजे तेवढे घ्या पण उपाय सांगा.असे म्‍हटल्‍यावर भविष्‍यकाराने वडा-याला सांगीतले माझे सांगण्‍याचे काम व तुमचे करण्‍याचे.जगात सर्वांत मोठा व श्रीमंत सुर्य आहे तू त्‍याच्‍याकडे जा, वडा-याने शिडया लावल्‍या व सुर्याकडे केला व सुर्याला म्‍हणाला मुलीला पदरात घ्‍या,तुम्‍ही सर्वात मोठे आहात.तर सुर्य म्‍हणाला माझ्यापेक्षाही ढग मोठे आहेत,ते मला त्‍यांच्‍या कर्तुत्‍वाने झाकूण टाकतात.मग तो ढगाकडे केला व याचना केली मुलीला पदरात घ्‍या.ढग म्‍हणाले माझयापेक्षाही वारा मोठा आहे.कारण वारा आल्‍यावर आम्‍ही कुठल्‍याकुठे उडून जातो.मग तो वा-याकडे गेला व घ्‍या पदरात म्‍हणून विनंती केली.वारा म्‍हणाला माझयापेक्षाही दगड मोठे आहेत कारण कितीही सोसाटयाचा वारा आला तरी ते जागचेही हालत नाहीत.मग तो दगडाकडे गेला व तुम्‍ही जगात मोठे आहात तर माझया मुलीला पदरात घ्‍या म्‍हणून विनंती केली.त्‍यावर दगड म्‍हणाले वडारी आला तर मी थरथर कापू लागतो कारण तो हातोडीने माझे तुकडे तुकडे करतो.शेवटी त्‍याला झक मारून आपली मुलगी वडा-यालाच दयावी लागली.

सिध्‍दांत - जिथं चुकलं तिथचं जोडले पाहीजे,अन्‍यत्र जोडून त्‍याचा काहीही उपयोग होत नाही. आमचा व देवाचा संबंध तुटला आहे बेंबींच्‍या देठाजवळ मात्र आम्‍ही तो जोडतो वाचेमध्‍ये यामुळे देवाची आपली ओळख केंव्‍हाच होणार नाही.

प्रमाण - १} संत दर्शनी हा लाभ । पद्मनाभ जोडीला ॥......तुकाराम महाराज


६] नाम रुपा नाही मेळ

एक मतीमंद माणून फिरत फिरत एका गांवात आला.त्‍याला आपण कोठे आहे,कोणत्‍या गांवात आहे हे काहीही कळत नव्‍हते त्‍यामुळे तो त्‍या गांवातच फिरत राहला.त्‍याला भूक लागली म्‍हणून तो अन्‍नासाठी मागणी करता करता एका शेठजीच्‍या दारात गेला व मला भूक लागली आहे जेवण द्या म्‍हणून विनंती केली.ठीक आहे,त्‍याला शेठजीने जेवण दिले व येथेच कामाला राहण्‍यास सांगीतले.तोही हो म्‍हणून त्‍या ठिकाणी कामाला राहीला. त्‍याला शेठजी घोडयाच्‍या तबेल्‍यामध्‍ये घेऊन गेला व हया प्राण्‍यांची देखभाल करण्‍याचे काम सोपवले.खरारा करणे,पाणी पाजणे,तबेला साफ ठेवणे,इत्‍यादी कामे त्‍याला शेठजीने सांगतली.त्‍या माणसाला शेठजीने घोडयाला पाणी पाजण्‍यासाठी सोडून दिला.त्याला नदीवर पाणी पाजून आणण्‍यास सांगीतले.तो घोडा घेऊन नदीवर गेला,त्‍याला पाणी दाखवल पण तहान नसल्‍याने तो काही पाणी पीत नव्‍हता. त्‍याला असे वाटले की तोंडातील वस्‍तूमुळे तो पाणी पीत नसेल म्‍हणून त्‍यांने घोडयाचे तोंडातील वस्‍तु काढली.इतक्‍यात त्‍याने धूम ठोकली पळू लागला.घोडा पुढे माणूस मागे घोडा रेसचा असल्‍याने तो दुर निघून गेला.त्‍याला त्‍या प्राण्‍याचे नांव माहीत नाही,ज्‍याचेकडे काम करता होता त्‍या शेठजीचे नांव माहित नाही तसेच हातात काय वस्‍तू आहे हेही काहीच माहित नसल्‍याने तो घोडयाच्‍या तोंडातील वस्‍तु पुढे करुन समोरुन येणा-या व्‍यक्‍तीला सांगू लागला की,अहो रांव तुम्‍ही,ज्‍यांच्‍याकडे होतो आम्‍ही,त्‍यांना जाऊन सांगा तुम्‍ही (लगाम हातात धरुन) हयाच्‍यातलं जे होत ते गेलं म्‍हणावं. मग सांगा समोरच्‍या माणसाला काही समजेल कां.

सिध्‍दांत - तत्‍वत: देवाचे नांवही माहित नाही आणि रुपही माहिती नाही असा जर परमार्थ करत असेल तर त्‍याचा आयुष्‍यात मेळ केंव्‍हाच लागणार नाही.

प्रमाण - १} नाम रुपा नाही मेळ । अवघा वाचेचा गोंधळ ॥ ............. तुकाराम महाराज


७] जावे त्याच्‍या वंशा

संध्‍याकाळच्‍या वेळेला मायलेक दोघी भांडी घासत बसल्‍या होत्‍या.मुलगी पांच वर्षाची होती,व आई गरोदर होती.तेंव्‍हा त्‍या मुलीने आईला विचारले,की तुझे पोट कशाने सुजले आहे.परंतु आई काहीही न बोलता गप्‍प बसली.मुलगी अज्ञान व लहान असल्‍याने ती हे विसरुन गेली. काही काळ लोटल्‍यानंतर मुलीचे लग्‍न झाले.कर्मधर्म संयोगाने देव पावला व ती गरोदर राहीली.पहीले बाळंतपणासाठी आईने तील माहेरी आणले.काही दिवसांनंतर एक दिवस असेच संध्‍याकाळी जेवण उरकल्‍यानंतर दोन्‍ही मायलेकी भांडी घासण्‍याचेवेळी एकत्र आल्‍या.तेंव्‍हा आईला आपल्‍या मुलीच्‍या लहानपणीच्‍या शब्‍दांची आठवण झाली.आता मुलीच्‍या प्रश्‍नाचे उत्‍तर देण्‍याची संधी साधून आईने तीला विचारले की,बाई तुझे पोट कशाने सुजले.तेंव्‍हा ती मुलीगी आईला हसून व लाजून म्‍हणाली आई तुला काई वाटतका विचारयला.

सिध्‍दांत - व्‍यवहारात किंवा संसारात काही गोष्‍ठी जशा शब्‍दाने सांगता येत नसतात,तीथे अनुभवच असावा लागतो.त्‍याप्रमाणे परमार्थात देखील देवाचा संबंध शब्‍दाने बोलून चालत नाही तर प्रत्‍यक्ष अनुभवच असणे महत्‍वाचे आहे.

प्रमाण - १} पाण्‍यामध्‍येमासाझोपघेतोकैसा।जावे त्‍याच्‍या वंशा व्‍हा कळे ॥


८] जिसकी उसकी टेक सबकी निशाणी एक

एकदा सिंह जंगलात गाढ झोपला होता.येथे एक उंदीर सिंहाच्‍या अवतीभोवती उडया मारत असल्‍याने सिंहाची झोप उडाली त्‍यामुळे तो अत्‍यंत रागावला व उंदराला पकडले.पंजात घेऊन त्‍याला चिरडणार एवढयात उंदीर काकुळतीने जीवदान देण्‍याची यातना करु लागला.मात्र सिंह काही ऐकेना.मग उंदराने पुन्‍हा दयेसाठी करुणा भाकली व मी तुला संकट समयी निश्चित मदत करेल असे म्‍हटल्‍यावर सिंहाला स्‍व:तच्‍या मोठेपणाचा अहंकार असल्‍याने त्‍याला हसू आले हे एवढेसे चिमूरडे काय मदत करणार पण असो मदत करो किंवा न करो त्‍याला सिंहाने सोडून दिले.कालांतराने त्‍या जंगलात शिका-याने सापळा टाकून सिंहाला जाळयात पकडले.आपण संकटात आहे म्‍हणून त्‍याने सिंह गर्जना करायला सुरुवात केली.संपूर्ण जंगल भयभीत झाले.सिंह संकटात आहे असे सिंहाच्‍या गर्जनेने त्‍या उंदराला समजले.त्‍याने ताबडतोब आपल्‍या सर्व मित्रमंडींळीना घेऊन जाळयात बंद असलेल्‍या सिंहाजवळ आले.पहातात तर सिंह जाळयांत.त्‍या सर्व उंदरांनी जाळे कुरतडण्‍यास सुरुवात केली.काही क्षणात जाळे तोडले व सिंहाची सुटका केली.सिंहालाही आनंद वाटला,की एवढासा उंदीर सुध्‍दा संकटवेळी कामाला येऊ शकतो.त्‍याने उंदराचे आभार माणले.

सिंध्‍दांत - छोटयाशा उंदराने सिंहाला पारध्‍याच्‍या जाळयात मुक्‍त केले.तसे परमार्थात कोणीही मोठा किंवा लहान नाही तर सर्व समानच आहेत.

प्रमाण - १} सर्वाघटी राम देहादेही एक । सुर्य प्रकाशक सहस्‍त्ररश्‍मी ।


९] पहारेकरी डयुटीवर झोपला

एका कंपनीत एक पहारेकरी (वौचमेन)तीन शिफ्ट नोकरी करत असे.तीस-या पाळीवर असताना त्‍याला कामावर झोप लागली व झोपेत एक स्‍वप्‍न पडले की,आपला मालक ज्‍या विमानाने परदेशात जाणार आहे त्‍या विमानाचा अपघात झाला.असे झाल्‍याने त्‍याला ही गोष्‍ट आपल्‍या मालकाला केंव्हा सांगेल असे झाले.त्‍याने ताबडतोब जाऊन उद्या आपण विमानाने प्रवास करणार आहात,तर तुम्‍ही उद्याचा विमान दौरा रद्द करा.मालकाने त्‍याचे ऐकले व दौरा रद्द केला.आणि खरच त्‍या विमानाचा अपघात झाला.मालकाने विचार केला की,हे घडणार हे पहारेक-याला कसे कळले.म्‍हणून त्‍याला बोलावून विचारले की,माझ्या विमानाचा अपघात होणार हे तुम्‍हाला कसे समजले.तर त्‍याने सांगीतले की मी तीस-या पाळीचे कर्तव्‍यावर असताना मला झोप लागली व स्‍वप्‍नात मी हे पाहिले.यामुळे मालकाला फारच भिती वाटली की,कर्तव्‍यावर झोपले तर कंपनीची सुरक्षा व्‍यवस्‍था धोक्‍यात येऊ शकते.म्‍हणून मालकाने त्‍याला बोलावले स्‍व:तचा जीव वाचवल्‍याबद्दल त्‍याचा योग्‍य प्रकारे सन्‍मान केला व कंपनीला सुरक्षतेता धोका नको म्‍हणून त्याने त्‍याला कामावरुन काढून टाकले.

सिंध्‍दात - परमार्थातही असेच आहे,समाजाला प्रबोधन होत आहे,देव देव करा असे जाणकार मंडळीकडून मार्गदर्शन केलें जाते.हे खूप चांगले काम आहे,पण नामाचा व देवाचा अनुभव येत नसेल तर काय कामाचे.समाजावर उपकार होत असेल पण आपले कर्तव्‍य काय हेच जाणकार मंडळी पुर्णतः विसरल्‍याचे दिसून येते.

प्रमाण - १} धर्माचे पालन । करणे पाखंड खंडण । हेची करणे आम्‍हा काम। बीज वाढवावे नाम ॥


१०] महाराष्ट्राचा अभिमान

भारत स्‍वातंत्र झाला तेंव्‍हा भाषावार प्रांत रचना झाली.तेव्‍हा वाद निर्माण झाला,मुंबई महाराष्ट्राला का गुजरातला.तर अशा त्‍या वेळेला यशवंतराव चव्‍हाण मुख्‍यमंत्री होते.पण तेही मूख गिळून बसले होते.कारण मुरारजी भाई देसाई दोस्‍त होता,म्‍हणून काहीही बोलत नव्‍हते. पण त्‍या वेळेला पुण्‍याचे एक पिल्‍लू प्रल्‍हाद केशव अत्रे यांनी आवाज उठवला.मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्र झालाच पाहिजे.बोला पाव्‍हणे मग झाला की नाही। झाला.पण हे झालं आजचं उदाहरण.

सिध्‍दांत - पण त्‍याच पध्‍दतीने सातशे वर्षापूर्वी आमच्‍या माऊलीला महाराष्ट्राचा केवढा अभिमान होता पण तो आम्‍हाला अजूनही कळत नाही.महाराष्ट्रातील यच्ययावत माणसाला ब्रम्‍हविद्या मिळालीच पाहिजे असे ज्ञानेश्‍वर महाराज निक्षून सांगतात पण ते आम्‍हाला अजूनही कळत नाही.

प्रमाण - १} इये म-हाठीयेचे नगरी । ब्रम्‍हविद्येचा सुकाळू करी । देणे घेणे सुखची वरी । होऊ दे या जगा ।
आम्‍ही हे करायचे सोडून ताम्रपत्रावर ज्ञानेश्‍वरी छापत बसतो.श्रध्‍दा म्‍हणून ठीक आहे.पण संताना काय अभिप्रेत आहे.गाथा मंदीर,गीता मंदीर,इत्‍यादी ही ब्रम्‍हज्ञानाचा सुकाळ असु शकते का?


११] यशवंतरावांना उपदेश

मला पूर्वी पानं खायचा शोक होता,माझ्या चंचीतली पानं वसंतराव नाईक बाळासो सरदेसाई,यशवंतराव चव्‍हाण यांनी पण खाल्‍लीत.हे माझे खूप जीवलग मित्र होते.यशवंतरावाना मुलबाळ नसल्‍यामुळे खूप खंत वाटायची.ते मला म्‍हणे,भाऊसाहेब पारमार्थिक उपाय सांगा ना । मी भुलभुलैयातला बुआ असतो तर नादाला लावून खूप लुटल असतं.मी म्हटल तुकाराम महाराजांवर विश्‍वास आहे ना। नवसे कन्‍या पुत्र होती । तरी का करणे लागे पती ॥ बरे हा दोष तुमच्या मागील जन्‍मातील कर्माचा आहे.त्‍यानुसार हा देह तुम्‍हाला मिळाला आहे.
केले कर्म झाले तेची भोगा आले । उपजले मेले ऐसे किती ॥
दुसरी गोष्‍ट अशी की,मागील कर्मानुसार ऋणानुबंधाची नाती निर्माण होतात.तुमच्‍यावर कुणाचे कर्जच नाही व तुमचेही कुणावर नाही,म्‍हणून तुम्‍हाला संतती नाही.उलट आनंदाची गोष्‍ट आहे.बरं असलेले म्‍हातारे आज वृध्‍दाश्रमात आहेत.तुम्‍ही गर्भात असताना तुमचा सांभाळ कुणी केला?माझ्या या बोलण्‍यानं त्‍यांना गदगदून आलं.पुन्‍हा जीवनात कधी ते नाराज दिसले नाहीत.

पुढे वाचा