हरिचिया दासा हरी दाही दिशा । भावे जैसा तैसा हरी तया ॥१॥
हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्मा घेणे ॥२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगे हरिरुप ॥३॥
हरिरुप झालें जाणणे हरपले । नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥४॥
हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं । एका जनार्दनी हरी बोला ॥५॥
हरिपाठात हरिनाम महात्म्याचे सर्वांगीण प्रतिपादन असते. हरिपाठ याचा अर्थ हरिनाम पाठ असा आहे. नामस्मरण ही हरीची फार मोठी सेवा आहे. हरीला तर सर्व पूजा, पादसेवन,वंदन दास्ये, इत्यादी नवविधा भक्ती पैकी अतिप्रीय अशी नामस्मरणसेवा आहे.येथे नामधारक हाच खरा हरिदास होय. दास्यत्व म्हणजे सेवा. सेवा ते
आवडी उच्चारावे नाम । भेदाभेद काम सारोनिया॥
तुका म्हणे देवा । चिंतन हे तुझी सेवा ॥
असा जो भक्त त्याला अखंड नाम चिंतनाचे किती मोठे फळ अनुभवास येते ते नाथ महाराज सांगतात हरी दाही दिशा, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात -
हरी दिसे जनीं वनीं आत्मतत्वी ॥ जे जें दृष्टी दिसें तें तें हरिरुप अशीच व्यापक दृष्टी बनलेली असते. हरीविषयी जो संकुचित, मर्यादीत भावना ठेवतो, त्याच्या करिता हरी तसा दिसतो. बहुतेक भक्त , भाविक म्हणविणारे असेच असतात.
जंव आकार एक पुढा देखती । तंव हा देव येणें भावें भजती ॥
मग तोचि बिघडलिया टाकिती । नाही म्हणोनि ॥ ज्ञानेश्वरी ९-१७०॥
जे जसे मला भजतात त्यांना मीही तसेच फल देतो असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ज्यांच्या ठिकाणी संकुचित, मर्यादित भाव आहे त्यांना हरी तसाच मर्यादित दिसतो व हरीच्या यथार्थ ज्ञानाने ज्यांना हरिविषयक व्यापक भाव आहे, त्यांच्या करिता दाही दिशा व्यापकच प्रचीतीस येतो.
आत्मा परम प्रिय हरी । त्यांचे नामकीर्तीचा हर्ष भारी ।
नित्य नवी आवड धरी । सबाहयाभ्यंतरी हरि प्रगटे ॥
नाथ भागवत आध्या्त्मशास्त्रात ही पूर्णत्वाची अवस्था आहे.
एथ मुख्य त्वेंआ भगवद्भक्ती । विश्वास धरितां चित्तीं । भगवतपर झालिया वृत्ति । सर्वभूती मद्भाव ॥ नाथ भागवत ॥
हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥
हरिदासाची हरिनामावर पूर्ण श्रध्दा असते. म्हणून तो सदैव मुखाने हरिनाम गात असतो. त्याच्या परिणामाने त्याची सर्व चिंता हरपून जाते. चिंता ही एक मानसिक विकृती आहे. तो एक अती दु:खद विकार आहे. जीव कोणत्याही चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत असला, तरी त्याला चिंता ही सोडीत नाही.
सजीवं दहते चिंता । निर्जीवं दहते चिता ॥
म्हणजे चिंता ही देहाला जाळते, पण निर्जीव देहाला म्हणजे मेलेल्याला जाळते, पण चिंता मात्र जिवंत पुरुषाला आतून जाळीत असते. विषय प्राप्त झाला नसेल तर प्राप्त चिंता, झाला तर रक्षणाची चिंता होत असते. मोठमोठयांनाही चिंता ग्रासते.पण ही चिंता हरीदासाला नसते, कारण त्यांना विषयप्रेम नसते. विषयाच्या ठीकाणी सत्यात्वनबुध्दी,अनुकूलबुध्दी नसते. बहुतेकांना आपला संसार कसा चालेल. आपणांस अन्नवस्त्रे , इत्यादी कसे प्राप्त होतील. अशी चिंता असते, पण हरिभक्त ती चिंता करत नाही.
आवडीने भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥
जसे पक्षी उद्याची चिंता करीत नाहीत. त्यांचे अन्न देव रोज नवे देतो. मग माणसांनी चिंता का करावी . श्रीसंत तुलसीदास म्हणतात की, तुलसी मुरदेकूं देत है कपडो लकडी आग । जीता रहकर सोस करे सो नर बडा अभाग ॥ अन्नवस्त्रादिकांची चिंता भक्तजन करणार नाही. पण उध्दाराची तरी करीत कां नाही वेदांतशास्त्रात मुमुक्षू हा आपल्यात उध्दाराची म्हणजे या संसार सागरातून तरुन जाण्याची चिंता करीत असतो.
कई मी उध्दार पावेन । काय कृपा करील नारायण ॥ पण जो नामधारक असतो त्यास ही चिंता देखील करण्याचे कारण नाही. याच दृष्टीने नाथ महाराज म्हणतात, हरी मुखी गाता हरपली चिंता । भगवंत म्हणतात ज्यांनी माझ्या ठिकाणी चित्त ठेविले आहे त्यांचा मी वेळ न लावता या मृत्युमय संसारसागरातून उध्दार करतो. तेषामहं समुध्दहर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि नचिरात्पार्थ मरूयावेशितचेतसाम् ॥ गीता १२-७॥ संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत या श्लोकावर विवरण करतात. ए-हवी तरी माझिया भक्तां। । आणि संसाराची चिंता । काय समर्थाची कांता। कोरान्न मागे ॥८५॥ म्हणोनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा । करुनि त्यांचिया गावा । धावत आलो ॥८९॥ नामाचिया सहस्त्रावरी । नावा इया अवधारी । समजूनिया संसारी । तारुं जाहलो ॥९०॥ ज्या कर्मामुळे जन्ममरण भोगावे लागते त्याच कर्माचा हरिकृपेने नाश होतो. कर्माचा नाश झाला म्हणजे जन्म भोगावा लागत नाही.
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगे हरिरुप ॥
जी वासना अंतकाळी जीवाचे ठिकाणी असते व त्या वासनेप्रमाणे त्या वस्तू चे स्मरण करीत मनुष्य अंतकाळी देहाचा त्याग करतो, त्या त्या वस्तूप्रत त्यात वासनेप्रमाणे तो जातो. जडभरताचे उदाहरण प्रसिध्द आहे- त्या भरतामुळे या देशास भरतखंड अशी संज्ञा प्राप्त झाली. सार्वभौम राज्या-चा पूर्ण भोगानंतर विरक्ती झाल्याने तो राज्याचा त्याग करुन अरण्यात तपश्चर्येकरिता निघून गेला. एक दिवस तो नदीत स्नानासाठी गेला असता, तेथे सिंह गर्जनेने भयभीत झालेल्या एका हरणीचा गर्भ नदीत पडला. राजाला त्या पाडसाची दया येऊन त्यांने त्याला आपला आश्रमात नेले व त्याचे संगोपन केले. पण त्याचेवर राजाची प्रीती जडल्याने अंतकाळाचे वेळी त्या हरणाचा विचार मनात आल्याने राजाला पुढचे जन्मात हरणाचे जन्मला जावे लागले.
देहासी येतां मरण । भरतासी मृगाचे ध्यान ॥ तेणें मृग जन्म पावे आपण । जन्मांतर कारण झालें ऐसे ॥ मृगाचेनि स्मरणें निमाला । या लागीं तो मृगजन्म पावला । जो कृष्णस्मरणें निमाला । तो कृष्णचि जाहला देहांती ॥ अंतकाळी जे मती । तेंचि प्राणीयासी जाण गती । यालागी श्रीकृष्ण चित्ती । अहोराती स्मरावा ॥ ना.भागवत
अशी ही वासना देहवासना, लोकवासना, शास्त्रावासना, इत्यादी जीवाला बंधनात घालतात. पण जे हरीभक्त आहेत, त्यांची वासना इतरत्र राहतच नाही. तीच वासना हरीरुप होते. विठोबाचे पायी मज काय उणे । वासनचि मनें गिळीयेले ॥ हरीरुप होणे म्हणजे काय तर --
हरिरुप झालें जाणणें हरपलें । नेणणें तें गेलें हरिचे ठायी ॥४॥
हरिरुप ध्यानीं हरिरुप मनीं । एका जनार्दनी हरी बोला ॥
कित्येंकाच्या कानात क्षणभर हरी येतो पण तोच सतत ध्यानात येत नाही. चित्तवृत्तीच्या चंचलतेमुळे ध्यानाकरिता लागणारी एकाग्रता, निरोध हे त्यास साधलेले नसतात. तर कित्येंकांना ध्यानकाळीच हरी प्रतीत होतो. ध्यानाव्यतिरीक्त कालात मन अन्यत्र जाते. विक्षेप निर्माण होतो. पण खरा हरीभक्त असतो त्याच्या सर्वच अवस्थेत त्याला हरीवाचून अन्य विषय नसतो.
पांडुरंग ध्यानी पांडूरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ।
हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥१॥
नको नको मान नको अभिमान । सोडी मी तूं पण तोचि सुखी ॥२॥
सुखी जेणे व्हावे जग निववावे । अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळे भावभक्तीबळें । जगाचिया मेळे न दिसती ॥४॥
दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी । एका जनार्दनी ओळखिले ॥५॥
नामधारक भागवतर्धीय संतांच्या जीवनात हरिनामाविना अन्य वस्तू्ला महत्वाचे स्थान नाही. म्हणून महाराज द्विवार सांगत आहेत हरि बोला, हरि बोला । बोला म्हणजे वाणीने हरिनामाचा उच्चार करा. शब्दांत फार सामर्थ्य आहे. शब्द जड व चेतन यांचे यथार्थज्ञान करुन देतो. संत ज्ञानेश्वरांनी अनुभवामृताच्या सहाव्या प्रकरणात शब्दाचे फार वर्णन केले आहे.
जीव देहे बांधिला । तो बोले एके सुटला । आत्मा बोले भेटला । आपणपया ॥८॥
वाच्ये वस्तूत ही जड,अतएव अनित्या,दु:खरुप असते. म्हणून अशा जड व दु:खरुप पदार्थाचे ज्ञान करुन देणाऱ्या शब्दाचा उच्च्चार व्यवहारात सतत करण्याणे लाभ काहीच होत नाही. नाथ महाराज म्हणतात हरि बोला, हरि बोला नाहीं तरी अबोला । व ज्ञानेश्वर महाराजही हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, असे द्विवार सांगतात. हरिनामानेच वाणीचे सार्थक आहे. हरि हा शब्दा जीवास सच्चीदानंदस्वरूप हरिपावेतो नेऊन पोचवितो. ज्या शब्दात हरिनाम नाही ते किती जरी महत्वातचे, रस, अलंकारयुक्तो काव्या ने, उपमा दृष्टां तादिकांनी नटलेले असले तरी तो व्य्र्थ गलबलाच आहे.
जी वाणी रसालंकारादिकांनी युक्तद आहे, पण जगाला पवित्र करणा-या हरीचे यश, गुण, नाम इत्यातदिकांचे गायन करत नाही ती कावळयाकरिता उष्टेय टाकिले जाते त्या मुळे ते अपवित्र आहे. उलट ज्याक वाणीत काव्याकत सुंदर रचना नाही किंबहुना सदोष अक्षररचना आहे, परंतू ज्यामचा प्रतयेक श्लो क श्रीहरीच्याय गुणवर्णनाने युक्तह आहे ती वाणी लोकांच्याम सर्व पातकांचा नाश करणारी आहे, कारण संत अशाच वाणीचे श्रवण, गायन व कीर्तन करीत असतात.
वाचा सार्थक हरिकीर्तने । कां अनिवार नामस्म रणें । जयजयकाराचेनि गर्जने । केली त्रिभुवने पावन ॥ रामनामाच्याअ गजरीं । सदा गर्जे ज्याची वैखरी । तेथ कळिकाळाची उरे नुरी। दुरितें दुरी पळालीं ॥
हरिनामाविना जे जे बोलणे, तो व्यर्थ गलबला आहे. बहुतेक माणसे अशा व्यर्थ गलबल्यातच अडकतात व आयुष्य वाया घालवतात. हरिनाम हे अत्यंत श्रेष्ठ व जीवमात्राच्या उध्दाराचे साधन असतांनाही सामान्य लोक ते का करत नाही याचा विचार केला असता मुख्य म्हणजे देहाभिमान होय. देहाभिमान म्हणजे मी आत्मा देहरुपच आहे असा अहंकार. देहाभिमान आला म्हणजे मनुष्याला महत्वप्राप्तीची, श्रेष्ठत्वाची, लोकांनी आपला आदर करावा अशी इच्छा होते. याला मान म्हणतात व देहाला मी म्हटले की देहाहून इतर जे कोणी असतील ते तू या भावनेचे विषय होतात म्हणजे मी व तू हे द्वैत निर्माण होते. दुजे जव जव घडे । तंव तंव संसार भय जोडे । या ज्ञानेश्वरांचे वचनाप्रामाणेच नाथ महाराज म्हाणतात
नको नको मान नको अभिमान । सोडी मी तूं पण तोचि सुखी ॥ २ ॥
पाशी देहबुध्दी । तयासि सुख नाही त्रिभुवनी ।
बुडाले द्वंद्वसंधी । अधिव्याधी महार्णवी ॥
देहबुध्दी चिया नरा । थोर चिंतेचा अडदरा ।
संकल्पिदवकल्पांचा माना । थोर चिंतेचा अडदरा ॥
हा अभिमान आला की देहसंबंधी विषयाचे महत्वं निर्माण होते व ते वाढतच जाते व जीवाचा यातच नाश होतो.
ए-हवी तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोग रचना। मेळवावी ॥ सर्वस्वे शिणोनि एथें । अर्जवावी संपत्ती जातें । तेणे स्वधर्म सांडूनि देहातें । पोंखावे काई ॥ इतकेच नव्हे तर देहाभिमान जीवाला आत्महत्येचे पाप करावयास लावतो,करवितो आत्म हत्या । नेदी सत्य आकळूं ।
देहादिकाच्या ठिकाणी असलेल्या दोषांचे यथार्थ ज्ञान व विवेकाने देहाभिमान जातो व देहाभिमानाच्या नाशाने मान,प्रतिष्ठा इत्यादिकांची आसक्ती सुटते. अहंकार गेला म्हणजे त्यामुळे प्राप्त झालेले मी तू पण हे द्वैत जाते. अहंकार लोपी अवधारी । द्वैत जाय
म्हणुन मानाभिमान त्यागपूर्वक मी-तू पणाचा त्याग करणारा जो नामधारक आहे, त्यासच ख-या परमात्म सुखाची प्राप्ती होते आणि या सुखा करताच सर्व संत महात्म्यांचे प्रयत्न असतात.
जयातें बाहयाची भाष । नेणिजेचि नि:शेष । अंतरी सुख । एक आधि ॥ परि ते वेगळेपणे भोगिजे । जैसे पक्षिये फळा चुंबिजे ।तैसे नव्हे तेथ विसरीजे । भोगितेपणही ॥ याद्वारे माऊली सुखाचे स्वरुप सांगतात.
आता यावरी सुख । तें एवंविध देख । जेणे एकेचि अशेख । विसरे जीव ॥किंबहुना सोय । जीव आत्मयाची लाहे । तेथ जें होये । तया नाम सुख ॥ अ १३
संसारात माणसे स्वत: लौकिकदृष्टीने सुखी असतात, पण ती इतरांना सुखी करु शकत नाही. लौकीक सुख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धभोगाने प्राप्त होते.
सुखी जेणे व्हावें जग निववावें । अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥ हे परमात्मा सुख मर्यादित नाही. भोगाने क्षीण होणारे नाही, ते अविनाशी आहे. म्हणून जो या सुखाने सुखी झाला त्यांने इतरांना या सुखाचा लाभ करुन द्यावा त्यांना शांत करावे, दु:ख मुक्त करावे. यासाठीच संताचा जन्म असतो. तुकाराम महाराज पुढे याचे वर्णन करतात.
आपण तरला नव्हे ते नवल । कुळे उध्दरील अनेकांची ॥
हे परमात्मसुख केवळ अज्ञानामुळेच सर्वांना अप्राप्त आहे. कारण ते बाहय नाही, सविशेष नाही. विषयापासून प्राप्ते होणारे नाही.
तैसा हृदयामध्ये मी रामु । असता सर्व सुखाचा आरामु । का भ्रांताशी कामु । विषयावरी ॥ मार्गी अंधासरिसा । पुढे देखणाही चाले तैसा । अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा । आचरोनि ॥ परमार्थात अनेक मार्ग सांगितले आहेत, पण प्राप्तकाळात त्या मार्गाने जाणे अशक्य् आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कलीं न घडे साधन । उचित विधिविधान । न कळे न घडे सर्वथा ॥ भक्ती पंथ बहु सोपा । पुण्य नागवे या पापा । येणे जाणे खेपा । येणे एके खुंठती ॥
भक्तीमार्ग हा राजमार्ग आहे. या मार्गात कोणताही अडथळा नाही. यदाकदाचित काही प्रतिबंध आला तर तो भगवान दूर करतो.
यापरी हरिकीर्तन । देव परम समाधान । हा भक्ति राजमार्ग पूर्ण । ये मार्गी स्वार्ये रक्षण । चक्रपाणी कर्ता ॥ ना.भा;२/५४३ हाच खरा सन्मार्ग होय. मार्गी बहुत । याची गेले साधुसंत ॥ तुकाराम महाराज म्हणतात.
जे या भावभक्तीसच्या मार्गाने जातात ते पुन: संसाराच्या मेळाव्यात येत नाहीत.
मार्ग जया कळे भावभक्ति बळें । जगाचिया मेळे न दिसती ॥
जरी सर्वसामान्यांना असे संत ओळखता येत नाहीत, तरी ते जगतातच लोकाध्दाराकरता वावरत असतात. जे भक्त भाविक त्यांना ओळखू शकतात त्यांना ते कधी जनांत तर कधी बनातही प्रत्यक्ष डोळयाने दिसतात.
दिसती जनी वनी प्रत्यीक्ष लोचनी । एका जनार्दनी । ओळखिले ॥