ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिध्दीसहीत ॥१॥
सिध्दी लावी पिसे कोण तया पुसे । नेले राजहंसे पाणी काय ॥२॥
काय करावे ते संदेही निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केले ॥३॥
केले कर्म झाले तेचि भोगा आले । उपजले मेले ऐसे किती ॥४॥
एकाजनार्दनी नाही यातायाती । सुखाची विश्रांति हरीसंगे ॥५॥
नामस्मरण नामपठण करावयाचे तो हरी कसा आहे हे कळल्यास मानवी जीवनाचे सार्थक आहे. पोवोनिया मनुष्यपणा । जो न साधी ब्रम्हज्ञाना । तो दाढीचा मेंढा जाणा । विषयाचरण विचरत ॥ नाथ भागवत अ.९-३२९ ॥ देवाने स्थावर जंगम चराचरात्मक सृष्टी निर्माण करुन पाहीले असता त्याला समाधान झाले नाही. नंतर आदरपूर्वक आपल्याला जाणणारा असा कोण असेल म्हणून मानवी शरीर निर्माण केले. इतर कोणत्याच योनीमध्ये स्वरुपाची प्राप्ती करुन घेणारे कोणी दिसले नाही. म्हणून देवाने मानव शरीरात स्वस्वरुपाचे ज्ञान करुन घेण्याचे सामर्थ्य दिले. बाहुले मनुष्ये देहीं । निजज्ञान घातले पाही । जेणे ज्ञाने देहीं । विदेह पाही पावती ॥ आहार निद्रा भय मैथुन । सर्वा योनीसी समान।मनुष्य्देहीचे ज्ञान । अधिक जाण सर्वांशी ॥ मनुष्यदेहाचेनि ज्ञानें ।सच्चिदानंद पदवी घेणें ।एवढा अधिकार नारायणे । कृपावलोकने दीधला ॥देखोनि मनुष्यदेहाशी ।सुख झालें भगवंताशी । अधिकार ब्रम्हज्ञानासी ।येणे देहेसी मत्प्राप्ति ॥ हरिची ओळख होणे म्हणजेच आत्मज्ञान, ब्रम्हज्ञान असे म्हटले आहे. मनुष्य प्राण्याचे ठिकाणी हरिची ओळख दिसून येत नाही. त्यांना केवळ संसाराची ओळख आहे.
जे प्राणीया कामी भरु । देहाचिवरी आदरु । म्हणोनी पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥४-२०॥ तुकाराम महाराज म्हणतात –
विषय ओढी भूलले जीव । त्यांची कोण करील कीव । नुपजे नारायणी भाव । पावोनि ठाव नरदेह॥ याचे कारण अनादीकालीन संस्कार होत. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात – ना शरीरपराते सेवितां । संसारगौरवचि ऐकतां । देहींच जयाची अहंता । बुडोनि ठेली ॥ अ.१५ -४२६ ॥
कोणी हरीला भजणारे, श्रध्दा ठेवणारे, पूजा-अर्चा, तीर्थयात्रा, व्रते, इत्यादि करणारे अनेक आस्तिक, भाविक म्हणविणारे आहेत. पण त्यांना हरीची ओळख यथार्थ पटली आहे असे म्हणता येत नाही. आपल्याहून भिन्न। कोणीतरी एक श्रेष्ठ व आपण उपासना केली तर तिचे फल देणारी एक शक्ती. एवढेच त्यांचे हरिविषयक ज्ञान असते. परंतु हरिस्वरुपात ज्ञानात धन्यता आहे. ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. वरील कारणाने अशी हरिची ओळख सर्वांना असणे शक्य नाही. वेदांतात हरीची दोन स्वरुपे सांगीतली आहेत-मूर्त व अमूर्त, साकार-निराकार, सगुण-निर्गुण, व्यक्त-अव्यक्त इत्यादी या पैकी अमूर्त, निर्गुण, निराकार स्वरुपाच्यात अपरोक्ष ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. असा श्रुतीचा सिध्दांत आहे. तमेव विदित्वा अतिमृत्यु मेति ।नान्यत: पंथा विदृतेयनाय श्रुती॥
म्हणजेच परमात्मस्वरुपाला अपरोक्षत्वाने जाणूनच मृत्युचे अतिक्रमण करु शकतो. यापेक्षा अन्य मार्ग नाही. याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज पुढील प्रमाणे करतात.
जे ज्ञान जयाच्या हातीं । तोचि समर्थ इये मुक्ति । जैसा शतमखसंपत्ति । स्वरर्गीचिये ॥ ज्ञाने.१५-३०
श्रीमदृभगवतगीता अध्याय ७ मध्ये श्रीकृष्ण भगवंतानी भक्ताचे चार प्रकार सांगीतले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी.त्यात मला ज्ञानी भक्त अत्यंत आवडतो, कारण तो परमात्याला आत्मत्वाने, सर्वव्यापकत्वाने, अभेदभावाने ओळखतो.
हे समस्तपहि श्रीवासुदेवो । ऐसा पतीती रसाचा वोतला भावो । म्ह,णोनि भक्तां माजी रावो । ज्ञानिया तोचि ॥ ज्ञाने.७-१३६
॥वासुदेव: सर्वमिति स महात्मात सुदुर्लभ: गीता ७.१९
अशी सर्व व्यापक हरीची ओळख ज्याला झाली तेच या संसारात धन्य होत,असे भगवान म्हणतात. हरीला ओळखण्याने मोक्ष सुलभ का तर हरीच्या अज्ञानातच बंध आहे. असा शास्त्रसिध्दांत आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. केवळ अज्ञानाचे आवरण आहे. त्याने आत्मा हा आवृत्त म्हणजे झाकला आहे. त्यामुळेच संसारबंध प्रतीत होतो. झोपेमुळे राजाला देखील स्वप्नात भिकारी झालो असा भ्रम होतो. जागा झाल्यावर तो राजेपणाचा अनुभव घेतो तसे अनादि अविद्येत वश होऊन स्वत:ला कर्ता, भोक्ता, जन्मणारा, मरणारा समजतो. यासच बंध म्हणतात. याचे कारण अज्ञान.
ओळखला हरी धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिध्दी सहित ॥ १ ॥
जो हरीभक्त असतो त्याला मोक्ष काय तर सिध्दी सहीत मोक्ष प्राप्त होतो. खरा भक्त सिध्दी्ची अपेक्षा करत नाही. दुस-या कडव्यात एकनाथ महाराज म्हणतात-सिध्दीत लावी पिसे कोण तया पुसे । नेले राजहंसे पाणी कायी ॥२॥ श्रीमदभागवत एकादश स्कंद अध्याय १५ मध्ये सिध्दीचे सविस्तर वर्णन केले आहे. एकंदर सिध्दी अठरा (१८) आहेत. यात आठ प्रधान व आठ गौण आहेत. अणिमा, महिमा, लघिमा या तीन सिध्दी देहसंबंधी होत. विशिष्ट विषयाची प्राप्ती,अदृश्य दर्शन, निसर्गशक्तीचे प्रेरकत्व, प्रभुत्व, विशीता व कामपूर्तता या आठ सर्वश्रेष्ठ सिध्दी आहेत.
जें जें दृष्टीं दिसे ते ते हरिरुप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥
वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥
वैष्णवांचे गुहय मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहता नाही ॥३॥
आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥
एकाकार झाले जीव शिव दोन्ही । एका जनार्दनी ऐसे केले ॥५॥
मागील अभंगात हरीची विश्रांती कशी प्राप्त होते याचा विचार केला.ती विश्रांती ज्या पुरुषाला प्राप्त झाली, त्याचेच वर्णन या अभंगातुन केले आहे, असे वाटते.सामान्य भावीकास हरीचे दर्शन,साक्षात्कार आपणांस व्हावा असे वाटते,पण त्याची दृष्टी संसारात पाहत नाही.कारण हरी सामान्याच्या दृष्टीचा विषय नाही.
‘विमूढा नानूपश्यंति, पश्यन्ति ज्ञानचक्षु: ।‘ (गीता १५.१०.)
म्ह्णणजे अज्ञानी या आत्मस्वरुप हरिला पाहू शकत नाहित तर ज्ञानचक्षूंनी युक्त असलेले पहातात.वास्तविक हरि व्यापक परंतु तो या उपाधीने झाकला आहे.संत तुकाराम म्हणतात-
घटी अलीप्त असे रवी । अग्नी काष्ठामाजी जेवी ।
तैसा नारायण जीवी । जीव साक्षी वर्तने ॥
या उपाधीमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।ते तत्वज्ञ संत ।स्विकारीती ।
अंतर्बहीश्च तत्सर्व व्याप्य नारायण: स्तित : । (श्रुति)
मत: परतरं नान्यत किंचीदस्ति धनंजय । गीता ७.७
म्हणजे माझ्यापेक्षा वेगळे काहीच नाही, असे भगवान श्रीकृष्णही अर्जुनास सांगतात.वेदशास्त्रे,पुराणे, संत या सर्वांनीच सर्व ईश्वर हरीरुप आहे, असे अनेकवार उघड सांगीतले आहे.मग सर्वांना तो का अनुभवास येत नाही; याचे कारण श्रीकृष्णानीच अर्जुनास सांगीतले आहे.
नाहं प्रकाश: सर्वस्य योगामायासमवृत:। मुढोयं नाभीजानाती लोकमामजमव्ययम ॥
मी सर्वांना प्रकाशरुप होत नाही,म्हणजे माझे ज्ञान सर्वांना नाही.कारण हा जीव माझया योगमायेने आवृत्त झाला आहे,म्हणजेच मूढ बनलेला आहे.म्हणून हा अज,अव्यय अशा मला जाणत नाही.
की जे योगमाया पढळे । झाले आहाती आंधळे ।
म्हणोणी प्रकाशाचेनी बळे । ने देखती माते ॥
जीवाचे ज्ञान आवृत्त आहे.म्हणून त्या चैतन्याला जीव संज्ञा आहे.ज्यावेळी काही दोषाने दृष्टीपूर्णपणे समोरच्या वस्तूस पाहू शकत नाही त्यावेळी ती वस्तूच अन्य रुपाने भासत असते.उदा,मंद अंधकारामुळे समोर असणा-या दोरीचे यथार्थ ज्ञान झाले नाही म्हणजे संस्कारामुळे त्या दोरीवर सर्प भ्रम होतो.तद्वत स्वरुपाचे अज्ञानास अनादीसंस्कारामुळे जीवापुढे स्वरुपत:सत्य नसलेली ही सृष्टी निर्माण करते.संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
आतां अज्ञानासारखें । वस्तू आपणपेचिं देखे ।
परीरुपें अनेके । नेणो कोणे ॥
जैसा रंक भ्रमला । म्हणे जारे मी रावो आला ।
कां मुिर्च्छतू गेला। स्वर्ग लोका ॥
तेवी तलकलीया दीठी । मग देखणें जें जें किरीटी ।
तया नाव सृष्टीं । मीची विये पै गा॥
जैसा कां स्वप्न मोहा । तो एकाकी देखे बहुवा ।
तोचि पाडू आत्मया । स्मरणेवीण असे ॥ (ज्ञाने.१४- ८३ ते ८५)
ज्ञानेश्वरी नाथभागवत या ग्रंथांतून ठिकठिकाणी परमात्मस्वरुपाची व्यापकता अनेक उपपत्तींनी सांगितली आहे.परमात्मा जर व्यापक न मानला तर तो जड ठरेल.जगदंत:पातीच राहील.त्यामुळे सृष्टीची उपपत्तीही लागणार नाही.कारण स्वत:तो जड परिच्छिन्न तो या विश्वरुप कार्याचेकारण कसा होईल;श्रुती,संत त्याचे कारणत्वे प्रतिपादन करतात पण या आवरण,विक्षेपस्वरुप ज्या अज्ञानाच्या शक्ती आहेत,त्यांच्यामुळे जीव त्याची व्यापकता ओळखू शकत नाहीं.श्रीज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांताच्या द्वारा हा विषय पटकवून दिला आहे. हरिकृपेने ज्याचे अज्ञानावरण दूर झाले आहे.त्यांना सर्वत्र हरीच प्रतीत होतो.हे सर्व जग हरीचे शरीरच आहे अशी त्या ज्ञानी पुरुषाची दृष्टी असते.जनक नवयोगेश्वर संवादात प्रारंभीच हा विषय आला आहे.
खं वायुमग्नि सलिलं महींच ज्योतींषिसत्वानिदिशो द्रुमादीन् । सतपत्समुद्रांश्च हरे:शरीरं यत्किंच भूतं प्रणमेदनन्य: ॥ भाग.स्कंद ११-२/४१
आकाश,वायू,तेज,आप,पृथ्वी,सूर्यचंद्रादी तेजोगोल,दशिदशा,वृक्ष-पाषाणादि नद्या समुद्र फार काय हे दृश्य विश्व सर्व हरीचे शरीर आहे. अशी भावना करुन तो भगवदभक्त सर्वांना अनन्य भावनेने नमस्कार करतो.
ब्रम्ह उन्माद परमानंदे । जंव तंव पाहे स्वानंदबोधें ।
तंव तंव चराचर पूर्णानंदे । स्वानंदकंदे दुमदुमीत ॥
पृथ्वी आप तेज वायू नभ । देखे हरीरुपस्वयंभ ।
भूता महाभूतांचे डिंभ । न देखे भिन्न कौंभ अभिन्नत्वे ॥
याच आशयाने नाथ महाराज म्हणतात –
जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरुप ।
ही अवस्था आध्यात्मिक दृष्टीने फार महत्वाची आहे.ही सुखमय स्थिती आहे.श्री नाथमहाराज याच अवस्थेचे वर्णन आपल्या एका अभंगातून करीत आहेत.
अवघेची श्रेलाक्य आनंदाचे आता । चरणी जगन्नाथा चित ठेले ॥
हरीभक्तास ही पूर्णावस्था प्राप्त झाली नाही तर त्याचे कारण त्याच्या अंत:करणात काही दोष असतात.ते दूर होऊन अंत:करण शुध्द व्हावे,त्यात भगवद्भाव वृध्दींगत व्हावा,म्हणून पुराणादिकांतून साधनं भक्तीचा सांग विचार केला आहे.कारण पूर्ण ज्ञानी भक्त दुर्लभच असतो,हे मागे सांगितलेच आहे.परमात्म आपणाहून भिन्न,श्रेष्ठ आहे व त्याची कृपा संपादन करण्यात जीवनाची सार्थकता आहे शी भावना ठेवणारा साधक भक्त,पुराणादिकांतून जे भक्तिसाधनाचे प्रकार वण्रिले आहेत त्याचे आचरण करीत असतो.त्यात मूतिपूजा,जप,ध्यान,इत्यादी प्रकार असतात.तेथे पूजा,ध्यान,जप या शब्दाने इतरही नवविध भक्तीचे प्रकार घ्यावेत.ही
सर्वच साधने साधकांस उपयुक्त आहेत.श्रीमद्भागवत,एकादश स्कंधात अनेक अध्यायांतून विस्तारानेया साधनांचे स्वरुप,फल इत्यादि सांगितले आहे.जोपावेतो मी जीव,अल्पज्ञ,अल्पशक्तिमान,दु:खी परतंत्र आहे असे वाटते.या दु:ख आणि पारतंत्रयातून सोडिवणारा एक परमात्माच आहे म्हणून त्याची कृपा संपादन करण्याकरता उपयुक्त साधनाचा उपयोग तो करत असतो.तो ज्ञानी आहे,ज्याला सर्वत्र परमात्मभाव प्रतीत होतो,त्याला वेगळी पूजा,ध्यान,जप या साधनांची आवश्यकता नाही.कारण त्याचे प्रत्येक कर्म म्हणजे देवाची पूजाच आहे.ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात-
क्रियाजात मी जालेपणं । घडे कांहीचि न करणे । तयाचि नांव पूणें । खुणेचें माझे ॥ एवं तो बोले ते स्तवंन । तो देखे ते दर्शन
। अद्वया मज गमन । तो चाले तेचि ॥ तो करी तेतुली पुजा । तो कल्पी तो जप माझा । तो निजे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥ ज्ञानेश्वरी अ.१८-११७८,११८० ११८१ ॥
तुकाराम महाराज एका स्वानुभवात्मक अभंगात सांगतात –
जेथे देखे तेथे तुझीच पाऊले । विश्व अवो कोंदाटलें ।
रुपगुणनाम अवघ मेघश्याम; । वेगळे ते काय उरले; ।
जातां लोटांगणी अवघीच मेदिनी । सकळ देव पाट झाले ।
सदासर्वकाळ सुदिन सवेळ । चित्ता प्रेम असे धाले ।
वाचा बोले ते तुझाचि गुणानुवाद । मंत्रजप कथा स्तुति ।
भोजन सारुं ठायी पलतांबूल कांही । पूजा नैवेद्य तुज होती ।
चालता प्रदक्षिणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति ।
देखानि दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझया मुर्ति ॥
या सहजिस्थती त्या ज्ञानी भक्ताची प्रत्येक क्रिया भक्तींत समाविष्ट होते.त्याला वेगळे पूजा,ध्यान,जपादी साधन करण्याचे कारण नाही.अभंगाच्या दुस-या कडव्यांत महाराज म्हणतात –
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेश्री देव । तयाविण ठावरिता कोठे ॥